पेण अर्बन बँक ठेवीदारांना दिलासा

पेण अर्बन बँकेत झालेल्या 800 कोटींच्या  घोटाळ्यामुळं जिल्हयातील अनेक कुटुंब देशोधडीला लागली आहेत.ठेवीदारांचे पैसे आज मिळतील उद्या मिळतील अशी आशा करीत 300 ठेवीदार मृत्यूमुखी पडले आहेत..मात्र अजूनही ठेवीदारांचे पैसे मिळत नसल्याची कैफियत पेण अर्बन बँक ठेवीदार कृती समितीने जेव्हा नागपूर मुक्कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानी घातली तेव्हा तेही स्तंभित झाले.कृती समितीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पेण अर्बन बँक घोटाळ्यातील ठेवीदारांना दिलासा द्यावा अशी मागणी केली.यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेत काही निर्णय घेतले.पेण अर्बन बँक घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सूचना त्यांनी गृह विभाग तसेच अंमलबजावणी संचालनालयाला दिल्या आणि ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी बँकेच्या सपत्ती विकण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.मुख्यमंत्र्यांच्या या घोषणांनी ठेवीदारांना दिलासा नक्की मिळाला असला तरी या घोटाळ्यातील वजनदार घोटाळेबाज लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने व्हावी आणि ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत अशी अपेक्षा ठेवीदारांनी व्यक्त केली आहे.

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या स्थापनेला 58 वर्षे पूर्ण झाली आहेत.या संघाचं स्वरूप केवळ पत्रकारांची संघटना एवढं सीमित नसून एक समाजसेवी स्वयंसेवी संस्था असं या संस्थेचं स्वरूप आहे.अनेक समाजोपयोगी उपक्रम जिल्हा पत्रकार संघाच्यावतीनं राबविण्यात येतात.या संस्थेचा 58 वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमास सामचे संपादक निलेश खरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार पंडित पाटील होते.पत्रकारांना मार्गदर्शन करताना निलेश खरे यांनी चौथा स्तंभ शाबूत ठेवताना प्रत्येक पत्रकाराने प्रयत्न करावे असे आवाहन केले.यावेळी आनंद जोशी यांना रायगड पत्रभूषण पुरस्काराने तर शशिकांत मोरे आणि देवा पेरवी यांना रामनारायण युवा पत्रकार पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.ज्येष्ठ साहित्यिक निर्मल गोखले यांना र.वा.दिघे पुरस्कारानी गौरविण्यात आले.कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाणे,कोकण अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आणि जिल्हयातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंत पाटील यांचा अलिबागेत सत्कार 

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांची नुकतीच विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.विधानसभा मतदार संघातून ते सलग चौथ्यांदा विधान परिषदेवर गेले आहेत.त्यांच्या निवडीनंतर अलिबागमध्ये त्यांचा जंगी सत्कार कऱण्यात आला.सत्काराला उत्तर देताना जयंत पाटील यांनी शाहू,फुले,आंबेडकरांचे विचार या देशातील आणि राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी यापुढील काळात आपण काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमास माजी मंत्री मीनाक्षी पाटील तसचे अलिबागमधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते..-

कोळी बांधवांची लगबग सुरू 

हयोस,हयोसच्या आवाजांनी सध्या रायगड जिल्हयातील सर्वच समुद्र किनारे दणाणून गेले आहेत.ही लगबग आहे ती,आपल्या बोटी समुद्रात उतरविण्याची .1 जून ते 31 जुलै अशी दोन वर्षे मच्छिमारी बंद असते.1 ऑगस्टपासून पुन्हा मच्छिमारी सुरू होते.1 ऑगस्ट आता जवळ येत असल्यानं मच्छिमार आपल्या बोटी समुद्रात उतरविण्याच्या कार्यात मश्गुल आहेत.पावसाळा सुरू झाला की,मच्छिमारी बोटी किनार्‍यावर आणून शेकारून ठेवल्या जातात.या काळात बोटींची दुरूस्ती तसेच रंगरंगोटीची कामं जरी सुरू असली तरी हा सारा बेरोजगारीचा मोसम असतो.त्यामुळं मच्छिमारांना 1 ऑगस्टची प्रतिक्षा असते.ती घटीका आता जवळ येत असल्यानं मच्छिमारांमध्ये उत्साह आहे.त्यामुळं अलिबाग,मुरूड,श्रीवर्धन,उऱण तालुक्यातील मच्छिमार आपल्या बोटी समुद्रात उतरविताना दिसत आहेत.पुर्वी मनुष्यबळाच्या सहाय्याने या बोटी समुद्रत उतरविल्या जात मात्र मनुष्यबळाची चणचण लक्षात घेऊन आता ट्रॅक्टर आणि जेसीबीचीही त्यासाठी मदत घेतली जाते.एकट्या मुरूड कोळीवाडयात 650 बोटी आहेत त्यामुळं जिल्हयातील किती लोकांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे याचा आपण अंदाज करू शकतो.

शोभना देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here