कोणत्याही प्रकल्पाला नाव द्यायची वेळ आली की, प्रत्येक जण आपले राजकीय हितसंबंध डोळ्यासमोर ठेऊन नावांची शिफारस करतो .. त्यातील बहुतेक नावं राजकीय असतात.. खरं तर राजकारणाखेरीज देखील अनेक अशी क्षेत्रं आहेत की त्यांनी आपलं जीवन व्यापून टाकलं आहे.. .. साहित्य,क्रीडा, कला, पत्रकारिता, विज्ञान, उद्योग, सहकार वगैरे.. या क्षेत्रात देखील अशी अनेक दिग्गज व्यक्तीमत्वे आहेत किंवा होऊन गेलीत की, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा समाजमनावर उमटविलेला आहे.. परंतू नावं देताना, पुतळे उभारताना त्यांचा कधीच विचार होत नाही.. मुंबई-पुणे द़ुतगती मार्गाला नाव देण्याचा विषय जेव्हा समोर आला तेव्हा पु. ल. देशपांडे यांच्या नावाचा आग्रह अनेकांनी धरला.. पण त्यांचं नाव दिलं गेलं नाही.. आता मुंबई – गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर याचं नाव द्यावं अशी मागणी पत्रकार करीत आहेत तर अनेक जण वेगवेगळी नावं पुढं करून मुळच्या मागणीला खो घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.. त्यामुळं कोणत्या प्रकल्पाला कोणाचं नाव द्यायचं याचं निश्चित असं धोरण ठरविलं गेलं पाहिजे.. जे सत्तेवर आहेत त्यांनी आपल्याच विचारांचा पुरस्कार करणारयांची नावं परस्पर जाहीर करून टाकायची हे इतरांवर अन्याय करणारे आहे.. कॉंग्रेस सत्तेवर होती तेव्हा जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी हीच नावं वारंवार दिली गेली.. आज भाजप देखील कॉग्रेसची परंपरा पुढे चालवत आहे.. एका कुटुंबाची नसतील पण एका विचारांची नावं प़कल्पांना दिली जात आहेत.. स्वतः नरेंद्र मोदी यांचं नाव देखील एका प़कल्पांना दिलं गेलंय..हे नाव देताना क्रिकेट आणि मोदी यांचा काय संबंध? असा प़श्न कोणाला पडला नाही.. महाराष्ट्रात हेच होतंय..
नवी मुंबई विमानतळास कोणाचं नाव द्यायचं यावरून सध्या वाद सुरू आहे.. जेआरडी टाटांचं नाव समोर आलंय.. ते योग्य आणि औचित्यपूर्ण ठरू शकते.. पण त्यांच्या नावाचा पुरस्कार केल्याने मतं मिळत नसल्यानं कोणताही राजकीय नेता त्यांचं नाव घेताना दिसत नाही.. त्यांच्या शिवाय अन्य राजकीय नावं पुढे केली जात आहेत..हे नेहमीचं चित्र आहे..
दि. बा. पाटील स्थानिक नेते होते.. प्रकल्पग्रस्तांसाठी त्याचं काम मोठं आहे.. त्यांच्यामुळेच देशात अन्यत्र कोठेही दिला गेला नाही एवढा चांगला मावेजा विमानतळ प़कल्पग़स्तांना मिळाला हे जरी खरं असलं तरी . देशासाठी टाटा कुटुंबाचं योगदान देखील विसरता येण्यासारखं नाही… त्यामुळं जेआरडीचं नाव देणं औचित्यपूर्ण ठरेल , आगळं वेगळं दिसेल.. केवळ राजकीय वयकतींचीच नावं या संकल्पनेला फाटा देत टाटाचं नाव दिलं गेलं तर हा कौतुकाचा विषय ही होईल .. टाटाचं नाव देतानाच दि. बा. पाटील यांचा भव्य पुतळा विमानतळ परिसरात उभा करून हा वाद थांबवता येऊ शकतो .. दि. बा. वर प्रेम करणारे हा प्रस्ताव मान्य करतील.. पण हा विषय देखील राजकीय आणि मतांशी निगडित असल्याने काही नेते त्याला विरोध करतील.. दि. बा. हयात असताना त्यांना प़खर राजकीय विरोध करणारे नेतेच आज त्यांच्या नावासाठी आग्रह धरीत आहेत.. हा विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे..त्यातूनच दि.बांचं नाव हा अस्मितेचा मुद्दा केला जात आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here