रायगड जिल्हयातील पावसाचा जोर आज दुपारनंतर कमी झाला असला तरी महाबळेश्वरमध्ये गेल्या सहा तासात 127.70 मिली मिटर पाऊस झाल्याने महाबळेश्वरच्या डोंगरात उगम पावणाऱ्या सावित्री,काळ,गांधारी,या नद्यांना पूर आले असून महाडमध्ये सावित्री धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत.सावित्री नदीची धोक्याची पातळी साडेसहा मिटर असून पाणी महाडच्या दारापर्यत पोहोचले आहे. भिरा धरणाचे पाच दरवाजे उघडल्यानं रोह्यात कुंडलिकेला पूर आला असून ती देखील धोक्याच्या पातळीवरून वहात आहे. काल रात्रीपासून कोपलेल्या अंबा नदीचेही पाणी ओसरले नाही. नागोठण्यातील बाजारपेठ,बस स्थानक परिसर अजूनही पाण्याखाली आहे.मुबई-गोवा महामार्गावर महाडनजिक एक मोठे झाड कोसळल्यानं जवळपास दोन तास महामार्गावरील वाहतूक बंद होती.ती आता पूर्ववत झाली आहे.
जिल्हयातील पाताळगंगा,गाढी,उल्हास,भोगावती,नागेश्वरी,आदि नद्यांनाही पूर आलेले आहेत.येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केल्याने नदी काठची तशीच दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे,जिल्हयात नदीकाठी 262 गावं असून 70 गावं खाडीच्या काठावर आहेत तर 53 गावं समुद्राच्या जवळ आहेत.दरडी कोसळण्याचा धोका असलेली 73 गावं असून या सर्व गावांना सावध राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुमंत भागे यांनी दिल्या आहेत.