शिवसेना स्वतःच आणखी किती हसं करून घेणार आहे ?

0
822

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या  रविवारच्या बहुचर्चित पत्रकार परिषदेचा  बार अगदी च फुसका ठरला.  पत्रकार परिषद जनतेचा पार भ्रमनिराश करणारी ठरली.कोणतीही ठोेस भूमिका न घेता  उध्दव ठाकरे  यांनी ” सत्तेचा लोभ नाही असं सांगत  सत्ता आपल्यालाही  सोडवत नाही” हेच जगाला दाखवून दिलें .केवळ सत्तेसाठी शिवसेनेनं आत्मघाताची जी वाट निवडली आहे ती कोणालाच आवडलेली नाही. .महिनाभर भाजपवाले शिवसेनेला बोटावर नाचवत आहेत.भाजपनं आरंभिलेली सेनेची कुतरओढ मराठी माणसाला पहावत नाही.अशा स्थितीत मराठी माणसाच्या भावनाची कदर करीत सेनेनं आपल्या स्वभावाप्रमाणं एकघाव दोन तुकडे अशी भूमिका घ्यायला हवी होती.तसं सेना करताना दिसत नाही.भाजपकडून जी वारंवार मानहानी होतेय त्यावर सेना  काय करतेय ?   केवळ अल्टिमेटम देतेय. जे दुबळे असतात त्यांच्या अशा धमक्यांना किंवा अल्टिमेटमला कोणी भिक घालत नसते.  भा जपही तेच करीत आह शिवसेनेच्या आतापर्यतच्या कोणत्याही अल्टिमेटमला भाजपनं जुमानलेलं नाही. अशा स्थितीत  आजच्या  अल्टिमेटमचा भाजपवर काही परिणाम होईल अशा भ्रमात सेनेनं राङण्याचं कारण नाही.  प्रश्न  विश्वासदर्शक ठरावाचा असेल तर तो कसा संमत करून घ्यायचा याची चोख व्यवस्था भाजपनं करून ठेवलेली  आहे.राष्ट्रवादीच्या मदतीनं देवेद्र फडणवीस सरकार वाचणार आहेत  हे राज्यातील शेंबड्या पोराला देखील समजत असेल तर ते उध्दव ठाकरे यांना कळत नाही असं कसं म्हणावं. ? “भाजपने राष्ट्रवादीबाबतीची आपली भूमिका स्पष्ट करावी” हीच टेप वारंवार वाजवत राहून सेना केवळ स्वतःची अगतीकता आणि सत्तेची लालसाच जगासमोर उघड करीत आहे.  रााष्ट्रवादीबद्दलची भूमिका जाहीरपणं सांगणं भाजपला सोयीचं नसल्यानं ते बोलत नाहीत आणि बोलणारही नाहीत.तथापि भाजपची भूमिका काय आहे हे  लपून राहिलेलं नाही.निवडणुकांचे सर्व निकाल यायच्या अगोदरच राष्ट्रवादीनं भाजपला एकतर्फी पाठिंबा देणं आणि त्यावर भाजपनं गुढ मौन बाळगणं यातच भाजपची काय भूमिका आहे ते स्पष्ट झालेलं आहे. त्यावरही भाजपच्या काही नेत्यांनी तर “राष्ट्रवादी न मागता आम्हाला पाठिंबा देत असेल तर आम्ही काय करावं?” असं बोलून दाखवत अप्रत्यक्ष भूमिका स्पष्ट केलेली आहेच. अशा स्थितीत  वारंवार तेच दळण दळीत राहून सेना  वेळ दवडत आहे हे नक्की.भाजपची आज जी मग्रुरी वाढलेली दिसते ती राष्ट्रवादीच्या जिवावरच आहे.  12 तारखेला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस राष्ट्रवादीने  अनुपस्थित राहायचे आणि सरकार पडाणार नाही याची खबरदारी घेण्याबरोबरच सेनेला एकाकी पाडायचे ही रणनीती अगोदरच ठरलेली आहे. अशा प्रकारे राष्ट्रवादीच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यावर  किमान पुढील सहा महिन्यासाठी तरी भाजपचं सरकार तरूण जाईल.विश्वास दर्शक  ठराव एकदा संमत झाल्यानंतर” राष्ट्रवादीवाले अनुपस्थित राहिले त्याल आम्ही काय करणार?” असं म्हणत भाजपवाले हात वर करायला मोकळे असतील.हे सारं राजकारण एवढं स्पष्ट दिसत असतानाही अजूनही उध्दव ठाकरे आणि त्याचे सत्तेसाठी अधिर झालेले काही सहकारी केवळ अल्टिमेटम देत असतील तर ही शिवसैनिकाची प्रतारणा नाही तर काय आहे?.राष्ट्रवादी किती वाईट आहे,राष्ट्रवादीनंच अटलजीचं सरकार कसं पाडलं होतं,भगवा दङशतवाद हा शब्द शरद पवारांनीच कसा रूढ केला हे असले भूतकाळातील किस्से सांगून राजकारण चालत नसते.वर्तमानालाच राजकारणात अर्थ असतो.आज भाजपला सत्ता टिकवायला जर शरद पवारांची मदत होत असेल तर पवारांचा सारा भूतकाळ विसरायची भाजपची तयारी आहे. एकदा भाजपनं अशी मदत घेतली आणि बारा तारखेला विश्वासदर्शक ठराव संमत झाला तर शिवसेनेचे उरली-सुरली अब्रुही शिल्लक राहणार नाही . भचजप शिवसेनेशी सातत्यानं ज्या निष्ठूरपणे वागत आहे ते महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे.भाजपची ही अरेरावी मराठी माणसांना नक्कीच मान्य नाही.परिमाणतः जनतेची मोठी सहानुभूती सेनेच्या बाजुनं आहे.  मात्र सेना नेतृत्व भाजपच्या अरेरावीपुढे असेच नतमस्तक होत राहिले तर सहानुभूतीच्या ऐवजी सेनेबद्दल तिरस्काराची भावना निर्माण होईल..त्यामुळं आज जी नरमाईची भूमिका सेनेनं घेतली आहे ती सेनेसाठी महागात पडू शकते.अनिल देसाई  यांना दिल्लीहून परत बोलावले गेल्यानंतर आणि त्याचं विमानतळावर जंगी स्वागत केलं गेल्यानं  अशी हवा निर्माण  झाली  होती की,सेना आज भाजपला मराठी अस्मितेचा इंगा दाखविणारच.त्याचा भाग म्हणून  अनंत गीते      यांचा राजीनमा मोदींच्या तोंडावर फेकून देतील आणि  एनडीएतूनही सेना बाहेर पडेल  असच साऱ्याना वाटत होतं.मात्र असं काहीच झालं नाही. “तुम्हाला घाई आहे पण मला घाई नाही” असं सांगत उध्दव ठाकरे यांनी आपण अजूनही प्रतिक्षा करायला तयार आहोत हे दाखवून दिलं..”योग्य वेळी नि र्णय़ घेऊ” असं वारंवार सागणाऱ्या उध्दव ठाकरेंची योग्य वेळ कधी येणार? असा प्रश्न आज महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे.वारंवार धरसोडीची भूमिका घेत शिवसेना नेतृत्व स्वतःच हसं करून घेत आहे हे मात्र नक्की.

उध्दव ठाकरेंनी अगोदर जाहीर केलं फडणवीस यांच्या शपथविधीला जायचं नाही,नंतर ते गेले, मग  जाहीर केलं राज्यातला विषय मिटविल्याशिवाय केंद्रात मंत्रीपद स्वीकारायचं नाही नंतर अमित शहांचा फोन आला की.अनिल देसाईंना दिल्लीला रवाना केलं. दिलेला शब्द पाळला जात नाही असं लक्षात आलं की त्यांना परत बोलावलं,आत्ताही रोखठोक भूमिका घ्यायला ते तयार नाहीत.  उध्दवजी असं अगतिक झाल्यासारखं  का वागताहेत?  असा प्रश्न महाराष्ट्रला पडलेला आहे. आज्यातल्या सत्तेतला वाटा हवा हे तर त्याचं कारण आहेच त्याच बरोबर त्याना धास्ती वाटतेय ती मुंबई महापालिकेतल्या सत्तेबद्दल..शिवसेनेला असं वाटतं की,आपण स्वतःहून काही  नि र्णय़ घेतला तर त्याचा थेट परिणाम मुंबई महापालिकेतील सत्तेवर होईल.महापालिकेची सत्ता गेलीच तर पक्षाची मोठी आर्थिक कोंडी ह ोणार आहे हे सत्य असले तरी सेना आज गप्प बसली तरी भाजप गप्प थोडाच गप्प बसणार आहे.?  सेना नेतृत्वाला हे विसरता येणार नाही की,जर उद्दया शिवसेनेच्या मदतीशिवाय विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला तर भाजपवाले महापालिकेतही सेनेची अडवणूक करणारच आहेत.मुंबईसाठी वेगळा सीईओ नेमण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे ती सेनेचं महापालिकेतील महत्व कमी कऱण्यासाटीच.त्यामुळं परिणामाची पर्वा न करता थोडी आक्रमक ता दाखविण्याची आजची संधी सेनेने घालवायला नको होती असेच अनेकांना वाटते.सेनेची दुसरी एक भिती अशीही आहे की,पक्षाला सत्ता नाही मिळाली तर पक्ष फुटेल.त्यात काही अंशी तथ्य असलं तरी पक्षात अधिकृत फुट घडवून आणायची तर त्यासाठी किमान 21 आमदार एकाच वेळी फुटले पाहिजेत.एवढ्या मोठ्या प्रमाणात  फुट पडू शकेल असे वाटत नाही.फुटीरांच्या वाटयाला काय येते याचं उदाहरण नारायण राणे आणि इतरांच्या रूपानं समोर असल्यानं लगेच कोणी असं धाडस करेल असं  नाही.उलट ही भिती सेना नेतृत्वाचा आत्मविश्वास गमावून पसायला कारण ठरणार आहे.शिवसेनेला यापुर्वी कधी नव्हे एवढ्या जागा मराठी माणसांनी दिलेल्या आहेत.भाजप निवडणुकीच्या अगोदर सेनेशी ज्या पध्दतीनं वागला त्याच्या रागातून हे मतदान सेनेला झालेलं आहे.मराठी जनता आजही भाजपला बाहेरचा पक्ष समजते आणि सेनेला मातीतला पक्ष समजते.त्यामुळे भाजपनं सेनेची गेली महिनाभर जी फरफट चालविली आहे ती मराठी माणसाला अजिबात मान्य नाही.या मुद्यावर सारा महाराष्ट्र सेनेच्या बरोबर आहे.पण त्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाला थोडं खंबीर व्हावं लागेल,स्पष्ट रोखठोक भूमिका घ्यावी लागेल,”आम्ही दिल्लीसमोर झुक़णार नाही ” हा निवडणुकीत दिलेला शब्द खरा करून दाखवावा लागेल,असं झालं तर उध्दव ठाकरेंचे 180 आमदार घेऊन एकवीरा देवीला जाण्याचं स्वप्नही सत्यात येऊ शकेल.मात्र सेना अशीच तळ्यात मळ्यात भूमिका घेत राहिली तर सेनेला त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल.शिवसेनेवर टोकाची टीका कऱणारे अनेक मराठी माणसंही आज सेनेबद्दल सहानुभूती व्यक्त करताना दिसतात,म्हणजे सेना सत्तेत नसली तरी ती लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर आहे.लोकमानसातील सेनेच्या या सहानुभूतीला ओहोटी लागेल असे नि र्णय़ सेनेने घेऊ नयेत, कोणत्याही सत्तेसाठी मराठी माणसाच्या अस्मितेचा बळी देऊ नये एवढीच यानिमित्तानं अपेक्षा.

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here