शेतकऱ्यांच्या संघटना कोण फोडतंय ?

    0
    692

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील फुटीची बातमी क्लेशदायक आहे.राजू शेट्टीच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीला सोडचिठ्‌टी देत नवी बळीराजा शेतकरी संघटना स्थापना केली आहे.म्हणजे आणखी एक शेतकरी संघटना फुटली आहे.शेतकरी संघटित झाले तर देशात मोठी शक्ती तयार होईल,  ही शक्ती आपल्या सत्तेला धक्के देईल,प्रसंगी सत्ताही हस्तगत करील अशी सततची भीती राजकारण्यांना असते म्हणून राजकारणी शेतक ऱ्यांना एकत्र येऊ देत नाहीत.तसा प्रयत्न झालाच तर कधी जातीच्या कधी प्रांताच्या नावावर त्यात बिब्बा घालण्याचा प्रय़त्न होतो.शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतही अशीच फूट पाडली गेली.शरद जोशींची अनेक शिलेदार त्यांना सोडून गेले आणि त्यानंतर क्रमशः ही संघटना दुबळी होत गेली.महेंद्रसिंग टिकैत असतील किंवा अन्य शेतकरी नेते त्यांनाही संघटनेतील फाटाफुटीचा फटका बसलेला आहे.राजू शेट्टींनी शरद जोशींपासून वेगळे होत स्वाभिमानी संघटना स्थापन केली.आता त्यांचे काही साथीदार त्यांना सोडून नवा सुभा तयार करीत आहेत.खरंच हे सारं क्लेशदायक आहे.
    सततचा दुष्काळ,वीज टंचाई मुळे अगोदरच शेती आतबट्टयात आली आहे.त्यातच आता अनेक पिकांचे भाग गडगडले असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे अवघड झाले आहे.कोणत्याही राजकीय पक्षाला शेतकऱ्यांच्या या स्थितीशी काही देणं घेणं नाही.अशा स्थितीत बेवारस असलेल्या शेतकऱ्यांना केवळ शेतकरी संघटानांचाच आधार असायचा.पण   त्या कुठं प्रभावी होत आहे असं दिसताच त्याही फोडल्या जात असल्यानं शेतकऱ्यांना   कोणी वाली उरलेला नाही.राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या तुकड्यात विभागला गेला असल्याने शेतकरी संघटनेचा जो प्रभाव व्यवस्थेवर पडणं अपेक्षित असतं तो पडताना दिसत नाही.राजू शेट्टी यांच्या निमित्तानं शेतकऱ्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या.पण त्याची शक्ती कमी कऱण्यात राजकारण्यांना आता यश आल्यानं शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालंय यात शंका नाही.चळवळी मग त्या शेतकऱ्यांच्या असोत,कामगारांच्या असोत की,पत्रकारांच्या त्या टिकू द्यायच्या नाहीत,त्याच्या मागण्याकडं हेतुतः दुर्लक्ष करून त्याच्यात नैराश्येची भावना निर्माण करायची यातूनही चळवळ मोडली नाही तर चळवळीत फूट पाडून चळवळ संपवून टाकायची ही राजकीय पक्षांची नीती आहे.शेतकरी चळवळीचे दुदैर्व असे की,शेतकरी नेतेही राजकीय नेत्यांच्या अशा सापळ्यात अलगत सापडतात त्याचा फटका चळवळींना बसतो.शेतकऱ्यांनी एखादया नेत्याला डोक्यावर घेतले की,मग त्याला राजकारणाचे डोहाळे लागतात.त्यातून मग ते कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या वळचणीला जातात.राजकारण्यांना तेच हवं असतं.त्यातून नुकसान चळवळीचं होतं.अलिकडंही असंच झालेलं आहे..राजू शेट्टी भाजपच्या दावणीला गेले म्हटले की,त्यांचे प्रतिस्पर्धी रघूनाथ दादा आता थेट राज ठाकरे यांच्याकडं गेले.शेतकऱ्यांचे हे नेते राजकाऱण्यांचे उंबऱठे कशासाठी झिजवतात ? त्यांना शेतकऱ्यांच्या शक्तीवर विश्वास नाही काय ? असं करून ते स्वतःची आणि भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचीच फसवणूक करतात.असे सारे अनुभव पाठिशी असल्यानं आता विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा प्रश्न शेतक़ऱ्यांनाा पडला आहे.आज कधी नव्हे ती शेतक़ऱ्यांना संघटीत होण्याची गरज असताना शेतकरी तुकडया तुकड्यात विभागले जात आहेत.हे अत्यंत दुःख दायक आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here