पत्रकार मारले जात असताना समाज थंड का ?

0
1893

  
एका महिन्याच्या आत तीन मान्यवर पत्रकारांच्या हत्त्या.एक कर्नाटकात,दुसरी त्रिपुरात तिसरी पंजाबात.यापुर्वी असं कधीही घडलेलं नव्हतं.संदेश स्पष्ट आहे ,व्यवस्थेच्या विरोधात बोलाल किंवा लिहाल तर तुमची अवस्था अशीच होईल.पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांना खंड नाही.महाराष्ट्रात व्यक्त होणार्‍या पत्रकारांना नोटिसा बजावल्या जात आहेत.पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण एवढं वाढलंय की,सारेच त्रस्त झालेत.राजकारणी पत्रकारांना अर्वाच्च शिविगाळ करून ‘आम्ही म्हणू तेवढंच तुम्ही लिहिलं पाहिजे अथवा बोललं पाहिजे’ असा दम देऊ लागले आहेत.बातमी अशी आहे की,चळवळीशी निगडीत किंवा व्यवस्थेच्या विरोधात लिहिणार्‍या अनेक पत्रकारांंवर ‘वॉच’ ठेवला जात आहे.त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात आहे.हे सारं कमी म्हणून की काय जिल्हास्तरीय वर्तमानपत्रे बंद करण्यासाठी त्यांच्यावर जाचक नियमांचा वरवंट फिरविला जात आहे.त्यांचे जाहिराती कमी करणे,जाहिरातीचे बिले दहा दहा वर्षे न देणे,तांत्रिक त्रुटी काढून त्यांना सरकारी जाहिरातीच्या यादीवरून बाद करणे हे उद्योगही सर्रास चालले आहेत.त्यामुळं माध्यमांमध्ये मोठाच असंतोष आहे.सरकारला सारा मिडिया ठराविक भांडवलदारांच्या हाती द्यायचा आहे.कारण त्यांच्यावर अंकुश ठेवणे सरकारला सोपे जाणारे आहे.जे विरोधात आहेत एकतर त्यांचा आवाज बंद करायचा किंवा त्यांना ताब्यात घेऊन कायमची डोकेदुखी बंद करायची अशी कारस्थानं सुरू आहेत.एनडीटीव्ही आता भाजपधार्जिण्या भांडवलदारानं विकत घेतला आहे.अशी स्थिती आणीबाणीतही नव्हती.मात्र याविरोधात जो संघटीत आवाज व्यक्त व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही.माध्यमांचा गळा घोटण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी मारक आहे हे समाजाच्याही लक्षात येत नसल्यानं समाज तटस्थपणे या सार्‍या घडामोंडींकडं बघतो आहे.हे अधिक चिंताजनक आणि धोकादायक आहे.पत्रकारांच्या हत्त्या झाल्या,पत्रकारांला पाशा पटेल यांच्यासाऱख्या मुजोर नेत्यानं शिविगाळ केली,पत्रकारांची नाकेबंदी केली गेली तरी समाज रिअ‍ॅक्ट होत नाही,पत्रकारांच्या ज्या संघटना आहेत त्याही हा साप्ताहिकवाला,तो चॅनलवाला,तो इंग्रजीमधला,हा भाषिक अशा गटात विखूरलेल्या असल्यानं त्याही या मुद्यांवर एकत्र येताना दिसत नाहीत.लातूरच्या पत्रकाराला शिविगाळ झाली की,फक्त मराठी पत्रकार परिषदच आवाज उठविणार बाकीची मंडळी आपल्याला काही देणं घेणं नाही अशा पध्दतीनं या घटनेकडं पाहात राहणार.यामुळं मारेकर्‍याचं,नेत्याचं मनोधैर्य वाढत चाललं आहे आणि अशा घटना वाढत चालल्या आहेत.या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकच्या जनतेचं नक्कीच अभिनंदन केलं पाहिजे की,गौरी लंकेश यांची हत्त्या झाल्यानंतर 30-40 हजार लोक एकत्र आले आणि् त्यांनी निषेध मोर्चा काढला.परंतू हे शांतनू भौमिकच्या बाबतीत दिसलं नाही किंवा पंजाबात काल हत्त्या झालेल्या के.जे.सिंग यांच्या हत्त्येनंतरही जो जणक्षोभ उसळायला हवा होता तो उसळलेला नाही.पत्रकार संघटनाही आक्रमकपणे रिअ‍ॅक्ट झालेल्या दिसल्या नाहीत किंवा सोशल मिडियावर या बातम्या टाकल्यानंतरही पत्रकारांनी ज्या तीव्रपणे त्यावर तुटून पडायला हवे असते तसे झालेले नाही.अशा घटना रोजच घडत आहेत तेव्हा निषेध तरी किती वेळा करायचा ? असं आम्हाला वाटायला लागलंय की,आमच्याही संवेदना बधिर झालेल्या आहेत?.
पत्रकारांवर होणार्‍या अन्यायाकडं तटस्थपणे बघणार्‍या किंवा ज्या पत्रकारांवर हल्ले झाले,ज्यांना शिविगाळ झाली,ज्यांच्या हत्त्या झाल्या त्यांचेच दोष शोधणार्‍यापत्रकारांनी लक्षात ठेवायला हवं की,आज ते जात्यात आहेत आपण सुपात आहोत त्यामुळं आपण फार काही करू शकलो नाहीत तरी तीव्रपणे रिअ‍ॅक्ट तर झालं पाहिजे.संघटीतपणे आवाज व्यक्त झाला पाहिजे.किमान पत्रकार आता संघटीत झालेत एवढा संदेश तर जावू द्या ..असं झालं नाही तर पुढचा काळ अधिक कठिण आहे.समोर निवडणुका येऊ घातल्या आहेत.निवडणूक काळात अशा घटना अधिक होतात असा अनुभव आहे.राजकारणी आणि समाजविघातक शक्ती पत्रकारांच्या बाबतीत कमालीचे असहिष्णू झालेले आहेत.अशा स्थितीत संघटनात्मक भेद,आपसातील मतभेद,गट-तट बाजूला ठेऊन या आव्हानाशी मुकाबला करावा लागणार आहे.एखादया पत्रकारावरचा हल्ला हा मिडियावरचाच हल्ला असतो असे हल्ले होत राहिले तर ते लोकशाहीसाठीही धोकादायक आहे.आणखी एक महत्वाचा मुद्दा येथे ध्यानात घेतला पाहिजे.मिडिया घराण्याचे जे चालक आहेत ते या सार्‍यापासून नामानिराळे आहेत.ते सांगतील ती धोरणं,ते सांगतील ती भूमिका घेऊन आपण काम करीत असतो पण जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा ही चालक मंडळीही अंग काढून घेताना दिसते.मालकांनी हल्ले झालेल्या पत्रकाराला वार्‍यावर कसे सोडले याचे शंभर दाखले मी देऊ शकेल.म्हणजे ना मालक तुमच्याबरोबर आहेत,ना समाज तुमच्याबरोबर आहे,ना सरकार , ना आपण आपल्याबरोबर आहोत अशा स्थितीत आपण आज जगतो आहोत.जो समाज पत्रकारांपासून हजार अपेक्षा करतो तो समाज पत्रकाराच्या पाठिशी उभा राहतो असे बहुतेक वेळा दिसतच नाही.हे सारं लक्षात घेऊन आपण अधिक संघटीत,खंबीरपणे या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी एक आलं पाहिजे.अन्यथा अगोदर नरेंद्र दाभोलकर ,परवा गौरी लंकेश,काल शांतनू भौतिक,आज के.जे.सिंग आणि उद्या कदाचित आपलाही नंबर लागू शकतो हे आपण लक्षत ठेवले पाहिजे.अशा घटना केवळ एका विशिष्ट राज्यातच घडताहेत असंही नाही.महाराष्ट्र,कर्नाटक,त्रिपुरा,पंजाब आणि अन्य कोठेही हे घडू शकते.शिवाय विशिष्ठ पक्षाचे सरकार जेथे आहे तेथेच हे घडतंय असंही नाही.वेगवेगळ्या पक्षांची सरकारं असलेल्या राज्यातही या घटना घडत आहेत.त्यामुळं देशातल्या कोणत्याच भागातला पत्रकार सुरक्षित नाही चिंता वाढविणारी बाब आहे.महत्वाचा आणखी एक मुद्दा असा की,,ज्या पत्रकारांच्या हत्त्या होतात त्यांचे मारेकरी सापडतच नाहीत.हे डॉ.नरेंद्र दाभोळकर किंवा गौरी लंकेश यांच्याच बाबतीत घडलंय असं नाही तर यापुर्वी महाराष्ट्रात ज्या 22 पत्रकारांच्या हत्त्या झालेल्या आहेत त्यातील बहुतेक पत्रकारांचे मारेकरी सापडलेलेच नाहीत.हे कुठं लपतात ?,पाताळात जातात,आकाशात? एवढया मोठ्या पोलीस यंत्रणेला हे आरोपी सापडत नाहीत हे मनाला पटत नाही.मुळात हे मारेकरी सापडावेत असं राजकीय व्यवस्थेलाच मान्य नसतं किंवा त्यांचीच तशी इच्छा नसते.हे वारंवार दिसून आलंय.आपण नुसतीच वर्षे मोजत बसायचं,हे किती दिवस चालणार आणि चालू द्यायचं हा मुद्दा आहे.
आजच्या स्थितीतून मार्ग काढायचा तर दोनच पर्याय उपलब्ध आहेत.एक संघटीतपणे उभे राहायचे किंवा परिस्थितीला शरण जात घरात गप्प बसायचे.आणीबाणीतही या दोन पंथातले पत्रकार होतेच.काही परिस्थितीला शरण गेले ते बाहेर सुखैनैव राहिले ज्यांनी पत्रकारितेचा सन्मान राखला ते आत गेले.आता वेळ आलीय की,आपण कोणत्या मार्गावरून जायचं. ते ठरविण्याची! जे व्यवहारवादी आहेत त्यांच्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही पण ज्यांनी एक व्रत म्हणून पत्रकारिता अंगिकारली आहे अशांनी तरी ताठपणे या परिस्थितीचा मुकाबला केला पाहिजे.हे करताना मालक आपल्याबरोबर असताीलच असं नाही पण समाजात ज्या समविचारी शक्ती आहेत यांना बरोबर घेऊनच लोकशाहीचा हा चौथा खांब अधिक भक्कम कसा करता येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील.एखादया पत्रकारावर झालेला हल्ला किंवा त्याची झालेली हत्त्या ही केवळ एका व्यक्तीची हत्त्या नसून तो लोकशाहीचाही खून आहे हे समाजाला देखील आपलयला पटवून द्यावे लागेल.आम्ही आमच्या पातळीवर ही लढाई लढतो आहोतच ती अधिक व्यापक व्हावी एवढीच माझी अपेक्षा आहे.
एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here