एखादी दुर्घटना घडून गेल्यानंतर त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी मंत्र्यांमध्ये स्पर्धा लागलेली असते.अनेक वरिष्ठ मंत्री येत राहिल्याने बचाव आणि शोध कार्य सोडून प्रशासनाला मंत्र्यांच्याच मागे पुढेःधावावे लागते त्यामुळे मुळ कार्यात व्यत्यय येतो.महाड दुर्घटनेनंतर नेमके हेच होताना दिसत आहे.महाड दुर्घटनेला आज सात दिवस झाले असून आतापर्यंत 26 मृतदेह हाती लागले आहेत.सरकार असा दावा करीत आहे की,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शोध कार्य सुरू आहे.मात्र काल दिवसभरात एकही मृतदेह शोधण्यात किंवा गाड्यांचे सांगाडे शोधून काढण्यात शोध यंत्रणांना यश आलेले नाही.असं सांगितलं जातंय की,आणखी किमान वीस मृतदेह शोधण्याचं काम बाकी असून दोन बस आणि अन्य खासगी वाहनंही सापडलेली नाहीत.त्यामुळे गेली सात दिवस आपल्या बेपत्ता नातेवाईकाचा शोध घेण्यासाठी सावित्रीतिरी बसलेल्या नातेवाईकांचा संयम सुटला आहे. लवकर तपास लागला नाही तर आम्ही आता मुंबई-गोवा महामार्ग रोको आंदोलन करू असा इशाराच त्यांनी दिला आहे.आता नदीचं पाणी उतरलं असल्याने शोध मोहिम अधिक गतीशील व्हायला हवी होती मात्र तसे होताना दिसत नाही असा नातेवाईकांचा आरोप आहे.मंत्री येतात,नव्या पुलावर उभे राहतात किंवा नौदलाच्या बोटीतून फेरफटका मारतात,कलेक्टर आणि एस.पी.तसेच अन्य प्रशासकीयअ अधिकारी त्यांच्या मागे-पुढे करण्यात वेळ घालवितात त्यामुळे शोध मोहिमेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मंत्र्यांना आवरा अशी तळमळ हे नातेवाईक व्यक्त करीत आहेत.नातेवाईकांचा आक्रोश खराच आहे.एकदा मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळास भेट दिल्यानंतर अन्य मंत्र्यांनी तेथे येण्याचे काहीच कारण नाही.पालकमंत्री,परिवहन मंत्री,बांधकाम मंत्री यांच्याशी संबधित हा विषय आहे आणि ते सारे येऊन गेले आहेत.त्यामुळे आतातरी मंत्र्यांनी आपले दौरे आवरते घेऊन प्रशासनाला त्यांचे काम करू द्यावे अशी मागणी होत आहे.या संबंधात स्पष्ट धोरण तयार करण्याचीच गरज आहे.एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी कोणी कोणी भेट द्यायची याबाबत निश्चित धोरण तयार करण्याची वेळ आता आली आहे.एखादी दुर्घठना घडल्यानंतर लोकप्रितनिधी तर तेथे गर्दी करून चमकोगिरी करतातच त्याच बरोबर असंख्य नागरिकही तेथे गर्दी करून कामात व्यत्यय आणतात हे थांबले पाहिजे अशी आता मागणी होत आहे-महाड दुर्घटनेचं आणखी बरंच शोध कार्य बाकी आहे.ज्या पध्दतीनं काम सुरू आहे ते बघता सरकार े काम अर्ध्यावर सोडून आता उर्वरित मृतदेह मिळत नसल्याचे जाहिर करून मोकळे होते की काय अशी भिती आता नातेवाईक व्यक्त करू लागले आहेत.त्यामुळे एनडीआरएफच्या ऐवजी भारतीय लष्कराला पाचारण केले जावे अशी त्याची रास्त मागणी आहे.सरकारने त्यादृष्टीने विचार करण्याची गरज आहे.
“राजापूर येथील प्रमोद सुर्वे यांना याबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. याठिकाणी येणारे मंत्री महोदय केवळ पुलाजवळ फोटो सेशन करून मीडियाशी बोलून जात आहेत. मात्र एकाही मंत्र्याने बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांची याठिकाणी भेट घेतलेली नाही, शोधकार्य करणारे एनडीआरएफचे जवान आता मृतदेह शोधूनही सापडत नसल्याने थकलेले आहेत, त्यामुळे केंद्र शासनाने याठिकाणी नव्याने फौज पाठवून शोधकार्य करावे, अशी मागणीही या नातेवाइकांनी ठाकरे यांच्याकडे केली”. प्रमोद सुर्वे