सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला,डॉ.निरगुडकर,विनोद यादव यांना दिलेल्या धमक्यांचा निषेध 

पत्रकारांवरील वाढते हल्ले,

पत्रकारांची सोमवारी खारघर येथे जोरदार निदर्शने 

मुंबईः डीएनए या इंग्रजी दैनिकाचे पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावर शुक्रवारी झालेला जीवघेणा हल्ला,झी-24 तासचे मुख्यसंपादक डॉ.उदय निरगुडकर आणि भास्करचे प्रतिनिधी विनोद यादव यांना दिल्या गेलेल्या धमक्या तसेच राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्लयांचा निषेध करण्यासाठी आणि पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने सोमवार दिनांक 3 एप्रिल रोजी खारघर येथे निदर्शने करण्यात येत आहेत.खारघर येथील उत्सव चौकात सकाळी 11 वाजता ही निदर्शने कऱण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की,मुंबई,नवी मुंबईसह राज्यातील पत्रकांंवर होणार्‍या हल्ल्यांमध्ये चिंताजनक वाढ झालेली आहे.टीव्हीवरच्या टॉक शो तील मतं पटली नाहीत,पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारला,आपल्या विरोधात बातमी दिली जाण्याची शक्यता आहे असे गृहीत धरून  पत्रकारांवर हल्ले होत आहेत किंवा त्यांना धमक्या दिल्या जात आहेत.पत्रकारांवर हल्ले करून दहशत निर्माण करण्याच्या वाढत्या घटनांमुळं पत्रकारांना निर्भय वातावरणात काम कऱणं अशक्य होत असल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा संताप आहे.सुर्यवंशी यांच्यावरील हल्ल्यानंतर तर राज्यातील पत्रकारांनी तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत.पत्रकारांच्या या संतप्त भावनांना निदर्शनांच्या माध्यमातून वाट करून देण्यासाठी ज्या ठिकाणी सुर्यवंशी यांच्यावर हल्ला केला गेला त्या खारघरमध्येच निदर्शने केली जाणार आहेत.यावेळी ठाणे,रायगड,नवी मुंबई,मुंबई,पुणे येथून किमान 300 पत्रकार आंदोलनात सहभागी होणार आहेत. दंडाला काळ्या फिती  लावून पत्रकार हल्ल्याचा ,धमक्यांचा   निषेध करतील.त्यानंतर पत्रकारांचे एक शिष्टमंडळ कोकण भवन येथे जावून विभागीय आयुक्त तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सुर्यवंशी यांच्यावरील हल्लेखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी करतील तसेच पत्रकार संरक्षण कायदा करावा असाही आग्रह धरला जाईल.

पत्रकारांच्या अस्मितेची ही लढाई असल्यानं जास्तीत जास्त संख्येनं पत्रकारांनी या लढ्यात सहभागी व्हावे कारण ‘आज सुर्यवंशी जात्यात आहेत तर तुम्ही-आम्ही सुपात आहोत’ ,हे सर्वांनी लक्षात घेत सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने  केले  आहे. या आंदोलनात मुंबई,नवी मुंबई,ठाणे,रायगड जिल्हयातील पत्रकार आणि पत्रकार संघटना मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here