खारघरः डीएनएचे वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी आणि त्यांचे मित्र संतोष फटाटे यांच्यावर हल्ले करणारे भाजपचे कार्यकर्ते होते असे वृत्त स्थानिक दैनिक कर्नाळाने दिले आहे.हल्लेखोरांची नावे देखील कर्नाळाने दिली असून ती अशी आहेत.मनोज आंग्रे,भार्गव ठाकूर,अनिल भगत,आणि प्रशांत ठाकूर .हल्लेखोरांची नावे समोर आली असली तरी त्यांना अद्याप अटक झालेली नाही हे विशेष.
महापालिका निवडणुकांच्यादृष्टीने भाजपचे कार्यकर्ते सुधीर सूर्यवंशी राहतात त्या सोसायटीत परवानगी न घेता आले होते.त्याला सुर्यवंशी यांनी आक्षेप घेतला होता.सुर्यवंशी हे या सोसायटीचे चेअरमन आहेत.नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत सूर्यवंशी विजयी झाले होते.या दोन्ही घटनाची पार्श्‍वभूमी सूर्यवंशी यांच्या हल्ल्यामागे असल्याचे अन्य स्थानिक दैनिकांच्या बातम्यात म्हटले आहे.सुर्यवंशी यांच्यावरील हल्ला एवढा जीवघेणा होता की त्यांच्या उजव्या हाताचे हाड तुटले आहे.त्याच्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.त्यांच्या पायालाही जबर मार लागला आहे.हॉकी स्टीक आणि बेस बोलच्या बॅटचा हल्लेखोरांनी सर्राश वापर केला आहे.हाय प्रोफायईल पत्राकारावर हल्ला झाल्याने पोलीस यंत्रणाही कामाला लागली.वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.मात्र हल्लेखोर भाजपचे कार्यकर्ते आहेत हे दिसल्यावर असेल कदाचित मात्र पोलिसांना अध्याप आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही
उदय निरगुडकर आणि विनोद यादव या दोन पत्रकारांना आलेल्या धमक्या आणि पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी करण्यासाठी काल आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो.साडेबाराच्या सुमारास आम्ही कायद्याचा आग्रह धरत असतानाच खारघरमध्ये हा हल्ला झाल्याचे वृत्त आले.हा योगायोग समजायचा की,पत्रकारांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठीच हे टायमिंग नक्की केले होते हे कळायला मार्ग नाही.मात्र तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा,निषेध करा,किंवा आंदोलनं करा आमचं कोणीच काही करू शकत नाही हे दाखविण्याचा प्रयत्न काही हितसंबंधी सातत्यानं करीत असतात.हल्लेखोर उद्या पकडले तरी त्यांच्यावर एनसी वगैरे दाखल होईल आणि ते पत्रकारांना वाकुल्या दाखवत ताठ कॉलरने पुन्हा समाजात वावरत राहतील.पत्रकार संरक्षण कायदा झाला तर हा आणि हल्ला नॉन बेलेबल गुन्हा ठरविला गेला तर किमान चार-दोन दिवस अशा आरोपींना पोलीस कोठडीची हवा खावी लागेल.त्यामुळंच तातडीनं कायदा व्हावा लागेल आणि त्यासाठी सरकारवर सर्वांना दबाब वाढवावा लागेल हे नक्की.

दरम्यान पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी उद्या खारघर येथे जाऊन सुधीर सूर्यवंशी यांच्या तब्येतीची विचारपूस करतील तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनाही हे पदाधिकारी भेटतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here