छत्रपती शिवाजी महाराज याचं भव्य स्मारक अरबी समुद्रात उभं करण्याचं नियोजन आहे.त्यासाठी शंभर कोटींचा चुरडा होणार आहे.पुढच्या महिन्यात होणार्या रायगड महोत्सवावरही कोट्यवधी रूपये उधळून कृतिम इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणारय. या सार्या उधळपट्टीबद्दल (?) “कोणतंही भाष्य करणं म्हणजे थेट शिवरायांना विरोध” असा सोयीस्कर अर्थ काही मंडळी काढत असल्यानं त्यावर फारसं कोणीच बोलत नाही.”जनतेचं हे मौन म्हणजे आपण जे करतो त्याला पाठिबा” असाही मग मतलबी अर्थ काढून हे उद्योग पुढे रेटले जातात.जी जिवंत स्मारकं आहेत ,ज्या वास्तू शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आहेत त्याची उपेक्षा करायची आणि केवळ भावनेचं राजकारण करीत लोकांना झुलवत ठेवायचे असे प्रयत्न होताना दिसताहेत.मध्यंतरी शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडावरील “अंधार” रायगडच्या पत्रकारांनी जगासमोर आणला होता.त्यानंतर तात्पुरती मलमपट्टी झाली पण रायगडाचीही उपेक्षा संपलीय असं झालेलं नाही.राजधानीच उपेक्षित आहे म्हटल्यावर इतर गडकिल्ले आणि जलदुर्गांची अवस्था तर विचारायलाच नको.हे सारे गडकिल्ले,जलदुर्ग पुरातत्व विभागाच्या “कब्ज्यात” आहेत.पुरातत्व विभागाची तर्हा अशीय की,स्वतःही काही करायचं नाही इतरांनाही काही करू द्यायचं नाही.(वासुदेव बळवंत फडके याच्या शिरढोण येथील वाड्याची दुरूस्ती करण्यासाठी परवानगी घेताना स्थानिकांना पुरातत्व विभागाच्या किती नाकदुर्या काढाव्या लागल्या हा इतिहास ताजा आहे.) पुरातत्व विभाग काय करतोय? असा प्रश्न विचारण्याचीही सोय नाही कारण उत्तर ठरलेले आहे , निधीचा अभाव आहे,मनुष्य बळाची वानवा आहे वगॆरे .त्यांच्या या उत्तरात त्यांची निष्क्रीयता डोकावत असते.जे रखवालदार आहेत तेच निद्रिस्त आहेत म्हटल्यावर त्या मालमत्तेचं काय होणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही.ही बेफिकीरी एवढी आहे की,सात-आठ वर्षापूर्वी अलिबागनजिकचा उंदेरी किल्लाच थेट एका धनदांडग्याला विकला गेला होता.बनावट माणसं उभी करून त्याचा दोन कोटीला सौदा झाला.एवढंच नव्हे तर त्याची रजिस्ट्री देखील झाली.रायगडच्या पत्रकारांनी हे प्रकरण उघडकीस आणून त्याचा पाठपुरावा केल्यानंतर कारवाई झाली. तो व्यवहारही रद्द झाला.अटका वगैरे झाल्या.त्यातून किल्ले आणि त्यावरील ऐतिहासिक वस्तू किती असुरक्षित आहेत याचा प्रत्यय आला. किल्ला विकला जातो तरी त्याची खबर पुरातत्व विभागाला लागत नसेल तर किल्ल्यावरील एखादी तोफ चोरीला जाणं हा या विभागाच्या लेखी फारच किरकोळ मामला असणार हे स्पष्टचय.एकट्या रायगड जिल्हयात 31 गडकिल्ले आणि जलदुर्ग आहेत.त्या किल्ल्यांवर काय काय ऐतिहासिक ठेवा आहे याची खबर किंवा मोजदाद पुरातत्व विभागाकडं असण्याची शक्यता कमीच आहे.कारण यातील बहुसंख्य किल्लयांकडे पुरातत्व विभागाचे अधिकारी वर्ष वर्ष फिरकतच नाहीत.अलिबागनजिकच्या सागरगडावर वर्षभरापासून पुरातत्व विभागाचा कोणी कर्मचारी फिरकला नसल्याचंं पायथ्याशी असलेल्या गावकर्यांचं आणि किल्ल्यावर वास्तव्य करून असलेल्या लोकाचं म्हणणं आहे.अलिबागजिकच्या किल्ल्यची ही स्थिती आहे,तर दुर्गम भागातील किल्ल्यांकडं पुरातत्वचे अधिकारी किती दिवसांपुर्वी फिरकले होते हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.तात्पर्य हे किल्ले बेवारस आहेत.किल्लयांवर कोणीही यावं,काहीही करावं,तिथलं काहीही उचलून घेऊन जावं अशी अवस्था आहे.ज्या पद्मदुर्ग किल्ल्यावरील साठ किलो वजनाची तोफ चोरीला गेली तो किल्लाही दुर्लक्षित आहे. जंजिर्याच्या वायव्येस तीन किलो मिटर दूर समुद्रात असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी कोणतंही साधन नाही.त्यामुळं सामांन्य पर्यटक आणि जनता या किल्ल्यावर जाऊ शकत नाही.एखादा उत्सव असताना लोक किल्ल्यावर जरूर जातात पण हे कधीतरी.एरवी हा किल्ला समुद्रात एकाकी असतो.अशा किल्ल्यावरील तोफ जर चोरीला गेली असेल तर त्यामागं माहितीगाराचाच हात असला पाहिजे हे उघड आहे.याची तक्रार वगैरे मुरूड पोलिसात दिली गेली असली तरी पोलिस एक उपेक्षित तोफ चोरीला गेली तर त्याची किती दखल घेतील याची शंकाच आहे.मात्र मुरूड पोलिसांनी हा विषय गंभीरपणे घेतला नाही आणि त्याकडं दुर्लक्ष केलं तर अन्य किल्ल्यावरील तोफा,तोफगोळे,शिलालेख,कोरीव दगडही गायब व्हायला उशीर लागणार नाही.जिल्हयातील 31 किल्ल्यांवर शंभरच्या आसपास तरी तोफा असू शकतील असं इतिहास जज्ज्ञाचं म्हणणं आहे.परंतू या सार्या तोफा उघड्यावर पडलेल्या आहेत.उन,वारा,आणि पावसाचा या तोफांवर तर परिणाम होतोच त्याचबरोबर पर्यटकही तोफांशी छेडछाड करीत असतात.मुरूड जंजिरा किल्लयात असलेल्या कलाल बांगडी या तोफेचा देशात असलेल्या पाच मोठ्या तोफेमध्ये समावेश होतो.ही तोफ धुळखात पडलेली असल्यानं पर्यटक तिच्या अंगा-खाद्यावर खेळत असतात,खोडया काढत असतात,किती मजबूत आहे म्हणून दगडाचे वार त्यावर करीत असतात.हे चित्र नित्याचं आहे.त्यांना रोखण्यासाठी तिथं कोणी नसतं. तशीच अवस्था लांडा कासीम,किंवा चावरी या तोफाची देखील . या तोफा ही जंजिर्यावर उन-पावसाचा मारा सहन करीत पहुडलेल्या आहेत.असं सागतात की,संभाजी महाराजांनी जंजिर्यावर नजर ठेवण्यासाठी बांधलेल्या पद्मदुर्गवर मारा करण्यासाठी कलाल बांगडी तोफ बांधली होती त्या अर्थानं तोफेचे महत्व आणि इतिहास जतन करण्याची गरज आहे.ते होत नाही..जंजिर्यावरील अन्य तोफा आणि पुरातन अवशेष असेच दुर्लक्षित आहेत.किल्लयाची अवस्था हा तर स्वतंत्रपणे लिहिण्याचा विषय आहे.मुरूड तालुक्यातीलच कोर्लईचा किल्ला तर दारूडयांचा अड्डा बनलेला आहे.किल्ल्यावरील तोफा झाडाझुडुपात इतस्ततः विखूरलेल्या आहेत.या तोफा कोणी उचलून नेल्यातर कुणाला पत्ताही लागणार नाही.रेवदंडयाचा किल्ला प्रेमी युगुलाचं भेटण्याचं ठिकाण झालंय,त्याकडंही दुर्लक्ष होतंय. घोसाळगडावर माचीच्या टोकावर तोफ पडलेली आहे.वाघांची चित्रे कोरलेले दगडही तिकडं अस्ताव्यस्त पडलेली दिसतात.अलिबागच्या कुलाबा किल्लयात प्रवेशासाठी पुरातत्व विभाग शुल्क आकारते.हरकत नाही.पण किमान किल्ल्याची अवस्था तरी व्यवस्थित ठेवावी अशी अपेक्षा आहे.तेही होत नाही.कुलाब्यातही तोफा अस्ताव्यस्त ,धुळखात पडून आहेत.पालीच्या सुधागडावरही पुरातन वस्तू आणि शिलालेख उन पावसाचा मारा सहन करीत पडलेले आहेत.जिल्हयातील अन्य किल्लयांमधील स्थिती यापेक्षा फार वेगळी आहे असं समजण्याचं कारण नाही. कोणाचाच लक्ष नसल्यानं किल्ल्यांवरील तोफा उचलून नेणे फार अशक्य गोष्ट नाही.प्रत्यक्षात अनेक तोफा चोरीलाही गेलेल्या असू शकतात.पद्मदुर्गची चोरी उघड झाल्यानं याची चर्चा झाली.यापुर्वा अशी तोफ चोरीला गेली नसेलच असा छातीठोक दावा पुरातत्व विभाग करू शकत नाही,कारण जलदुर्गातील तोफेची चोरी होत असेल तर गड किल्ल्यावरील तोफा चोरून नेणे तुलनेत सोपे आहे..तोफांना मिळणारी किंमत काही लाखात असल्याने आणि तोफा चोरणेही फार कठीण नसल्यानं पद्मदुर्गवर ज्यांनी डल्ला मारले तेच चोरटे किंवा अन्य कोणीही अन्य ठिकाणच्या तोफांवर देखील नजर ठेऊन असू शकतात.त्यामुळं आता तोफांची काळजी हा नवा विषय समोर आलेला आहे.पद्मदुगवरील चोर्रीमुळे हा विषय समोर आलाच आहे तर जिल्हयातील किल्ल्यावरील तोफांची नव्यानं गणना होणं आणि त्या तोफा किमान सुरक्षित ठिकाणी ठेवणं देखील गरजचें झालं आहे. किल्ल्यावरील प्रत्येक दगड,प्रत्येक वस्तूला इतिहास असतो.अशा स्थितीत त्या वस्तूची जेव्हा चोरी होते किंवा हानी होते तेव्हा तो इतिहासच काळाच्या पडद्याआड जात असतो.ही जाणीव ठऊनच गड किल्यांवरील वस्तूंचे रक्षण झाले पाहिजे.रायगडात तर पावलापावलावर इतिहासाच्या खुणा बघायला मिळतात.अनेक मंदिरातील शिल्पे,मशिदी,दर्गे,चर्च आदितून इतिहास डोकावत असतो.रायगडमध्ये एलिफंटा,ठाणाळे,कोंडाणे,कुडे,गांधारपाले,आदि ऩऊ ठिकाणी लेण्या आहेत.मराठीतील पहिला शिलालेख अलिबागनजिक आक्षीत आहे.हा सारा ठेवा जनत करणे आवश्यक आहे.या सर्व वस्तुंना जागतिक बाजारात मिळणारी किंमत मोठी असल्याने अनेक समाजविघातक शक्तीचा त्यावर डोळा आहे.त्यापासून रक्षण करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे हे नक्की.शिवरायांच्या समुद्रात होणार्या स्मारकाला विरोध नाही.शिवरायांच्या स्मारकावर शंभर कोटीच काय हजार कोटी रूपये खर्च केले तरी कोणीच हरकत घेणार नाही.परंतू शिवकालीन जी स्मारकं आहेत ती जपली पाहिजेत.कारण तो कोटयवधी लोकांच्या भावनांशी जोडलेला विषय आहे.कालानुरूप बदलायलाच हवं,त्याबद्दल दुमत नाही.पण हा बदल घडवून आणताना जुन्याचं जतन करण्याचची पाश्चत्याचीं पध्दतही आपण स्वीकारली पाहिजे. नवी स्मारकं आपण उभी करू पण कोसळत जाणार्या गड किल्ल्याच्या भिंती परत उभ्या करता येणार नाहीत,चोरीला गेलेल्या तोफा पुन्हा निर्माण करून त्या किल्ल्यावर ठेवता येणार नाहीत .इतिहास उलगडून दाखविणारे शिलालेखही पुन्हा मिळणार नाहीत.म्हणून भिडेगुरूजींसारखे शिवप्रेमी गड किल्ल्याचं जनत करण्याचाच आग्रह धरतात.तो चुकीचा नाही कारण ते आपलं वैभव आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.या वैभवाची हेळसांड करणारे इतिहासाचे शत्रू आहेत.त्यांना एकच शिक्षा असू शकते.त्यांना तोफेच्या तोंडी दिलं पाहिजे.
एस.एम.देशमुख