गणपतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

0
783

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याचा प्रवास सुखकर आणि विनाव्यत्यय व्हावा यासाठी सरकारने चोख व्यवस्था केली आहे.वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्या म्हणजे 25 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 29 ऑगस्ट रात्री आठ वाजेपर्यत ज्या वाहनांची वजन क्षमता 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा सर्ववाहनांना पनवेल ते सावंतवाडीपर्य़त मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे.त्याच बरोबर 30 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या काळावधीत सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यत अवजड वाहनांना महामार्गावरून जाता येणार नाही.वाऴू ,रेतीचे ट्रक यांना पूर्णतः बंदी असणार आहे.मात्र जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून दूध,डिझेल-पेट्रोल,स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर भाजीपालासारख्या जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मात्र या बंदीतून सुट देण्यात आली आहे.

वाहतुक कोंडी टाळण्याच्या अन्य उपायांमध्ये मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.त्यामध्ये मुंबई-वाशी-पामबीच,उरण फाटा,खारपाडा,वडखळ,महाड 2) मुंबई – द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाका मार्गे-पेण -महाड 3)मुंबई-खालापूर-पाली फाटा-वाकण- माणगाव- महाड 4)मुंबई-पनवेल-वडखळ- पेझारी-नागोठणे-माणगाव-महाड असे चार पर्यायी मार्ग रायगड जिल्हयातले आहेत.दक्षिणेतून येणा़ऱ्या वाहनांनी कोल्हापूर मार्गाचा अवलंब कऱण्याचे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून कऱण्यात आलं आहे.
कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी एस.टी.महामंडळानं देखील जय्य्त तयार केली असून नियमित गाड्या खेरीज 1 हजार 895 जास्तीच्या गाड्या महामार्गावरू धावणार आहेत.आजपासून 28 ऑगस्टपर्यत या जादा गाड्या चालविल्या जातील.26 ऑगस्टला 473 आणि 27 ऑगस्टला 1158 अतिरिक्त सोडण्यात येणार आहेत.मुंबई-बोरिवली-दादर ,पालघर,ठाणे येथून या गाड्‌या सोडण्यात येणार आहेत.या गाड्या रायगड जिल्हयातील अनेक गावांपर्यत असतील.त्यासाठी संगणकीय आरक्षणाची व्यवस्था कऱण्यात आल्याचे एस.टी.महामंडळाच्यावतीनं स्पष्ट कऱण्यात आलं आहे.एस.टी.महामंडळाबरोबरच कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर एसी रेल्वेसह अनेक अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहे.या सर्व व्यवस्थेमुळे चाकऱमान्यांचा यावर्षीचा प्रवास सुखकर होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

पेणमध्ये गणपतीची लगबग
गणपतीचे आगमन जेमतेम पाच दिवसांवर आलेलं असतानाच पेण नगरीमधील गणपतीच्या स्वागताची लगबग वाढली आहे.पेणचे गणपती यापुर्वीच देश-विदेशात रवाना झाले असले तरी अतिरिक्त मागणीचा आता पुरवठा होताना दिसतो आहे.त्यामुळेच गुरव आळी,कासार आळी,तरे आळी,कोंबड पाडा आदि पेणमधील भागात गणपतीसाठीचे ट्रक्स उभे असलेले दिसत आहेत.पेणला गणपतीची शंभर वर्षांची परंपरा असली तरी आता हा उद्योग पेण शङराप्रमाणेच ग्रामीण भागातही पसरला असल्याने गणपतीच्या मागणीचा पुरवठा करणे शक्य होत आहे.असा अंदाज आहे की,यंदा पेण आणि परिसरात 18 लाखावर गणेशमूर्ती तयार केल्या गेल्या आहेत.गेली काही वर्षेपेणमध्ये इकोफ्रेंन्डली गणपती तयार कऱण्याचे प्रयत्न होताना दिसतात.त्यासाठी साडूची माती,कागदी लगदा आदिंचा वापर केला जात आहे.या मूर्ती पाण्यात लगेच विरघळतात असं मूर्तीकारांचं म्हणणं आहे.हजारो कारागिरांना आणि पेणकरांना रोजगार देणाऱ्या गणेश मूर्ती कारखान्यांची वार्षिक उलाढालही काही कोटींच्या घरात पोहोचली आहे.मात्र दरवर्षी वाढणारे कच्च्यामालाच्या भावामुळे गणेशमूर्तीच्या किंमतीही सातत्यानं वाढताना दिसतात.यंदाही गणपती मूर्तीच्या दरात किमान 25 टक्के वाढ झाली आहे.हा व्यवसाय आता पेणच्या घरा घरात पोहोचला असला तरी सरकारकडून मात्र पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याची कारखानदारांची तक्रार आहे.सरकारने गणपती निर्मिती उद्योगाला कुटीर उद्योगाचा दर्जा देऊन त्यादृष्टीने मदत करावी अशी मागणी होत आहे.कारखान्यासाठी सवलतीच्या दराने वीज,पाणी,जागा,कच्चा माल उपलब्ध करून द्यावा अशीही मूर्ती कारखानदारांची मागणी आहे.
राजकीय हालचालींना वेग

– 13 सप्टेंबर रोजी जिल्हयातील चौदा पंचायत समिती सभापतींच्या होत असलेल्या निवडणुका,त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्षांची होत असलेली निवडणुक आणि नंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे जिल्हयातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आलाय.निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मेळावे,सभां आणि बैठकांचा धडाका लावला आहे.गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉग्रेसनं माणगाव आणि अलिबाग इ ंथं मेळावा घेऊन प्रचाराला सुरूवात केली

आहे.माणगावला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टिकास्त्र सोडतानाच सुनील तटकरे यांच्या लोकसभेतील पराभवास श्रीवर्धनकर जबाबदार असल्याचं मत व्यक्त केलं.अजित पवार यांच्या या वक्तव्यावर जिल्हयात उलट-सुलट र्चाा सुरू आहे.अलिबाग येथील मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीला जिल्हयात चार जागा हव्या आहेत असा आग्रह धरला.त्यांनी अलिबागच्या जागेचे नाव घेतले नसले तरी राष्ट्रवादीचा अलिबागवरही डोळा असल्याची च र्चा सुरू झाली आहे.अलिबागची जागा कॉग्रेसकडं आहे.
– शिवसेनेचाही मेळावा नुकताच अलिबागला संपन्न झाला.केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते,अनंत तरे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केलं.रायगडमधील विधानसभेच्या सातही जागा महायुती लढविणार असून विधानसभा अ थवा जिल्हा परिषदेत शेकापसह कोणत्याही पक्षांशी युती कऱणार नसल्याचं अनंत गीते यांनी स्पष्ट केलं.
जिल्हयाच्या राजकाऱणात एकाकी पडलेल्या शेकापने आता पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीच्या दिशेने प्रयत्न करायला सुरूवात केली असून शेकाप राज्यातील 36 जागा लढविणार असल्याचं शेकापनेते जयंत पाटील यांनी जाहीर केलंय.शेकापला खटारा हे जुने निवडणूक चिन्ह परत मिळाल्यानं त्याचा आम्हाला फायदा होईल असं शेकाप नेते सांगतात.शेकापनंही पेण इ थं नुकताच पक्षाचा मेळावा घेऊन तेथील विद्यमान आमदार धैर्यशील पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

पंतप्रधानांचा रायगड दौरा
उरण तालुक्यातील जेएनपीटी येथील विशेष आर्थिक क्षेत्राची पायाभरणी आणि जेएनपीटाला जोडणाऱ्या महामार्गाच्या आठपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कऱण्यात आला.यावेळी बोलताना त्यांनी कोकणातील बंदरांचा विकास कऱण्याची आणि सेझ आणि अन्य प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारात स्थानिकांना अधिक संधी देण्याची घोषणा केल्याने स्थानिक जनतेनं आनंद व्यक्त केला.यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे वाटप कऱण्यात आले.या कार्यक्रमास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,अनंत गीते आदि उपस्थित होते.पंतप्रधानांनी आपलं भाषण मराठीत सुरू केल्यानं त्यांनी उपस्थितांची मनं जिकल्याचं दिसलं.

रायगड जिल्हा वार्तापत्र – शोभना देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here