नव्या इनिंगचा “अन्वयार्थ”

1
1404

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे मी मराठीचे सल्लागार संपादक म्हणून रुजू होत असल्याची बातमी आहे.( त्याबद्दल त्यांनी आणखी ट्टिट केलेलं नाही) या बातमीचं स्वागत करायचं की,या बातमीकडं दुर्लक्ष करायचं हे वागळे याच्या अनेक हितचिंतकांना कळलेलं नाही.एक तर सल्लागार संपादक या पदाला काही अर्थ नाही.जे विद्यमान मुख्यसंपादक आहेत त्यांनी सल्ला विचारला तर सल्ला द्यायचा, असा त्याचा एक अर्थ असतो. अनुभव असा आहे की,मुख्य संपादक असा सल्ला कोणाला विचारण्याच्या भानगडीत पडत नाहीत.ते स्वतःचा निर्णय स्वतः घेतात.तेवढी क्षमता आणि पात्रता त्यांच्यात असते म्हणून तर ते मुख्य संपादक असतात(असे किमान मानले जाते)   .त्यामुळं सल्लागार संपादक या पदाला केवळ शोभेच्या पदाखेरीज काही अर्थ नाही.कोणत्याही सेवेत नसलेल्या संपादकांना हातात काही तरी माध्यमं हवं असतं आणि मालकांनाही चेहरा हवा असतो.अशा स्थितीत सल्लागार संपादक हे पद दोघांचीही गरज भागविते. त्यातून अशा तडजोडी होताना दिसतात. या अगोदर ज्येष्ट पत्रकार कुमार केतकर हे मी मराठीचे सल्लागार संपादक होते.त्यांनी संपादक किंवा व्यवस्थापकांना किती सल्ले दिले ? ,त्यांचे सल्ले किती ऐकले गेले? , त्या सल्लयाचं काय झालं?  किंवा वाहिनीला त्यांच्या सल्ल्याचा किती फायदा झाला हे समोर आलेलं नाही.तसेच कुमार केतकर यांना खो देऊन निखिल वागळे तेथे जात आहेत की,दोन सल्लागार संपादक असणार आहेत हे देखील स्पष्ट झालेलं नाही.याशिवाय आयबीएन -लोकमतमध्ये निखिल वागळे यांच्याबरोबर मतभेद झाल्यानं जी मंडळी सोडून गेली त्यातील काहीजण आज मी मराठीच्या संपादकीय टीममध्ये आहेत.अशा स्थितीत निखिल वागळे आणि त्यांची जुनी टीम याच्यात नव्या ठिकाणी किती सुसंवाद राहिल हा देखील कळीचा मुद्दा आहे.(मी मराठीत सध्या कार्यकर्ता संपादकापेक्षा क्रियाशील संपादक महत्वाचा असतो असा विचार व्यक्त कऱणारेही काही मान्यवर आहेत.निखिल वागळे कार्यकर्ता संपादक आहेत त्यामुळं है वैचारिक व्दंव्दही तेथे येत्या काही दिवसात  बघायला मिळेल,)
दुसरा मुद्दा असाही आहे की,मी मराठी म्हणजे आयबीएन-लोकमत नाही.तिथं अनेक मर्यादा आहेत.प्रक्षकांची संख्याही फारच अत्यल्प आहे.अनेकांना हे चॅनल आहे हेच माहिती नाही.अशा स्थितीत तिथं जाऊन निखिल वागळे मी मराठीचा फार काही कायापालट करतील अशी अजिबात शक्यता नाही.आयबीएन-लोकमतच्या नावाशी निखिल वागळे यांचं नाव जोडलं गेलेलं होतं.ती उंची किंवा तो दबदबा मी मराठीत निखिल वागळे निर्माण करू शकतील अशी शक्यता कोणालाच वाटत नाही.
तिसरा आणि महत्वाचा मुद्दा असा की,मी मराठीच्या मालकांबद्दल अनेक प्रवाद असल्याचं बोललं जातं आहेत.स्वतः निखिल वागळे देखील त्याबद्दल मतप्रदर्शन करायचे पण आज त्यांना तेथेच संल्लागार म्हणून जावे लागत आहे.अशा स्थितीत तेथील वातावरण वागळे यांना कितपत भावेल ? ,मालकांचे हितसंबंध सांभाळणे वागळे यांना शक्य होईल का ? असेही काही प्रश्न निर्माण होतात.या साऱ्या परिस्थितीत निखिल वागळे यांची नवी इनिंग कितपत प्रभावी राहिल हा पाहण्यासारखा विषय आहे.
अर्थात या साऱ्या गोष्टींबद्दल निखिल वागळे अवगत नसतील असं अजिबात नाही.त्यांना सारं माहिती असलं तरी पत्रकारांना आयुष्यात ज्या तडजोडी स्वीकाराव्या लागतात तशी तडजोड निखिल वागळे यांनाही स्वीकारावी लागत आहे एवढाच त्यांच्या नव्या इनिंगचा अर्थ आहे.निखिल वागळे आयुष्यभर वाघासारखे राहिले.मात्र हातात कोणतेही माध्यम वा साधन नसेल तर काय होते याचा अनुभव घेण्याची वेळ बहुतेक संपादकांवर कधी ना कधी येतच असते.वागळे सध्या त्या अवस्थेतून जात असताना त्यांना जास्त काळ प्रवाहाच्या बाहेर राहून चालणारे नव्हते,त्यामुळंच त्यांनी नाईलाजाने  नवी असाईनमेंट स्वीकारली असावी असे म्हणता येईल.पुढे आणखी एखादी चांगली संधी येईपर्यत ते मी मराठीचा आधार घेतील असं दिसतंय.
मालकांबलच्या प्रवादाबद्दल म्हणाल तर जे हा मुद्दा उपस्थित करतात त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,ट्रायनं काहीही सांगितलेले असले तरी माध्यमं आता धंदा झालेला आहे.त्यासाठी भांडवलही प्रचंड लागते.त्यामुळं हा व्यवसाय पुर्णतः भांडवलदारांच्या हाती गेलेला आहे.आपल्या व्यवसायांना संरक्षण म्ङणून विविध व्यावसायिक,राजकारणी माध्यमं सुरू करीत आहेत.त्यात डान्सबार किंवा तत्सम व्यवसायातील लोकही आले.त्यामुळं कोण्या एका मालकाबद्दल नाकं मुरडण्याचं काऱण नाही.अगदी निष्कलंक चारित्र्याचा मालक शोधायचा म्हटलं तर ते अशक्य आहे.असा हट्ट धऱणाऱ्या बहुसंख्य संपादकांना मग आय़ुष्यभर घरीच बसावे लागेल.अशी सारी स्थिती आहे.त्यामुळं मालक कोण आहेत ,त्यांचे उद्योग काय आहेत यापेक्षा आपण निष्टेनं पत्रकारिता करतो की,नाही आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या किमान अपेक्षा आपण पूर्ण करतो की,नाही हे प्रत्येक संपादकानं पाहिलं पाहिजे.मला वाटतं आज ज्यां मालकांबद्दल विविध प्रवाद आहेत अशा मालकांकडं जे संपादक काम करतात ते हाच दृष्टीको़ण डोळ्यासमोर ठेऊन काम करत असले पाहिजेत.निखिल वागळे यांनी देखील हाच विचार करून नव्या इनिंगला सुरूवात करायचं ठरविलेलं असावं.त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांच्यावर टिकेची झाडही उठविली जाईल.कारण त्यांची पार्श्वभूमी चळवळीतल्या पत्रकार,संपादकांची आहे.लोकांच्या त्यांच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत.पण मला त्यांनी घेतलेल्या निर्णयात गैर काही वाटत नाही.याचं कारण मी मराठीच्या माध्यमातूनही ते लोकांना न्याय मिळवून देण्याचा,किंवा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या चळवळींना बळ देण्याचा किंवा मदत कऱण्याचा मर्यादित स्वरूपात का होईन नक्कीच प्रय़त्न करू शकतात.
जाता जाता एकचं सांगावं वाटतंय की,निखिल वागळेंबद्दल अनेकांची अनेक मतं असताली पण पण ते हाडाचे पत्रकार आहेत ,लोकांच्या प्रश्नांबद्दल तळमळ असणारे पत्रकार आहेत हे विसरता येणार नाही.जो हाडाचा पत्रकार असतो तो त्र्याग्यानं अनेकदा गर्दीपासून दूर जाण्याची  भाषा करतो मात्र त्याला गर्दीची ओढ कायमच असते.
त्यामुळं त्यांनी गर्दीपासून दूर जाण्याचा आपला निर्णय स्थगित ठेवलेला दिसतोय.त्याचं स्वागत करीत असतानाच निखिल वागळे यांच्या नवीन इनिंगला आम्ही मनःपूर्वक शुभेच्छा देत आहोत..( एस.एम.)

1 COMMENT

  1. हाडाचे आहेत विचारसरणीचे नाहीत हे समजते 😉

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here