आपण पत्रकार डरपोक आहोत…

0
883

मी सोलापूरला असतानाची एक घटनाय.एका संस्थेनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस दिला नाही म्हणू आम्ही त्याची चार कॉलम बातमी करून छापली होती.दुसऱ्या दिवशी संबंधित संस्थाचालकाचा मला फोन आला,मला तो म्हणाला, “तुम्ही जिथं काम करता त्या संस्थेनंही बोनस दिलेला नाही हे मला माहिती आहे.तुम्ही त्याची बातमी देणार की,संस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठविणार बोला काय करणार ते”? …मी काहीच बोलू शकलो नाही..करूही शकलो नाही…

मी निरूत्तर झालो.जगाची उठाठेव करणारे आम्ही,जगात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कसलीही तमा न बाळगता आवाज उठविणारे आम्ही आमच्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा सर्वात गरीब प्राणी होत असतो.निर्भय,निर्भिड,बिनधास्त,हे आमचे आवडते शब्द.विषय इतरांचा असतो तेव्हा या शब्दांना आम्ही  “जागतो” आपला विषय आला की निरूत्तर होतो हे वरील उदाहरणावरून आपणास दिसेल.पत्रकारांसारखा डरपोक माणूस अन्य कोणी नाही.हे वास्तवही प्रत्येक पत्रकाराला माहिती असते.अनेकजण ते मान्य मात्र करीत नाहीत.हा भाग वेगळा.
अलिकडच्या काळात राज ठाकरे असतील,नरेंद्र मोदी असतील किंवा अन्य काही पुढारी,त्यांच्या मुलाखती घेणाऱ्या पत्रकाराना काय काय बोलले, ? वाट्टेल ते बोलले.कोणीही निषेधाचा शब्दही उच्चारला नाही. किंवा यापुढं मी संबंधित पुढार्यांची कधी मुलाखतही घेणार नाही असं कोणीही जाहीर केलं नाही.बरं हे कोणाच्या बाबतीत घडलं?  तर पत्रकारितेत नव्यानं येणारे ज्यांना आपला आयकॉन समजतात त्यांच्या बाबतीत.तरी पत्रकारितेत सारी सामसूम..सारे डरपोक .जेवढे मोठे ते अधिक डरपोक.त्यापेक्षा आमचे खेड्या-पाड्यातले पत्रकार अधिक स्वाभिमानी.अधिक जागरूक.
आणखी एक मुद्दा.सध्या मजिठिया आयोगाच्या अंमलबजावणीचा विषय माध्यमात चर्चिला जातोय.मिजिठिया आयोगाची शिफारशीची अंमलबजावणी कऱण्याचा आणि मागील सारे ऍरियर्स देण्याचा आदेश सुप्रिम कोर्टानं 7 फेबु्रवारी रोजी दिलाय.अजूनही 90 टक्के माध्यमांच्या मालकांनी मजिठिया लागू केलेला नाही.अनेकांनी तर आपल्या कर्मचा़ऱ्यांना ” जा देणार नाही असं सागून आवाज उठवाल तर नोकऱ्या गमवाल”  असं बजावलं.हल्ली नोकरीसाठी सारेच लाळघोटेपणा करतात हे खरंय.हक्काचं बोलू तर आहे त्या पगारावरही पाणी सोडावं लागेल.त्यामुळं सारे श्रमिक एकजात गप्प आहेत.त्याचे पुढारीही आफत नको म्हणून तोंडाला कुलूप लावून आहेत.त्यामुळं ” मजिठियाची अंमलबजावणी करा”  अशी मागणी घेऊन कोणीच पुढं यायला तयार नाही.मालक याचा लाभ उठवताहे.आपण एक नाहीत आणि प्राध्यापकांसारखे सुखवस्तू झालोत हे मालकांनी हेरलेलं आहे.त्यामुळं करता येईल तेवढा अन्याय ते आपल्यावर करत असतात.मला वाटतं माध्यमात जेवढा अन्याय होतोय तेवढा क्वचितच अन्य कोणत्या क्षेत्रात होत असेल.हे सारं निमूटपणे आपण ऑफिसात सहन करतो आणि बाहेर येऊन आपण वाघाच्या थाटात वावरत असतो.आपण कागदी वाघ झालोत.मालक मजिठिया लागू करत नसतील तर तो न्यायालायचा अवमान आहे पण हे न्यायालयाच्या कोणी लक्षात आणून द्यायला तर हवं ना..तेवढं धाडस नोकरी जाईल ही भिती बाळगणाऱ्या कोणामध्येच नाही.शोकांतिका आहे सारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here