’मी पत्रकार आहे हे सांगायची लाज वाटते’ म्हणणार्‍यांनो…

1
1830

गडा खरं तर दोन पिढ्यातला.नवी पिढी बेजबाबदार ( थोडक्यात बिघडलेली ) कशी आहे याची टेप लावणं आणि ‘आमच्या काळात असं नव्हतं’ म्हणत स्वतःच्या असलेल्या- नसलेल्या मोठेपणाच्या टिमक्या वाजविणं ही जगरहाटी आहे.सार्‍याच क्षेत्रातले डुढ्ढाचार्य ही टेप लावत असतात.पत्रकारितेतही अशी काही मंडळी आहे.त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात केलेली कामं नक्कीच उल्लेखनिय असतील.त्यांनी पत्रकारिताही निष्ठेनं केलेली असेल.ते अगदी धुतल्या तांदळासारखे असतीलही .मात्र आज आपल्यासारखं कुणीच नाही.सारेच बिघडलेले आणि वाईटमार्गी आहेत हा  अहंकारी तोरा   कुणीच मान्य ,सहन करू शकत नाही.’मी पत्रकार आहे असं सांगण्याची लाज वाटते’ हे पालुपद मी मावळत्या पिढीतील किमान दहा-वीसजणांकडून तरी ऐकलं असेल.आजची पत्रकारिता बिघडलीय,सडलीय,वाया गेलीय हा  लाजेमागचा पूर्वग्रहदुषित  दृष्टीकोन असतो.खरं तर मी पण पन्नाशी ओलांडली असल्यानं मी नव्या पिढीचा प्रतिनिधी नाही.तरीही मला मात्र पत्रकारांची नवी पिढी बिघडलीय किंवा सडलीय असं अजिबात वाटत नाही.उलट पत्रकारांची नवी पिढी अधिक परिपक्व,जबाबदार आहे.अशी माझी ठाम धारणा आहे.पत्रकारिता बिघडलीय हा युक्तीवाद चार-दोन उदाहरणानं सिध्द होऊ शकणार नाही.अशी उदाहरणंच द्यायची असतील तर मग ती सार्‍याच क्षेत्राच्या बाबतीत देता येतील.अगदी कुंभ मेळयाच्या निमित्तानं एका  साधुनं आपला विनयभंग केल्याची तक्रार एका महिला साध्वीनं केलेली आहे.बिघडलेल्या पत्रकारितेचा निकष लावायचा तर या एका उदहरणावरून  सारं धार्मिक क्षेत्रही वाया गेलंय असं म्हणणं मग क्रमप्राप्त ठरतं.तशी वस्तुस्थितीय का? नक्कीच नाही. वैद्यकीय व्यवसायाचं पावित्र्यही चार-दोन टक्क्यांनी भ्रष्ट करून टाकलं म्हणून “सारेच डॉक्टर पाच हजार गर्भपात करणारे” आहेत असं  म्हणता येणार नाही.राजकीय बजबजपुरीबद्दल तर न बोललेलंच बरं.चार-दोन टक्के वाटचुके जर सार्‍याच क्षेत्रात असतील तर आम्हालाच आमच्या क्षेत्राची  लाज वाटते म्हणून डोक्याला हात लावण्याची काही गरज    नाही.समाजातील भल्या बुर्‍याचं प्रतिबिंब जसं अन्य क्षेत्रात उमटणार तसंच ते पत्रकारितेतही उमटणार.ते तुम्हाला गृहीत ही धरावे लागेल.हे प्रदूषण दूर करण्याचाही प्रयत्न करावा लागेल.हे प्रदूषण हाताबाहेर गेलंय म्हणत नुसताच आपण ठणाणा करीत राहिलो तर साध्य काहीच होणार नाही.शिवाय  आपलं क्षेत्र जर खरंच एवढं बिघडलेलं आणि सडलेलं असेल आणि  त्याची लाज ज्यांना वाटते अशी मंडळी स्वतःला ज्येष्ठ पत्रकार म्हणून घेत का मिरवतेय? .त्यानी ज्या क्षेत्रात खर्‍या अर्थानं पावित्र्य आहे,जे क्षेत्रं बिघडलेलं नाही अशा क्षेत्रात जाऊन काय दिवे पाजळायचेत ते पाजळत बसावं.मात्र पत्रकार म्हणून मिरवायचं,पत्रकारितेतून मिळणारे ( मग ते केवळ आर्थिकच असतील असे नाही ) लाभ उपटायचे आणि वरती “मी पत्रकार असल्याची मला लाज वाटते” म्हणत मनगट थोबाडावर मारत बसायचे  हा दुटप्पीपणा मला तरी मान्य नाही.ज्यांना असं वाटतं की,आता पत्रकारितेत काही राम उरलेला नाही अशी  महनीय,ज्येष्ठ मंडळी इथ काय करते आहे ?. त्यानी  पत्रकारितेला रामराम ठोकलेलाच बरा.त्यातून त्यांना होणारा मनःस्ताप आणि इतरांना होणारा ताप तरी टळेल.दुःखाची गोष्ट अशी की,हे होत नाही.पत्रकारिताही सोडवत नाही आणि आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे सांगण्याचा सोसही थांबविता येत नाही.आपला नातू जर वाया चालला असेल तर त्याला चार होतोपदेशाच्या गोष्टी सांगून त्याला धर्माच्या मार्गावर आणणं हे आजोबाचं काम असायला हवं.ते ही होत नाही.मार्गदर्शन,हितोपदेश करण्याऐवजी ‘गधडया तू वाया गेलास,तु माझा नातू आहेस हे सागायचीही मला लाज वाटते’ असं जर आजोबा सांगायला लागले तर तो नातू आजोबाच्या या बडबड गीताकडे  लक्ष देण्याची शक्यता कमीच असते.आपल्याकडं असंच चाललंय.बाबांनो,आजचे पत्रकार काही चुकत असतील तर त्यांना काय करावं हे जरा सकारात्मक भूमिका घेत समजावून सांगा ना.नवी पिढी तुमचं नक्की ऐकेल.तसं न करता नेहमीच कानपिळीचे कार्यक्रम तुम्ही आयोजित करायला लागलात तर एक दिवस तुमचे कान उपटायलाही कोणी कमी करणार नाही.शेवटी आरंभी म्हटल्याप्रमाणं हा झगडा जर दोन पिढ्यातला असेल तर दोन पिढ्याच्या विचारात,आचरणात बदल हा होणारचं.मावळत्या पिढीनं तो समजून घेत,नव्या पिढीशी संवाद साधला पाहिजे.समजून घेत या शब्दाचा अर्थ नव्यांबरोबर प्रवाहपतीत व्हावं असाही नाही.आपल्या अवतीभवती काही चुकीचं घडत असेल तर ते संवादाच्या माध्यमातून थांबविण्याचा प्रयत्न कऱणं हा याचा मतितार्थ.तसं न करता ‘आता तुम्ही समजावण्याच्या पलिकडं गेलात’ असं म्हणत आपणच आपल्या पाढीवर थाप मारून घेतल्यानं आपलं मोठेपण सिध्द होत नाही.”मी तेवढा साजूक आणि बाकीचे वाया गेलेले” हा दृष्टीकोनही सोडून द्यावा लागेल.पिढी बदलली म्हणून काय झालं?,आजही निष्ठेनं,एक मिशन म्हणून पत्रकारिता करणारे हजारोच्या संख्यनं लोक आहेत.पत्रकारिता एक धर्म आहे याची जाणीव ठेऊन त्याला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेत काम करणारेही कमी नाहीत.95 टक्क्यांपेक्षा जास्त लोक असे आहेत.ज्या पाच टक्क्यांबद्दल आक्षेप घ्यायला जागा आहे त्याचा दुसर्‍या अंगानं विचार व्हायला हवा.पेड न्यूजची जी भानगड हल्ली चर्चेत असते हे लचांड पत्रकारांचं नाही,ते मालकांनी पत्रकारांच्या मानगुटीवर ठेवलेलं आहे.पैसे मालकांना मिळतात हे सार्‍यांनाच माहिती आहे.बदनाम पत्रकार होतात.त्यामुळे सारे खापर पत्रकारावर फोडून मोकळे होता येणार नाही .  पाच टक्क्यात असे मजबुरीनं बदनाम झालेलेही आहेत.धंदा म्हणून पत्रकारिता करणारे जे कोणी दोन-तीन टक्के असतील त्यांना सारे सज्जन मिळून बाहेरचा रस्ता दाखवू शकतात ना.त्यासाठी स्वयंघोषित तत्वनिष्ठ,नैतिकाचार्य  मंडळींनी पुढाकार घ्यायला हरकत नसावी.मात्र तो मार्ग दीर्घकालीन कष्टाचा असल्यानं तो न अनुसरता ‘साप म्हणून भुई थोपटण्याचा’ साधा,सोपा मार्ग अवलंबिला जात आहे.आपलीच मंडळी आपल्याबद्दलच जाहीरपणे मुक्ताफळे उधळत असल्यानं पत्रकारितेबद्दल जे नाकं डोळे मुरडत असतात त्याचं आयतंच फावतं.बघा,फलाने पत्रकार काय म्हणतात? अशी उदाहरणं तोंडावर फेकली जातात.’कायदा करायला आम्ही तयार आहोत पण तुमच्याच लोकांचा त्याला विरोध आहे” असं म्हणत कायदा करायला टाळाटाळ केली जाते.पत्रकारांना पळविण्याची ही पळवाट आहे.त्याला आम्ही फसणार नाहीत.कारण जे रस्ता चुकलेले आहेत,किंवा जे चुकीच्या मार्गाने निघालेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही कायदा मागतच नाही आहोत जे योग्य रस्त्यावरून चाललेत पण त्यांचा मार्गात जे अडथळे आणतात त्यांना दूर करण्यासाठी आम्ही कायदा मागतो आहोत.मुद्दा उरतो कायद्याच्या दुरूपयोगाचा.कोणत्या कायद्याचा थोडाफार दुरूपयोग होत नाही?.आरटीआय असेल किंवा महिलांवरील अत्याचाराचा कायदा असेल अथवा अन्य कायदे असतील त्यांचा दोन-चार टक्के दुरूपयोग होतोच होतो.सार्‍यांनाच हे माहितंय.दुरूपयोग होतोय म्हणून हे कायदेच चुतील फेकुन द्या अशी मागणी अजून कोणी केली नाही.मग नाही ती भिती दाखवत पत्रकार संरक्षण कायद्याला जो विरोध होतोय त्यामागचा मतलब ध्यानात घेतला पाहिजे.मुळात लोकप्रिय  मागण्याच्या विरोधात पोपटपंची केली की,आपण प्रवाहाच्या विरोधात पोहणारे केसे आहोत हे दाखविण्याची खुमखुमी जरविता येते .मात्र या दुराग्रहापायी आपण एका मोठ्या वर्गाला गुंड-पुंडाचे शिकार व्हायला सोडत आहोत याचा विचार  ‘लाजेने लाल होणारे  का करीत नाहीत  हे कोडं आहे.’पत्रकारिता हे सतीचं वाण’ आहे हे पत्रकारितेच्या पहिलीच्या वर्गातील तरूणांनाही माहिती आहे.या क्षेत्रांतील धोके ही सारयांना माहित आहीत . त्यामुळे कायदा झाला म्हणजे सारं अलबेल होईल अशी खुळी समजूत कोणाचीच नाही ..खून केल्यानं फाशी होऊ शकते हे माहित असतानाही मुडदे पडतातच ना.त्यामुळं आम्ही “घाबरून,डरपोक आहोत म्हणून नाही तर तो आमचा हक्क आहे म्हणून” कायदा मागतो आहोत.पत्रकारांना आपलं काम निर्भयपणे,निःपक्षपातीपणे करता यावं यासाठी कायदा हवाय.’पत्रकारांना कोणतंही संरक्षण नसतं’ हे अभिमानानं आम्ही पुर्वी सांगायचो.कारण तेव्हाचं सामाजिक वातावरण त्यासाठी पुरक होतं.आज दर पाच दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत असेल,पत्रकारांचे मुडदे पडत असतील आणि आम्ही जर आम्हाला कोणतंही संरक्षण नाही म्हणत टिमकी वाजवत असू तर हे आत्मघातकी आणि  हल्ले वाढण्यास पूरक ठरणारे आहे. अशा स्थितीत  फुकटचे फटके खाऊन हुतात्मा होण्याची आता कुणाची तयारी नाही . कारण ज्याचे जळते त्याला कळते . वाहिन्यांवरून पोपटपंची करणार्‍या मंडळीनी बघितलंय का की,ज्यांच्यावर हल्ले झालेत त्यांची मानसिकता ह्ल्य्यानंतर  कशी होते? ,बघितलंय का की,ज्या महिला पत्रकारांवर अत्याचार झालेत त्यांची मनोवस्था काय होते? ,बघितलंय का की,ज्यांचे खून झालेत त्यांची कुटुंबं कोणत्या अवस्थेतून जातॆ ?,जे मारले गेले ते सारेच बिघडलेले नव्हते.वाया गेलेलीही नव्हते.किमान जे सज्जन होते त्याचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसायलाही जे पोपट जात नाहीत त्यांना पत्रकारिता सडलीय म्हणण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.आपल्या संतानी केवळ आपल्या सज्जनतेचा टेंभा मिरविला नाही.केवळ समाजातील दोष दाखवत ते बसले नाहीत तर समाज बदलासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातलं.त्यासाठी वाट्टेल त्या हालअपेष्ठा सहन केल्या.दुसर्‍यांचे दोष दाखवून परिवर्तन होत नसतं.त्यासाठी स्वतःही काही झिज सोसावी लागते.सकारात्मक विचाराचे बिजारोपण करावं लागतं.हे जे करत नाहीत त्यांचे म्हणणे एक पोपटपंची म्हणूनच लोक दुर्लक्षितात. आम्ही तेच करतो आहोत . अशा पोपटपंचीचा आमच्या चळवळीवर काही परिणाम होणार नाही.चळवळ आम्ही अंधपणे चालवत नाहीत.त्यामागं एक विचार आहे.एक निश्‍चित भूमिका आहे.सारासार विचार करूनच आम्ही ही चळवळ उभी केलीय.मुख्यमंत्र्यांना आम्ही दहाहजार एसएमएस पाठविणार होतो.पंधरा हजार एसएमएस गेले. आमचं म्हणणं बहुसंख्याकांना मान्य आहे हेच यातून दिसून येतं . जे आमच्याबरोबर आहेत ते आंधळेपणानं आमची संगत करताहेत किंवा ते सारेच चुकीची मागणी करताहेत असं नक्कीच नाही..त्यामुळं चिमुटभराना  काय वाटतं याची  चिंता आम्ही काय म्हणून करायची.?

1 COMMENT

  1. asha laj watnarya shukracharyankade baghu pan naka! sir tumhi aaple kary chalu theva yash milel tenvha hich kilhe kui karnari manse pudhe pudhe kartil! mumbai goa chaupadarikarna sathi jyaveli ladha det hotat tenvha pan asech ghadat hote!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here