पत्रकारांवर ‘असेही’ हल्ले

0
961

महाराष्ट्रात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल            

करण्यांच्या घटनांंत चिंताजनक वाढ

पत्रकारावर शारीरिक हल्ला झाला तर त्यानं होणाऱ्या जखमा काही दिवसातच भरून येतात पण खोटे-नाटे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना जीवनातून उठविण्याच्या ज्या उठाठेवी महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत त्या अधिक गंभीर आणि चिंताजनक आहेत.एखादया पत्रकारावर शारीरिक हल्ला झाला तर किमान  समाजाची सहानुभूती तरी  संबंधित पत्रकाराला मिळते,पत्रकारही संघटीतपणे अशा शक्तीचा विरोधात आवाज उठवितात.,मात्र कधी विनयभंगाचे,कधी ऍट्रासिटी ,कधी फसवणुकीचे ,कधी खंडणीचे ,कधी जातीय-धार्मिक तेढ वाढविले म्हणून तर कधी देशद्रोहाचे खोटे खटले भरून.समाजाच्या मनात पत्रकारांबद्दल संशयाचं वातावरण निर्माण केलं जात.एकदा संशय निर्माण झाला की,मग समाज,आणि अन्य पत्रकारही अशा पत्रकारापासून फटकून वागायला लागतात.गुन्हा दाखल झालाय ना? मग काही तरी भानगड नक्कीच असेल असं वातावरण निर्माण होतं आणि सारेच मग कातडीबचाव भूमिका तरी घेतात,किंवा कशी जिरली म्हणत आनंद तरी व्यक्त करतात.पत्रकाराला अद्यल घडविण्यास निघालेल्या मंडळींना यापेक्षा वेगळं काय हवं असतं.?एक एका पत्रकाराला असं समाज आणि आपल्याच समव्यवसायी मंडळीपासून तोडायचं आणि मग त्याच्यावर असे काही वार करीत राहायचे की,नंतरच्या काळात तो पुन्हा उठणार नाही.अशा प्रकारच्या शेकड्यांनी घटना राज्यात घडलेल्या आहेत.पण अलिकडची दोन-तीन उदाहरणंच येथे देतो.

 काही दिवसांपुर्वी पुर्णेतील एका पत्रकारावर अ्रॅसिड हल्ला झाला.परभणीसह महाराष्ट्रातील सारे पत्रकार त्याच्या पाठीशी उभे राहिले.पोलिसावर दबाव आला आणि नंतर आरोपी असलेल्या पुढाऱ्याला अटक करावी लागली.मग त्यानं संबंधित पत्रकाराच्या विरोधात एक खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.पुर्णेहून नाशिकला जात असताना संबंधित पत्रकाराने एका महिलेची छेड काढल्याची तक्रार नाशिकच्या एका महिलेने रेल्वे पोलिसात केली.ज्या दिवशी गुन्हा घडला ( असं फिर्यादी महिलेचं म्हणणं आहे ) त्यादिवशी संबंधित पत्रकार पुर्णेत घरीच होता. सारा बनावट मामला . तरीही अगोदर हल्ला झाल्यानंतर जेवढा पाठिंबा त्याला मिळाला तो विनयभंगाच्या प्रकऱणात मिळाला नाही.हे वास्तव लक्षात घेऊन पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची एक “चळवळ”च काही समाजकंटकांनी सुरू केलेली आहे.मागच्याच महिन्यात मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखऱ बेहेरे यानी त्यांच्या  तापीकाठ  दैनिकात एक बातमी छापल्यामुळे त्यांनी जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला.गंमत अशी की,बातमी पोलिसांच्या विरोधात होती.पोलिसांनी एका व्यक्तीला हाताशी धरून त्याला तक्रार द्यायला लावली आणि त्या खोटया तक्रारीच्या आधारे बेहेरे यांना पोलिसांनी अटक केली.असाच प्रकार आता नांदेडचे पत्रकार संजीव कुलकर्णी यांच्या बाबतीत घडतो आहे.त्यांना एका खोटया गुन्हयात अडकून त्यांचा आवाज बंद कऱण्याचा प्रयत्न होतो आहे.त्या प्रकरणाचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेने यापुर्वीच निषेध केला आहे.

वरती दिलेली उदाहरणं अपवादात्मक नाहीत.जसे हल्ले  सातत्यानं होत आहेत त्याच गतीनं पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकारही वाढत आहेत.अलिकडच्या काळातील अशा किमान पन्नास घटणांची माहिती आम्हाला आहे.आवाज बंद कऱण्याच्या किंवा पत्रकाराला अद्यल घडविण्याच्या उद्देशानं ज्या पत्रकारांवर गुन्हे दाखल केले गेले होते अशा ज्या प्रकरणाचे निकाल लागले त्यातील सर्वच प्रकरणातील आरोपी ( म्हणजे पत्रकार ) निर्दोष सुटलेले आहेत.मात्र गुन्हा दाखल होण्यापासून ते निकाल लागण्यापर्यत त्याला ज्या नरकयातनातून जावे लागते ते ज्यांनी या यातना भोगल्या आहेत त्यालाच समजू शकते.त्यामुळेच अशा कोणत्याही प्रकरणात तमाम पत्रकारांनी कोणतीही शंका-कुशंका उपस्थित न करता संबंधित पत्रकारांच्या बाजुनं उभं राहिलं पाहिजे.कारण आज तो जात्यात तर आपण सुपात असतो हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे.मराठी पत्रकार परिषद असा कोणताही प्रय़त्न खपवून घेणार नाही किंवा अशा वेळेस शांत बसणार नाही.सुदैवानं आता सर्वच पत्रकारांना पत्रकार विरोधी शक्तींची ही कार्यपध्दती लक्षात आलेली असल्यानं संजीव कुलकर्णी असतील किंवा बेहेरे किंवा अन्य पत्रकार असतील सर्वच त्यांच्या पाठीशी उभे आहेेत.
आम्ही गेली सात-आठ वर्षे पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी करतो आहोत.ती करताना केवळ पत्रकारांवर होणारे शारीरिक हल्ल्‌यांचाच विचार केला होता.पण असे खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांवर जे हल्ले होऊ लागले आहेत त्याचाही बंदोबस्त करणारी तरतूद कायद्यात असली पाहिजे अशी आता मागणी करावी लागले.पत्रकारांमध्ये लाख मतभेद आहेत,संघटनांमध्येही वाद आहेत मात्र महाराष्ट्रातील कोणत्याही पत्रकारावर कश्याही पध्दतीचा कोणी हल्ला करणार असेल तर त्याविरोधात
सर्वांना एकत्र यावे लागेल. काल पुर्णेतील पत्रकार होते,चंद्रशेखर बेहेरे होते,आज संजीव कुलकर्णी आहेत उद्या कदाचित आपला नंबरही लागू शकतो याची जाणीव साऱ्यांनीच ठेवलाी पाहिजे. घटना  खऱी असेल तर कोणीच आरोपीची पाठराखन कऱणार नाही.मात्र तद्यन खोटे गुन्हे दाखल होत आहेत आणि ही विकृती पसरत चालली आहे हे अनेकदा समोर आले आहे .काही प्रकऱणात समाजकंटक आपल्याच पत्रकार मित्रांचा वापर करून आपल्या पोळ्या भाजून घेताना दिसतात.पण कुणाच्या तरी होतचे बाहुले बनणाऱ्या पत्रकारांनी हे लक्षात ठेवावे की,ही खेळी उद्या आपल्यावरही उलटू शकते आणि मग आपला वापर करणारे आणि गंमत बघत टाळ्या वाजविणारे आपल्या बरोबर असणार नाहीत.अशा स्थितीत साऱ्यांनी एक येत अशा विकृतीचा बंदोबस्त करण्याशिवाय आता मार्ग नाही.

जे खोटे गुन्हे दाखल करतात त्यांनाही अद्यल घडविण्याचे मार्ग कायद्यात आहेत.गुन्हा दाखल झालाय म्हणून लगेच कुणाला अटक करता येत नाही.त्याची अगोदर चौकशी करावी लागते,त्यात तथ्य आढळले तर पुढील कारवाई होते.त्यानंतरही अटकपूर्व जामिन घेता यतो .आपली बाजू बऱ्याच प्रकरणात सत्याची असल्यानं काही अडचण येत नाही.आरोपात काही काही तथ्या नसल्याचं पोलिसांना आढळले तरे पोलीस अशी केस सी फाईनल करू शकतात.उच्च न्यायालायात जाऊन दाखल झालेला एफआयआरही रद्द करता येऊ शकतो.त्यामुळं गुन्हा दाखल झालाय म्हणून कोणी गाोंधळून किंवा घाबरून जाण्याचंही कारण नसतं.यात पोलिस कारवाई पेक्षा पत्रकार बदनामीला जास्त घाबरतात.परंतू त्याला काही इलाज नसतो.आपण सार्वजनिक जीवनात वावरत असू तर हे सारं सहन कऱणं हा आपल्या व्यवसायाचाही एक भाग असतो.अण्णा हजारे यांच्यासाऱख्यांना ज्या गोष्टी चुकल्या नाहीत त्याला आपण अपवाद ठरू अशी अपेक्षा कऱण्यात अर्थ नसतो.त्यामुळं कायदेशीर मार्ग शोधतानाच थोडी हिंमत,धैर्य दाखविलं तर माध्यमांना  धडा शिकवायला निघालेले स्वतःच गोत्यात येऊ शकताात.शिवाय आणखी एक जालिम मार्ग आहे.अशा खोटे गुन्हयातील आरोपी पत्रकार निर्दोष सुटतातच.कोर्टाचा निकाल आपल्या बाजुनं लागताच संबंधित तक्रारदारानं खोटी फिर्याद दिली म्हणून त्याच्या विरोधात आपणास बदनामीचा खटला दाखल करून जबरी नुकसान भरपाई मागता येते.अनेक प्रकरणात अशी नुकसान भरपाई दिली गेलेली आहे.पत्रकारांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.खोटे गुन्हे जेव्हा दाखल होतात तेव्हा सर्व पत्रकारांनी एकत्र येत आवाज उठविला पाहिजे.कारण अशी वेळ कुणावरही येऊ शकते.प्रत्येकाचे शत्रू दगा धरून बसलेले असतात आणि ते योग्य संधीची वाट पाहात असतात.( एसेम) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here