अलिबागचं “वैभव” संपलं

0
1410

अलिबाग येथील ज्य़ष्ठ फ़ौजदारी वकिल आणि माजी मंत्री दत्ताजीराव तथा भाऊ खानविलकर यांच्या निधनाची बातमी नक्कीच व्यतिथ कऱणारी आहे.रायग़डच्या राजकारणाची नस ना नस माहित असलेल्या भाऊंना राजकीय आय़ुष्यात मात्र नेहमीच अपयशाचा सामना करावा लागला .प्रचंड विद्ववत्ता ,अफाट जनसंपर्क,राजकीय डावपेचात निष्णात असलेल्या भाऊंना केवळ मारोतराव कन्नमवार यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होण्याची संधी मिळाली.तेही पाच-सहाच महिने.नंतर मात्र त्यांच्या नशिबी राजकीय विजनवासच आला.त्यांच्या पाठीमागून आलेले ,आणि केवळ भाऊंच्या आशीर्वादाने अनेक जण आमदार,खासदार मंत्री झाले पण ते भाग्य नंतरच्या काळात भाऊंना मिळालं नाही.त्यामुळे “ज्येष्ट नेते” एवढंच बिरूद त्यंांच्या नावामागं वापरलं जायचं. आपल्या राजकारणासाठी रायगडमधील सा़ऱ्याच नेत्यांनी भाऊंचा वापर करून घेतला.त्यात शेकापचाही अपवाद नाही.सुरूवातीच्या काळात कॉग्रेस आणि शेकापची जोरदार भांडणं चालायची.त्यातली कॉग्रेसची डावपेचात्मक आणि कायदेविषयक बाजू खानविलकर सांभाळायचे.दुसऱ्या बाजुला दत्ता पाटील असायचे.त्यामुळे शेकापवाले त्यांना नेहमीच पाण्यात बघायचे.त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले केले जायचे.पण भाऊ कधी डगमगले नाहीत.मात्र भाऊं सातत्यानं आपली राजकीय भूमिका बदलत.त्यातूनच त्यांनी सर्व पक्षांचा अनुभव घेतला.तसेच सर्व निवडणुकाही लढविल्या.मात्र अपयशानं त्यांचा पिच्छा सोडला नाही. अलिकडे नैराश्याने ग्रासलेले भाऊ शेकापच्याही व्यासपीठावर जात,शेकापच्या नेत्यांची तारीफ करीत हे पाहतांना अलिबागकर अस्वस्थ व्हायचे.बाकी सारं काही आहे पण नशिबाची साथ नसेल तर यश कसं हुलकावण्या देतं याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणून भाऊंकडं बघता येईल.त्यांच्या सातत्यानं बदलणा़ऱ्या भूमिकांमुळे मला त्यांच्याविरोधात लेखणी चालवायला विषय मिळायचा.भाऊंच्या विरोधात मी अनेकदा लिहिले.मात्र ते कधी रागावले नाहीत.उलट लेख वाचला की ते मला फोन करीत आणि” तुमची भूमिका तुम्ही पार पाडा”  असा सल्ला देत. तरीही त्याच्या मनात माझ्याबद्दल असलेलं ममत्व कमी झालं नव्हतं.काही राजकीय संदर्भ हवे असतील,काही चांगलं वाचलं असेल तर ते मला आवर्जुन फोन करून सांगायचे.आठ-पंधरा दिवसाला तरी त्यांचा माझा फोन व्हायचा.अनेकदा सकाळी बीचवर फिरतानाही आमची भेट आणि गप्पा व्हायच्या.पंधरा दिवसांपुर्वीच माझा एक लेख वाचून त्यांचा फोन आला होता. “तुमच्याशी चर्चा करायची,भेटायला या”  असं त्यांनी कळविलं होतं.मात्र आता तो योग नाही याची रूखरूख वाटत राहणार आहे.
प्रारंभी म्हटल्याप्रमाणे साऱ्यांनीच भाऊंना वापरून घेतले असले तरी भाऊंचा दरारा मात्र शेवटपर्यथ कायम होता.भाऊंबद्दल एक सुप्त भिती जशी शेकापवाल्यांच्या मनात असायची तशीच ती अन्य पक्षांच्या नेत्याच्या मनातही असायची.अंतुले असोत,सुनील तटकरे असोत यांना राजकाऱण करताना भाऊंचा विचार करावाच लागायचा.कारण सत्ता नसली तरी लोकसंपर्क आणि राजकारणाचा व्यासंग,कायद्याचं प्रचंड ज्ञान यामुळं भाऊ बाजू फिरवू शकतात हे साऱ्यांनाच माहिती होतं.हा भाऊचंा दरारा शेवटपर्यत कायम राहिला हे मात्र नक्की.अलिबागचा राजकीय इतिहास भाऊंना वगळून पूर्ण होऊच शकत नाही.जवळपास साठ-सत्तर वर्षे अलिबागच्या राजकारणातील एक प्रमुख नेते म्हणून खानविलकरांचा प्रभाव होता.
रायगडच्या विकासाची कमालीची तळमळ असलेले खानविलकर आपल्यापरीनं त्यासाठी प्रय़त्न करायचे.सातत्यानं शरद पवार असतील,अंतुले असतील किंवा अन्य नेते यांना पत्र पाठवून रायगडकडं लक्ष देण्याची विनंती करायचे हे मी स्वतः पाहिलं आहे.भाऊंनी पत्रकारिता देखील केली .निर्धार नावाचे साप्ताहिक ते चालवत.नंतर निर्धारचे रूपांतर दैनिकात केले पण सहा महिनेही निर्धार चालला नाही.ते नंतर बंद झाले ते कायमचे.अशा प्रकारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.त्यामुळे अलिबागच्या राजकीय,सामाजिक,सास्कृतिक क्षेत्राती मोठी हानी झाली आहे.रायगडावर,रायगडातील जनतेवर मनस्वी प्रेम करणारा,रायगडच्या विकासाची आस असणारा एक नेता आपल्यातून निधून गेला आहे.रायगडचे हे नुकसान भरून न येणारे आहे.अगोदर दत्ता पाटील (दादा) गेले आता दुसरे दत्ता म्हणजे खानविलकरही ( भाऊ ) गेले. रायगडचं वैभव ठरलेली ही पिढी एका पाठोपाठ एक निघून जात आहे.रायगडमध्ये मोठी पोकळी निर्माण होत आहे.नव्या पिढीत तेवढ्या तयारीची,क्षमतेची नेते नाहीत हे नक्की.भाऊंना माझी विनम्र आदरांजली. (एस.एम. )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here