5 डिसेंबर ः कोकणात घुमणार पत्रकारांचा आवाज..

0
870

मुूंबई -गोवा महामार्ग मृत्यूशय्येवर ,पत्रकार पुन्हा उतरताहेत रस्त्यावर 

मुंबई-गोवा महामार्गावर माणसांच्या रक्तांचा रोज सडा पडत होता.एकजात सारे राजकीय पक्ष मृत्यूचं हे तांडव निर्विकारपणे पहात होते.2008 मध्ये कोकणातील पत्रकारांनी हा विषय हाती घेतला.लेखणीचे फटकारे ओढल्यानंतरही फरक पडत नाही असं दिसल्यावर पत्रकार रस्त्यावर उतरले.रस्ता रोको,धरणे,उपोषणं,लाँगमार्च,मानवी साखळी,मशाल मार्च,घेराव अशा लोकशाहीनं दिलेल्या सार्‍या मार्गाचा अवलंब केला.विधानसभेत प्रश्‍न उपस्थित होईल याची व्यवस्था केली,थेट दिल्ली दरबारी गार्‍हाणे गायले.मग कुठं 2012 मध्ये रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली.काम सुरू झालं.आम्ही आनंदोत्सवही साजरा केला.मात्र आनंद चिरकाल उपभोगता आला नाही.गेल्या पाच वर्षात रस्ताच्या पहिल्या पनवेल ते इंदापूर मार्गाचं तीस टक्के कामही झालं नाही.कधी निधीचा तुटवडा तर कधी ठेकेदाराची अरेरावी तर कधी संतापजनक  रायकीय उदासिनता यामुळं हा रस्ता काही झाला नाही.या रस्त्यानंतर पुणे -नाशिक मार्गाला मंजुरी मिळाली आज तिकडं च 75 टक्के काम पूर्ण झालंय.कोकणाच्या रस्तयाचं मात्र वाटोळं झालंय.खंड्डे एवढे पडलेत की,लोक पत्रकारांनाच शिव्या द्यायला लागलेत.पहिलाच रस्ता बरा होता असं ते म्हणताहेत.कोकणासाठी सागरी मार्गाचे ढोल पिटले जात आहेत.विरार -अलिबाग आठ पदरी मार्गाची लालूच दाखविली जात आहे पण कोकणची लाईफ लाईन असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या बाबतीत मात्र आश्‍चर्यकारक मौन पाळलं जातंय.सावित्रीवरचा पूल पाच महिन्यात होतो आणि महामार्गाचं काम पाच वर्षात 80 किलो मिटरही होत नाही यामागं नक्कीच काही तरी रहस्य दडलेलं आहे.

कोकणातील पत्रकार लढा देत होते तेव्हा कॉग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती.या महामार्गाबद्दल सत्ताधारी बोलत नव्हते.त्यामुळं संतापलेल्या जनतेनं या पक्षांना रस्तयावर आणलं.आज ही मंडळी महामार्गासाठी रस्त्यावर आली आहे.कॉग्रेसनं काल कोकणात अनेक ठिकाणी रस्ता रोको केलं.रायगडात माणगाव,पेण,पनवेल इथं ही आंदोलनं झाली.या आंदोलनामागं जनतेचा कळवळा किती आणि राजकारण किती हे वेगळं सांगण्याची गरज नाही.हातात सत्ता होती,तेव्हा दुर्लक्ष केलं.आज हातात काहीच नाही तर आंदोलनं करतात  तरीही हरकत नाही.कोकणाच्यादृष्टीनं एका जिवंत विषयाकडं लक्ष देत नारायण राणे यांच्यानंतरही कोकणात आमचं अस्तित्व आहे हे दाखविण्याचा कॉग्रेसनं प्रयत्न केला असला तरी मुंबई-गोवा महामार्गासाठी कॉग्रेस रस्त्यावर आली त्याचं आम्ही स्वागत करतो.इतर विरोधकांनीही यासाठी आग्रही असलं पाहिजे असं आमचं आवाहन आहे.कारण या महामार्गावर एकटया रायगड जिल्हयात दररोज दीड माणसाचा बळी जातो.हे सारे निष्पाप प्रवासी असतात.अपघातात जाणारे हे बळी सरकारच्या निष्काळजीपणाचे बळी आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही.त्यामुळंच आता पुन्हा एकदा रायगडमधील पत्रकार येत्या 5 डिसेंबर रोजी रस्त्यावर उतरत आहेत.या महामार्गचं काम  मार्गी लागेपर्यंत पुन्हा पत्रकारांची ही लढाई सुरू राहणार आहे.पत्रकारांचं हे आंदोलन श्रेयासाठी नाही.मध्यंतरी एका वाहिनीवरील चर्चेच्या वेळेस भास्कर जाधव यांनी हा रस्ता आमच्यामुळंच होतोय असा दावा केला होता.तो कसा खोटा आहे हे मी सप्रमाणान दाखवून देत त्याना उघडं पाडलं.त्या अगोदर नारायण राणे यांनीही माझ्यामुळंच रस्त्याचं काम सुरू झाल्याचा दावा केला होता.राजकीय पक्ष आताही श्रेयासाठीच लढणार हे उघड आहे.त्यांनी श्रेय घ्यायला आमची काहीच हरकत नाही.कोणाला श्रेय घ्यायचंय ते त्यांनी घ्यावं आम्हाला मात्र रस्ता हवाय.त्यासाठीचा लढा पत्रकार चालूच ठेवणार आहेत..लेखणीच्या आणि रस्तयावर उतरून पत्रकार ही लढाई लढत राहणार आहेत.5 डिसेंबरच्या या आंदोलनात मी देखील सहभागी होत आहे.( एस.एम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here