तब्बल सहा वर्षे चाललेला जगातील शेतकऱ्यांचा पहिला संप म्हणून अलिबाग तालुक्यातील चरीच्या संपाचा उल्लेख केला जातो.या संपामुळं जिल्हयातील शेतकरी संघटीत झाला,त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण झाला.संप तब्बल सहा वर्षे चालला.पूर्वी जमिनीदारांच्या जमिनी शेतकरी खंडानं करायचे. शेतकरी वर्षभर शेतात राब राब राबायचे आणि वर्ष अखेरीस त्यांच्या पदरात एकूण उत्पन्नाच्या 25 टक्के वाटाही मिळायचा नाही.हा वाटा वाढून मिळावा आणि खंडानं जमिनी घेताना जमिनदारांकडून ज्या जाचक अटी करारपत्रावर लिहून घेतल्या जायच्या ते बंद व्हावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती.अर्थातच मालकांना हे मान्य नव्हतं.त्यामुळं जमिनदारांच्या जमिनी कसायच्याच नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.परिणाणतःचरी आणि आसपासच्या परिसरातील जमिनदारांच्या जमिनी सहा वर्षे तशाच पडून राहिल्या.संप ऑक्टोबर 1933 मध्ये सुरू झाला.1939मध्ये मोरारजीभाई देेसाईंच्या मध्यस्थीनंतर हा संप मिटला.
या संपामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले हे जरी खरे असले तरी यातून एक चांगली घटना घडली ती म्हणजे दैनिक कृषीवलची सुरूवात झाली.संप काळात रामभाऊ मंडलिक यांच्या कुलाबा समाचारमधून मालकांची बाजू मांडली जायची.शेतकरी कसे चूकत आहेत हे सांगितलं जायचं.त्याला उत्तर देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी शेतकऱ्यांकडे माध्यम नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांचे नेते नारायण नागू पाटील यांनी 7 जून 1937 रोजी कृषीवल सुरू केले.प्रारंभी कृषीवल साप्ताहिक स्वरूपात होते.नंतर ते ब्रॉडसिट आणि दैनिक स्वरूपात प्रसिध्द होऊ लागले.रायगड जिल्हयातील अनेक शेतकऱी लढ्याचं पुढारपण कृषीवलनं केलं.शेतकऱ्यांचा आवाज बुलंद कऱण्याचं काम कृषीवलं केलं . या दैनिक ाचा अठरा वर्षे संपादक म्हणून मी काम केले आणि नारायण नागू पाटील यांनी ज्यासाठी म्ङणून हे दैनिक सुरू केले होते तो बाणा कायम ठेवत माझ्या काळात अनेक लढे कृषीवलनं उबे केले.त्यामुळं कृषीवल शेतकऱ्यांना हक्काचं व्यासपीठ वाटू तर लागलंच त्याच बरोबर एक चळवळीचं मुखपत्र म्हणून कृषीवलची ख्याती सर्वदूर पोहचली. हे दैनिक 78 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.कृषीवलला शूभेच्छा.