हां, मै अलिबाग से ही आया हू…

‘अलिबाग से आया है क्या’ ? हा संवाद अनेक चित्रपटं,मालिका,आणि नाटकांतून ऐकायला मिळतो.या डायलॉग मागचा भावर्थ चांगला नाही हे उघड आहे.अलिबागकर येडे,गबाळे आहेत,अडाणी आहेत अशीच भावना या संवादामागे असते.वर्षानुवर्षे हे संवाद सिनेमात वगैरे वापरले जात होते.त्या विरोधात अलिबागकरांनी मोठी चळवळ उभी केली.निर्मात्यांचा निषेध करण्यापासून ते थेट त्यांना तंबी देण्यापर्यंत आणि हे संवाद असलेली चित्रपटं अलिबागमध्ये न चालू देण्यापर्यंत सारं काही तळमळीनं केलं.

.मात्र या सार्‍या चळवळीचा फारसा लाभ झाला नाही.हे संवाद सुरूच राहिले.त्यामुळं चिडलेल्या सातीर्जे येथील राजेंद्र पाटील यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली .त्याचा निकाल आज लागला.न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.’अलिबाग से आया है क्या’? या डायलॉगवर बंदी घालण्यास नकार देताना न्यायालयानं जे मत व्यक्त केलंय ते अलिबागकरांना मान्य होणारं नाही.’विनोद हे सर्व समुदायाच्या लोकांवर होतच असतात.ते फारसे मनावर घ्यायचे नसतात’ असा अभिप्राय न्यायालयाने नोंदविला आहे.अलिबाग म्हणजे विशिष्ट समुदाय नाही.ते शहर आहे.येथे सर्व समुदायाचे लोक राहतात आणि त्यांना सर्वांना मिळून हे निर्माते अडाणी,गावंढळ,समजतात.त्यामुळं हा अलिबाग शहराच्या अस्मितेचा,प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे.विषय विनोदापुरता मर्यादित असता तर वांदा नव्हता.पंरतू एका शहरातील पंचवीस-तीस हजार लोकांना गावंढळ समजायचं,त्यांची येथेच्छ बदनामी करायची हे मान्य होण्यासारखं नाही.कारण अलिबाग हे एक ऐतिहासिक,सुसंस्कृत आणि सभ्य,विद्वान् लोकांचे शहर आहे.जगाला गवसणी घालणारी अनेक नररत्ने अलिबाग ने देशाला दिली आहेत.समुद्रावर हुकूमत गाजविणारे सरखेल कान्होजी आंग्रे असतील किंवा ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये मोठी कामगिरी बजावणारे जनरल अरूणकुमार वैद्य असतील हे अलिबागचे होते.या शिवाय साहित्य,नाटय,पत्रकारिता,सामाजिक कार्याच्या क्षेत्रातही अलिबागचा एक दबदबा होता आणि आहे.क्रिकेटवीर उमेश कुलकर्णी,अभिनेत्री अश्‍विनी भावे,अलिबागचे आहेत.जागतिक कीर्तीचे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर,मालतीबाई बेडेकर तथा विभावरी शिरूरकर,ज्येष्ठ समिक्षक म.सु.पाटील,खोती विरोधी लढयातील अग्रणी नारायण नागू पाटील,नवकथेचे प्रवर्तक,’दुर्दम्य’ या टिळकांवरील कादंबरीचे लेखक गंगाधर गाडगीळ,स्वामी विनोद महर्षि,बापू छत्रे,निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी,ही सारी मंडळी अलिबागची किंवा अलिबाग परिसरातील आहे.अशी ही कर्तृत्ववान,आणि विद्ववानांची भूमी आहे.निसर्गानं देखील या पवित्र भूमीला भरभरून दाण दिलं आहे.विस्तृत समुद्र किनारा,नारळी-पोफळीच्या बागा,मनमोहक हिरवाई अशी देवभूमी येडया गबाळ्याची भूमी कशी काय असू शकते ? परंतू अलिबागकरांना येडा,गबाळा समजण्याची कोणी तरी मस्ती केली आणि पुढे ही प्रथाच बनली.ती संतापजनक आहे.या विरोधात सर्व प्रथम मी माझ्या असा हा रायगड या पुस्तकात आवाज उठविला होता.त्यानंतर अलिबागकरांनी सातत्यानं या विरोधात आवाज उठविला पण उपयोग झाला नाही.आता तर उच्च न्यायालयानेच या संबंधीची याचिका फेटाळून लावल्याने निर्मात्यांना अधिकच चेव येईल आणि बिनदिक्कतपणे अलिबागकरांची बदनामी होत राहिल यात शंकाच नाही.मात्र सर्वच निर्मात्यांना आमचे आवाहन आहे की , भलेही न्यायालयाने अलिबागकरांची मागणी मान्य केली नसेल पण हा विषय लोकभावनेशी निगडीत आहे,एका शहराच्या अस्मितेशी निगडीत हा विषय असल्याने निर्मात्यांनी हा संवाद टाळावा आणि अलिबागकरांची बदनामी थांबवावी.तसेच अलिबागकरांनी देखील आपला गौरवशाली इतिहास आणि आपल्या अभिमानाचे विषय प्रखरपणे जगासमोर आणले पाहिजेत. अलिबाग से आया है क्या ? या बदनामीला ‘हा मै अलिबाग से ही आया हू’ अशा चळवळीनं उत्तर दिलं जावं.तरच ही बदनामी थांबेल असे वाटते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here