बीड येथून प्रसिध्द होणार्या दैनिक ‘सुराज्य’चा काल पंधरावा वर्धापनदिन साजरा झाला.कोणतंही पाठबळ नाही,कोणतीही तडजोड नाही,जाहिरातीसाठी हांजी हांजी नाही की लाचारी नाही,आणि पत्रकारितेत यशस्वी होण्याचे कोणतेही ‘कसब’ अंगी नसताना सर्वोत्तम गावस्कर यांनी सुराज्य निष्ठेनं चालविला आणि तो जिवघेण्या स्पर्धेतही टिकविला ही गोष्ट माझ्यासाठी लाख मोलाची आहे.एक तर बीड कायम दुष्काळी जिल्हा.कोणतेही मोठे उद्योग नाहीत त्यामुळे जाहिरातीचे स्त्रोत मर्यादितच.जाहिरातदार ठराविक आणि त्यातील बहुसंख्य राजकीय पुढारीच.त्यामुळे आपोआप मर्यादा येतात. त्यातही स्थानिक आणि साखळी वर्तमानपत्रांची जिवघेणी स्पर्धा अशा स्थितीत दैनिक चालविताना भल्या भल्यांना गरगरल्यासारखे होते.सर्वोत्तमही या सगळ्या दुष्टचक्रातून गेला आहे.ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केला,ज्यांना आपलं मानलं त्यांनीच गळा कापण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अनेकदा असे प्रसंग आले की,आता सुराज्य बंद पडणार.सुदैवानं तसं झालं नाही याचं कारण सर्वोत्तमच्या पत्रकारितेवरील निष्ठा आणि प्रामाणिकपणा.मुळात धंदा करण्यासाठी व्यवहार चातुर्य आवश्यक असतं.खोटं बोलता आलं पाहिजे,थापा मारता आल्या पाहिजेत,लोकांना फसविता आलं पाहिजे यापैकी एकही गुण अंगी नसतानाही सुराज्यचा पसारा सर्वोत्तम उत्तमपणे चालवतोय ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे.
सर्वोत्तम माझा लंगोटीयार.गेली तीस-चाळीस वर्षे आमची मैत्री आहे.सुराज्य अगोदर साप्ताहिक होतं.त्यावेळेस सर्वोत्तम अजिंठ्यात काम करायचा.साप्ताहिकाचं दैनिकात रूपांतर करायचं खुळ सर्वोत्तमच्या डोक्यात आलं आणि त्यानं तो जुगार खेळला.सुरूवातीला पार्टनरशीपमध्ये सुराज्य सुरू झाला.या काळात सुराज्यनं चांगलंच बस्तान बसविले होतं.मात्र नंतर पार्टनरशीप संपली आणि रोखठोक आणि नको तेवढं स्पष्टोक्तेपणा जपणारा सर्वोत्तम तसा एकाकी पडला.मधल्या काळात काही मित्रांनी सुराज्य हायजॅक करण्याचाही प्रयत्न केला.मात्र ते शक्य झालं नाही.त्यामुळें सर्व संकटातून ताऊन सुलाखून निघालेला सुराज्य आता नव्या पिढीकडे हस्तांतरीत होत आहे.आनंद गावस्करनं पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे आणि तो आता पूर्णवेळ काम पाहू लागल्यानं सर्वोत्तमला मदतनीश मिळाला आहे.त्यामुळं आता सुराज्यला कसलंही भय राहिलेलं नाही हे स्पष्ट झालंय. सचोटी,प्रामाणिकपणे आणि सत्व कायम जपत पत्रकारिता करता येऊ शकते हे सर्वोत्तमने दाखवून दिलं आहे.मला त्याचा नक्कीच अभिमान आहे.एक दिवस उशिरा पण सुराज्य परिवारास मनापासून शुभेच्छा. सुराज्यला नवे वैभव प्राप्त व्हावे एवढीच मनोकामना- एस.एम.देशमुख