सुधीर सुर्यवंशी यांच्यावरील हल्ला आणि ‘समिती’ची भूमिका

0
1124

डीएनएचे पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावरील हल्ला हा सोसायटीच्या राजकारणातून झाला आहे त्याचा पत्रकारितेशी संबंध काय ? मग पत्रकारांनी सुधीर सुर्यवंशींच्या पाठिशी का उभं राहायचं ? अशी चर्चा मुंबईत काही मित्रांनी सुरू केली आहे. मुख्य म्हणजे ज्यांनी सुर्यवंशीवर हल्ला झाल्यानंतर लगोलग निषेधाची पत्रकं काढण्याची स्पर्धा केली तेच आता घूमजाव करीत सुर्यवंशी हल्ला प्रकरणाच्या जबाबदारीतून सुटकेचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने जाहीर केलेले आंदोलन ठरल्याप्रमाणे होणार आहे. याचं कारण असं की, पत्रकारांवरील हल्ले हे डॉक्टरांवरील हल्ल्यांसारखे उत्स्फूर्त नसतात. एखादा रूग्ण दगावतो, नातेवाईक संतापतात आणि डॉक्टरांवर हल्ले होतात. पत्रकारांवरील हल्ले हे अत्यंत थंड डोक्यानं आणि नियोजनपूर्वक केले जातात. विरोधात बातमी आलीय आणि लगेच पत्रकाराला गाठून हल्ले झालेत असं सहसा होत नाही. ज्याच्या विरोधात बातमी आलेली असते तो डूख धरून असतो. संधीची तो वाट पहात असतो. संधी मिळाली की, सारे हिशोब पूर्ण केले जातात. हे हिशोब पूर्ण करताना हल्ला पत्रकारितेतून झालाय असं वाटणार नाही याचीही काळजी घेतली जाते. त्यामागं पत्रकार संघटनांची सहानुभूती संबंधित पत्रकाराला मिळू नये अशी योजना असते.

सुधीर सुर्यवंशीच्या बाबतीत असंच झालेलं आहे. सर्व्हेसाठी परवानगी न घेता सोसायटीत का आलात? अशी विचारणा केल्यामुळं कोणी जीवघेणा हल्ला करीत नाही. त्यामुळं या मागं नक्कीच बातम्यांमुळं हितसंबंध दुखावलेली मंडळी असू शकतात हे का नाकरतोय आपण? शिवाय पत्रकाराने सोसायटीचा चेअरमन होऊ नये का ? आणि कोणी जर नियम तोडत असेल तर त्याला रोखणे पत्रकार म्हणून आपलं काम नाही का ? ते जर सुधीर सुर्यवंशी यांनी केलं असेल तर हा पत्रकार म्हणून झालेला हल्ला नाही असं आपण कसं काय म्हणू शकतो ? अर्थात अशी चर्चा करणारी मंडळी राजकीय चष्म्यातून या सार्‍या विषयाकडं पाहात असतात. त्यामुळं, आपल्या समाजबांधवाच्या पाठीशी उभं राहायचं सोडून अंगचोर वृत्ती व्यक्त होते. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती कोणत्याही राजकीय भूमिकेतून कधी पत्रकारांवरील हल्ल्यांकडं पहात नाही. महाराष्ट्रात असा एकही राजकीय पक्ष नाही की, त्यानं कधी पत्रकारांवर हल्ले केलेले नसतील. त्यामुळं, सुधीर सुर्यवंशी यांच्यावर हल्ला करणारे कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या नेत्याचे समर्थक आहेत याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. शिवाय, उद्याचं आंदोलन हे प्रातिनिधिक आहे. ते सुधीर सुर्यवंशी सोबत उदय निरगुडकर, विनोद यादव यांच्यासह, राज्यातील अन्य पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेले आहे. यात खारघरची निवड यासाठीच. कारण, घटना तिथं घडलेली आहे. त्यामुळं, सर्व पत्रकार मित्रांना विनंती की, या सार्‍या प्रकाराकडं राजकीय चष्यातून पाहू नये. मी तसे बघत नाही. सुधीर सुर्यवंशी यांचा माझा परिचय ही नाही. ते पत्रकार आहेत म्हणूनच आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हे आपण लक्षात घ्यावं आणि उद्याच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं ही विनंती.

आपला नम्र, एस. एम. देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here