निनावी हितसंबंधियांची पोटदुखी
आणि ‘मी एस.एम’.

उद्याचं आंदोलन होऊ नये म्हणून धनिकांची सुपारी घेतलेल्या
मंडळीनी सुरू केलीय माझी बदनामी मोहिम

मी वाट पहात होतो,माझ्या बदनामीची एकही पोस्ट अजून कशी पडली नाही? मी परिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हा एका पत्रकाराला महाराष्ट्रात फिरवून देशमुख यांच्यावर किती गुन्हे दाखल झाले आहेत याचा शोध घेतला गेला होता,नंतर ठाण्यात दिनू रणदिवे यांना यांचा सत्कार आणि 92 हजाराची थैली अर्पण केली तेव्हा मा . उध्दव ठाकरे यांनी या कार्यक्रमास येऊ नये म्हणून काही मठ्ठांनी जंगजंग पझाडले होते एवढेच कश्याला परवाचं पत्रकार प्रशिक्षण शिबिर होऊ नये यासाठीही काही पाताळयंत्री मंडळी प्रयत्न करीत होती.त्यामुळं दहा वर्षापासून जो लढा मी लढतो आहे त्याला आता यश येत असताना पत्रकारितेतील बदनाम आणि नतद्रष्ट मंडळी अजून गप्प कशी ? याचा मला प्रश्‍न पडला होता.मात्र माझ्या अपेक्षेप्रमाणे आत्ताच एक पोस्ट माझ्या पर्यंत आली आहे.मी किती प्रसिध्दीलोलूप आहे.मी पदांसाठी कशी धडपड करतो वगैरे आरोप या पोस्टमध्ये केलेले आहेत.या पोस्टला मी उत्तर देणार नाही कारण ही पोस्ट निनावी आहे.ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनी समोर येऊन चार हात करावेत एस.एम.देशमुख त्यासाठी तयार आहे.अशी लपून गोळ्या झाडणारे टोळके कोण आहे हे मी जाणतो.उध्याचं आदोलनास अपशकुन करण्यासाठी ही योजना आहे.ती कोणासाठी केली गेली आहे हे ही मला माहिती आहे.काही धनदांडग्यांच्या पेरोलवर असलेली मंडळी आडून गोळ्या मारत आहेत.त्यांनी कितीही बोंबा माराव्यात जोपर्यंत महाराष्ठातील पत्रकारांचा माझ्यावर विश्‍वास आहे तोपर्यंत या बदमाश्यांच्या भाषेतली चमकोगिरी मी करीत राहणार आहे.
द्या होणारं आंदोलन पहिलं नाही.ज्यांना ते माहिती नाही त्यांनी आजच माझ्या वेबसाईटवर टाकलेला घटनाक्रम जरूर पहावा.सुनील ढेपे यांच्यावेळेस मी काय प्रयत्न केले ते डॉ.अनिल फळे सांगू शकतील.शिवाय महाराष्ट्रात 2 ऑक्टोबर रोजी जे आंदोलन झालं होतं ते खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांना आयुष्यातून उठविणार्‍यांच्या विरोधातलं होतं.हे ज्यांना माहिती नाही त्याला मी काय करू ? मी त्यावर बोलण्याचं काऱण नाही.गेल्या वर्षभऱात 19 पत्रकारांना जवळपास 25 लाखांची मदत मिळवून दिलेली आहे ही रक्कम मी माझ्या खिश्यातून दिलेली नसली तरी त्यासाठी आम्ही सर्वानी प्रयत्न केलेले आहेत.जे काहीच करीत नाहीत,नुसत्याच खुर्च्या उबवत बसलेत ते जे काम करतात त्यांच्याकडं बोटं दाखवित असतात.माझ्यावर अशा बेताल बडबडीचा काहीच परिणाम होणार नाही.उद्याचं आंंदोलन होऊ नये म्हणून ज्यांनी सुपारी घेतली त्यानी ती घ्यावी पण उध्याचं आंदोलन हे होणार आहे तेव्हा काळजी नसावी.
माझ्याबद्दल या लोकांची काय पोटदुखी आहे हे महाराष्ट्रातील पत्रकारांना कळावे आणि त्यांनीच यावर आपली भूमिका ठरवावी यासाठी मला आलेली निनावी पोस्ट मी शब्दाचाही फेरफार न करता येथे टाकत आहेत.या पोस्टमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे त्यातील काही तडीपाड मंडळी आहे,काहींनी नाशिकची पत्रप्रबोधिनीची वाट लावलेली आहे त्यांच्याबद्दल बोलून मी माझा वेळ वाया घालविणार नाही,राज्यातील पत्रकारांनीच त्यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे हे ठरवावे. .कायद्याच्या लढयाचं श्रेय मला मिळू नये यासाठीची हाी धडपड असली तरी या मित्रांच्या माहितीसाठी सांगतो,मित्रांनो श्रेय तुम्ही घ्या पण कायद्याला आडवा पाय घालू नका.

मला आलेली बिनबापाची पोस्ट खालील प्रमाणे
—————————————————————————————–
श्रेय आणि प्रसिद्धीसाठी धडपड
-एस. एम. देशमुखांची पुन्हा चमकोगिरी !
पत्रकार संरक्षण कायद्य़ाचा मसुदा तयार करण्यात आला आहे; सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. झी २४ तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांना देण्यात आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. आता या घोषणेनंतर लगेच, या संभाव्य कायदा होण्याचे श्रेय घेण्यासाठी पत्रकारांच्या(?) नेत्यांमध्ये चढाओढ सुरु झाल्याचे दिसून येत आहे. सतत प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुख यांची श्रेय घेण्यासाठीची धडपड तर अगदी केविलवाणी आहे.
आता याच अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार असल्याने पत्रकारांचे नेते म्हणून लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी काही तरी करणे आवश्यक होते. त्यामुळे मग या एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुख यांनी पुन्हा आंदोलनाची स्टंटबाजी सुरु केली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे हे विधेयक मांडणार असे जाहीर केल्यानंतर मध्येच उठून आंदोलनाची गरज नव्हती. पण, केवळ आणि केवळ आपल्यामुळेच हा कायदा झाला हे छोट्या- छोट्या पत्रकारांच्या गळी उतरवण्यासाठी आणि त्या माध्यमातून मग पुढील नेतेगिरी करण्यासाठी मार्ग प्रशस्त करण्यासाठी एस. एम. देशमुख कामाला लागले आहेत. खारघर येथे “पत्रकारांची निदर्शने” आयोजित करण्यात आली आहेत. डॉ. उदय निरगुडकर, सुधीर सूर्यवंशी, विनोद यादव यासारख्या प्रसिद्ध पत्रकारांवरील हल्ला आणि धमकीच्या निषेधार्थ ही निदर्शने असल्याने याला चांगली प्रसिद्धी मिळणार हे स्पष्ट आहे. हाच लाभ मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरु झाली आहे.
इतकेच नव्हे! यानंतर, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे काही दिवसातच पत्रकारांच्या ह्ल्ल्याबाबतचे विधेयक मांडले जाईल आणि ते बहुधा मंजूरही होईल. स्वाभाविकपणे त्यावेळी विविध वृत्तवाहिन्यांवर याबाबत चर्चासत्र होणार! त्यावेळी मग, इतक्यात आंदोलन केलेले हे नेते एस. एम. देशमुखच वृत्तवाहिन्यांच्या नजरेत राहणार! आणि मग यांना चमकोगिरी करता येणार, हा यांचा खरा डाव! टी. व्ही. वर पत्रकारांचे नेते म्हणून सतत झळकत राहिले की, राज्यातील अनेक पत्रकार हाच आपला नेता म्हणून अशा कथित नेत्यांना भाव देऊ लागतात. पत्रकारिता न करताही पत्रकारांचे नेते म्हणून मिरवणाऱ्या एस. एम. देशमुख सारख्यांना हा असाच डाव साधून आपली नेतागिरीची दुकानदारी चालवायची असते. काही दिवसांपूर्वीच झी २४ तासच्या नवी मुंबई प्रतिनिधी स्वाती नाईक, उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर अत्यंत जीवघेण्या पद्धतीने हल्ला झाला. त्यावेळी हे नेते एस. एम. देशमुख यांना निदर्शने, मोर्चा असे आंदोलन करावेसे वाटले नाही. त्यावेळी त्यांना आपले हितसंबंध जपण्यातच स्वारस्य होते. त्यापुर्वीही अनेकवेळा असेच घडले आहे. प्रसिद्धी मिळू शकते असे वाटेल तिथे सोयीनुसार आंदोलन करण्याचा यांचा धंदा किळस आणणारा आहे.
मुळात पत्रकारिता न करताच पत्रकारांचे नेते म्हणून मिरवणाऱ्या या एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुखांना मुंबईत कुणी कुत्रंही भिक घालत नव्हते. मुंबईतील पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, अनिकेत जोशी, प्रसाद काथे, देवदास मटाले, प्रसाद मोकाशी, विनोद जगदाळे, सुभाष शिर्के यासारख्या अनेक पत्रकारांना वेळो- वेळी सोयीनुसार वापरून या देशमुखांनी मुंबईत आपली नेतेगिरीची दुकान थाटली आहे. बरे, यातील काही जण केवळ संघटनेत मोठे होऊ लागले आहेत किंवा त्यांचे महत्व वाढू लागले आहे म्हणून हे देशमुख महाशय त्यांच्यावरच उलटल्याची उदाहरणेही ताजी आहेत. या पत्रकारांच्या अनंत उपकारांचाही विसर या देशमुख महाशयांना पडला आहे. प्रत्यक्ष पत्रकारिता करीत असल्याने मुंबईतील वरील पत्रकारांना तसेच राज्यातील इतरही पत्रकारांना श्रेयाची लढाई करण्यात वेळ आणि इच्छाही नव्हती. त्यामुळेच या देशमुखांना नेते म्हणून मिरवण्यासाठी मोकळीक मिळवण्याचा डाव साधता आला. ते अनेक वर्षे डल्ला मारून असलेले “पत्रकार हल्ला विरोधी समितीचे अध्यक्षपद”, काही चेल्या-चपाट्यांना हाताशी धरून नियमबाह्यपणे स्वत:च नियुक्ती करून घेतलेले “मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्तपद”, चंद्रशेखर बेहेरे सारख्या ज्येष्ठ पत्रकारास पदावरून अक्षरशः लबाडीने हाकलून “मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष” म्हणून करून घेतलेली नियुक्ती, मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वर्षानुवर्षांपासून मिळणारे “महाराष्ट्र शासनाच्या राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्यपद” अशा इतरही अनेक पदांवर डल्ला मारून बसण्यासाठी या सूर्यकांत माणिकराव देशमुखांचा सतत आटापिटा सुरु असतो. ‘पत्रकारांच्या हितासाठी लढणारा नेता’ अशा गोंडस प्रतिमेचा डांगोरा आपल्या चेल्या-चपाट्यांमार्फत पिटत हे सर्व सुरु आहे. तसं अनेक वृत्तवाहिन्या, प्रमुख वर्तमानपत्रांनी या देशमुखांची पदलोलूपता, उपद्रवीपणा ओळखून त्यांना दूर ठेवले असले तरी इतर खरेखुरे, प्रतिष्ठित, चांगले पत्रकार नेमक्या कुठल्या भीतीने याकडे दुर्लक्ष करतात हे कळत नाही.
इतरांचा मोठेपणाच न पाहवणारे हे देशमुख स्वत:कडची अशीच अनेक पदं टिकवण्यासाठी आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी अनेकवेळा ज्येष्ठ पत्रकारांवर अत्यंत हीन पातळीवर जाऊन टीका करीत असतात. कुमार केतकर, दिनकर रायकर, निखिल वागळे, कुमार कदम, यदु जोशी, देवदास मटाले, चंद्रशेखर बेहेरे यासारख्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांसह इतरही अनेक पत्रकारांवर हे महाशय गरळ ओकत असतात.
बरे, यांच्या कथित अखिल भारतीय पत्रकारांच्या संघटनेत यांच्याशिवाय इतर कुणालाही चर्चेसाठी कधीच पुढे येऊ दिले जात नाही. सर्वाना गुळाचा गणपती बनवून ठेवण्यात आलेले दिसते. पत्रकारांची अशी कशी ही संघटना जिथे इतर कुणालाच बोलता येत नसावे! असो, एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नांसाठी काहीच केले नाही असे आमचे म्हणणे नाही; पण त्यांनी जे काही थोडेफार केले त्यामागचा हेतू प्रामाणिक अजिबातच नव्हता. मुंबईतील वरील नावे सांगितलेले पत्रकार आणि इतरही अनेक पत्रकार आपल्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, पण ते कधीच अशी चमकोगिरी करीत नाही, हे एस. एम. देशमुख आणि त्यांची चमचेगिरी करणाऱ्या मंडळींनी समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा पत्रकारांसाठी होणारा संभाव्य कायदा यांच्यासारख्या उपद्रवींमुळे पुन्हा थंड्या बस्त्यात जाईल. तेव्हा, एस. एम. (सूर्यकांत माणिकराव) देशमुख सुधरा! अन्यथा तुमच्या अवती- भोवतीचे पत्रकारच (खरोखर पत्रकारिता करणारे) तुम्हाला वठणीवर आणतील…
तूर्त इतकेच!
-एक सच्चा पत्रकार
(प्रत्यक्षात काम करणारा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here