मुरुड तालुक्यातील नांदगावमधील सर्पमित्र राजेंद्र अनंत कोतवाल (४८) यांचा सर्पदंशानेच शनिवारी रात्री मृत्यू झाला.
नांदगावमधील एका बागायतीमध्ये साप दिसल्यामुळे त्यास पकडण्यासाठी राजू कोतवाल यांना पाचारण करण्यात आले होते. अत्यंत विषारी असलेल्या या नागाला त्यांनी लीलया पकडले आणि पोत्यात भरुन त्यास जंगलात सोडण्यास नेण्याच्या तयारीत असतानाच नागाने त्यांच्या हाताला दंश केला. त्यांच्यावर मुरुडमध्ये प्राथमिक उपचार करण्यात येऊन पुढील उपचारासाठी अलिबाग येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारास विलंब झाल्याने विष अंगात पसरले आणि त्यांचे वाटेतच निधन झाले.
कोतवाल यांनी मुरुड तालुक्यातील अनेक गावांतून शेकडो सापांना पकडून त्यांना सुरक्षितपणे फणसाड अभयारण्यात सोडले होते. सापांबद्दल माहिती देणारे अनेक कार्यक्रम त्यांनी शाळा, महाविद्यालये व अन्य ठिकाणी केले होते.