महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना
पुन्हा वाढल्या, आघाडी सरकारची बघ्याची भूमिका
मुंबई : पत्रकारांना फ़न्टलाईन वर्करचा दर्जा देण्याची मागणी असो की, पत्रकारांवरील वाढते हल्ले असोत महाराष्ट्रातील आघाडी सरकार पत्रकारांच्या प्रश्नांबाबत केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केला आहे.. पत्रकारांच्या बाबतीत सरकार” मुक आणि बधीर” झाले असल्याची कठोर टीका देखील एस.एम.देशमुख यांनी केली आहे..
प़सिध्दीस दिलेल्या पत्रकात एस.एम यांनी म्हटले आहे की, विविध पध्दतीने पत्रकारांचा छळ करून त्यांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात परत वाढल्या आहेत.. आघाडी सरकारने सातत्याने पत्रकारांची उपेक्षा सुरू केली आहे.. त्यांच्या मागण्यांची दखलच न घेण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.. शिवाय पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत देखील सरकार उदासिन असल्याचा “योग्य तो” संदेश हितसंबंधीयांपर्यत पोहचला असल्याने पत्रकारांवर हल्ले करणे, त्यांना धमक्या देणे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करणे अशा घटना पुनहा५ वाढीस लागल्याचा आरोप एस.एम.देशमुख यांनी केला आहे..
जालना जिल्ह्य़ातील जाफराबाद येथील पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांनी रेती माफियांच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून त्यांच्यावर सामुहिक हल्ला केला गेला ..सर्व आरोपी अद्याप पकडले गेले नसले तरी पत्रकार पाबळे यांच्यावरच हाफ मर्डरचा खोटा गुन्हा दाखल केला गेला आहे.. पोलीस त्यांना अटक करण्याच्या तयारीत आहेत.. हा खोटा गुन्हा तातडीने मागे घ्यावा अशी मागणी देशमुख यांनी केली आहे..
फलटण तालुक्यातील जिंती येथील लोकमतचे पत्रकार प्रमोद रणवरे यांनाही वाळू माफियांनी जिवे मारण्याची धमकी दिली.. अगोदर पोलीस गुन्हा दाखल करायलाच टाळाटाळ करीत होते.. मात्र सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या दबावामुळे पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला गेला..
जालना येथील पत्रकार अविनाश कव्हळे यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना अडचणीचा ठरेल असा प्रश्न विचारल्याने दानवे यांनी कव्हळे यांना अर्वाच्च शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.. कव्हळे यांनी पोलिसात तक्रार देऊन तीन दिवस उलटले तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही..पोलीस केंद्रीय मंत्र्यांच्या दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे..
नगर येथे महापौर निवडीनंतर शिवसेनेत राडा झाला.. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत छापून आल्याने चिडलेल्या संपर्क प़मुख भाऊ कोरगावकर यांनी पत्रकारांबददल अपमानास्पद उदगार काढले.. नगरच्या पत्रकारांनी कोरगावकर यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला..
नगरपालिकेच्या गचाळ कारभाराच्या विरोधात बातम्या दिल्याने राहता येथील सार्वमतचे पत्रकार संकेत सदाफळ यांच्याविरोधात मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसात खोटा गुन्हा दाखल केला आहे..पत्रकारांना मानसिक त्रास देऊन त्यांचा आवाज बंद करण्याची मुख्याधिकारयांची कृती संतापजनक असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे..
अशा स्वरूपाच्या इतरही काही घटना गेल्या पंधरा दिवसात राज्यात घडल्या असल्या तरी संबंधितांवर कठोर कारवाई होत नसल्याने समाजकंटक मोकाट सुटले असून सरकार केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत.. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे.. सरकारने पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेतली नाही तर पत्रकारांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा एस.एम.देशमुख यांनी दिला आहे..