सन्मानपत्र…सांगलीकरांचे…

0
1543

manpatra मा .एस. एम. देशमुख सर

अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद आणि निमंत्रक पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सप्रेम नमस्कार पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी गेली तीन तपाहून अधिक काळाची वाटचाल करीत अनेक लढे वृत्तपत्रातून आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून लढणारा एक लढवय्या संपादक, पत्रकार ही आपली ओळख आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पत्रकारांना आपला त्यामुळेच रास्त अभिमान आणि आधार वाटतो. आज सांगली मुक्कामी आपल्या कार्याचा गौरव या मानपत्राव्दारे करताना आम्हा सांगलीच्या सर्व पत्रकारांना सार्थ अभिमान वाटतो. सांगलीचा प्रेस म्हणजे महाराष्ट्रात दबदबा असणारा. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच राज्यातील सर्व महत्वाचे निर्णय सांगलीतून जाहीर व्हायचे आणि त्यामुळेच सांगली हे पत्रकारितेच्या क्षेत्रातलं एक महत्वाचं केंद्र बनलं. केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, साहित्याच्या क्षेत्रात सांगलीचा असलेला दबदबा इथल्या पत्रकारितेनेही कायम ठेवला. त्याच पत्रकारांची पुढची पिढी आपला गौरव करताना अत्यंत आनंदीत आहे. नवी मुंबई, रायगडच्या परिसरातील सेझच्या विरोधात एका पत्रकाराने आंदोलन छेडले आहे आणि त्यात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झालेत हे आम्ही ऐकून होतो. शेतकर्‍यांच्या रेट्यापुढं कार्पोरेट क्षेत्र आणि सरकार झुकलं, पुढे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीही पत्रकारांनी आंदोलन छेडलंय, आणि तिथल्या नेत्यांनी हे दगडावर डोकं आपटणं सोडून द्या असा सल्ला दिल्याचं समजलं. पण रोज रस्त्यावर अपघातात पडणारा रक्ताचा सडा सहन करायचा का? या प्रश्‍नासह केलेल्या तीव्र आंदोलनाने चारपदरी रस्त्याला मंजुरी मिळवल्याचंही आम्ही ऐकलं होतं. पत्रकारांच्या एकीचे बळ दाखवणारे एस. एम. देशमुख असे आमच्यासमोर आजही उलगडतच आहेत. शेतकर्‍यांचा बुलंद आवाज असणार्‍या कृषीवल दैनिकाच्या संपादकपदाची देदीप्यमान अशी 23 वर्षांची कारकीर्द आणि त्यानिमित्ताने एक धडाडीच्या पत्रकाराची ओळख महाराष्ट्राला झाली. 77 वर्षांची झुंजार परंपरा असणारी महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना आणि देशातील पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद आपल्याकडे दोनदा चालून आले ते आपल्या कार्यामुळेच. 20 वर्षांपूर्वी शासनाने पत्रकारांच्या पेन्शनबाबत नेमलेल्या प्रकाश जोशी, एस. एम. देशमुख आणि बोधनकर समितीने शासनाला सकारात्मक अहवाल दिला. खरेतर समितीचे तेवढेच काम. पण, तुम्ही ते जिवितकार्य मानून गेली 20 वर्षे त्याच्या अंमलबजावणीसाठी झटत राहिलात. अनेकदा संतापाचे प्रसंग येऊनही संयम आणि शिस्तीने तुम्ही हा लढा हाताळलात आणि आता त्या लढ्याची परिपुर्ती दृष्टीपथात दिसते आहे. ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मंजूर होणारा तो सुदिन लवकरच उगवेल या आपणास सदिच्छा. पत्रकारांवरील हल्ले हे प्रदीर्घकाळ चिंतनाचा आणि समाजाच्याही संतापाचा विषय बनलेले आहेत. जनतेचा आवाज असणार्‍या माध्यमांचा गळा घोटला जात असतानाही सरकार जाणीवपूर्वक पत्रकार संरक्षण कायदा करण्यात टाळाटाळ करत आहे. अलिकडेतर माध्यम प्रतिनिधीेंवर बनावट गुन्हे दाखल करण्याचे प्रकारही वाढले आहेत. अशावेळी आपल्यासारखा कुशल संघटक गप्प कसा राहील? गेले आठ वर्षे झटणार्‍या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला आणि त्यात सहभागी 16 संघटनांसह आपण महाराष्ट्रात रान पेटविले आणि नुकताच 2 आक्टोबरला संपूर्ण राज्यात मूकमोर्चाने पत्रकारांची शक्ती दिसून आली. एका पत्रकार संघटनेचा नेता असूनही सर्व संघटनांना सोबत घ्या असं सांगणारा एक नेता अलिकडच्या काळात पत्रकारांनी पाहिला तो आपल्या रूपाने. आपल्याकडून प्रेरणा घेत आम्हीही सांगलीत एकत्र येत आहोत. एक होत आहोत. नक्कीच लवकर एक होउ. आजचा हा मेळावा त्याचीच आणखी एक पायरी आहे. हे होतच असताना शहरी आणि त्याहूनही अधिक ग्रामीण वार्ताहर अस्वस्थ आहे. तो एकाकी होता. त्याच्या पाठिशी संघटनेचं बळ आहे याची त्याला आता शाश्‍वती आली. पण, सर्वच पत्रकारांसमोर अनेक आव्हानं� आहेत. आणि त्यामुळेच एक अस्वस्थ पत्रकार समाजाला सांगतो, आम्हाला लोकशाहीचा चौथा खांब म्हटले जाते पण हा खांब स्वयंघोषित आहे. याला कायद्यात स्वतंत्र स्थान नाही. कर्मचार्‍याच्या, शेतकर्‍यांच्या, सामान्यांच्या समस्या मांडण्यासाठी अहोरात्र झटतो, इतरांच्या मोर्चाच्या गर्दीत चेंगरलेला पत्रकार उपाशी पोटी वार्तांकन करत असतो…. त्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार्‍यांनो तो जेव्हा संपावर जाईल तेव्हा तुम्हाला समजेल… पत्रकाराचा हा उद्वेग तुमच्या सारखा जाणता व्यक्ती समजतो आणि त्याला विधायक मार्गाने आपल्या मागण्या करायला एक दिशा देतो. आज त्या दिशेने राज्यातील पत्रकार वाटचाल करीत आहेत. सरकारला प्रश्‍न करून, आंदोलन करून भंडावून सोडत आहेत आणि म्हणूनच सरकारला हल्ला विरोधी कायद्याचा मसुदा करायला लागला, पेन्शनपात्र पत्रकारांची यादी करायचे सुचले, पत्रकार आणि त्याच्या कुटुंबियांना वैद्यकीय योजनेचा लाभ देण्याचा विचार करू लागले आहे. पण हे फायदे फक्त मूठभर अधिस्विकृतीधारक पत्रकारांना न मिळता गावागावात काम करणार्‍या पत्रकाराला मिळाव्यात म्हणून आपण झटता. त्यातूनच पायाला गँगरीन झालेल्या अहमदनगरच्या एखाद्या पत्रकाराला कृत्रिम पाय आणि जगण्याचा आधार तुम्ही बनवून देता. मनोरूग्ण बनलेल्या पत्रकारावर उपचारासाठी शक्ती पणाला लावता, सहाय्यता निधीतून पत्रकारांना लाखो रूपये मिळवून देता, पत्रकारांच्या हौसिंग सोसायट्यांपुढच्या अडचणी दूर करणे, छोट्या,मध्यम वृत्तपत्रे, साप्ताहिकांची दरवाढ, यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीपेक्षा जादा दराने नैमित्तिक जाहिराती अशा छोट्या वाटणार्‍या मोठ्या बाबींसाठी तुम्ही दिवसरात्र झटत रहाता. आज सांगली, उद्या नाशिक परवा नांदेड मध्येच मुंबई अशी सतत पायाला भिंगरी लावून फिरणारे तुम्ही ज्या कार्यासाठी झटत आहात त्यासाठी आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत.

आपले कार्य यशस्वी होवो याच आमच्या शुभेच्छा.

आपलेच.

सर्व पत्रकार सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here