मागच्या आठवड्यात व्हॉटस्अॅपवर एक पोस्ट फिरत होती.”कोकणातले शेतकरी का आत्महत्त्या करीत नाहीत आणि मराठवाडा,विदर्भातीलच शेतकरीच का आत्महत्या करतात” याची काही कारणं(?) त्यात सांगितलेली होती.घाटावरचे शेतकरी दारू पितात,दोन दोन बायका करतात,लग्नात हुंडा देतात,उधळपट्टी करतात,अंधरून पाहून पाय पसरण्याचं त्यांना माहिती नाही म्हणून कर्जबाजारी होतात आणि आत्महत्त्या करतात. वगैरे तारे पोस्टमध्ये तोडलेले होते.सुर आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या टिंगलीचा होता.मुळ पोस्ट ज्यानं लिहिली असेल त्यानं मराठवाडा अथवा विदर्भ पाहिलेलाही नसावा असं त्यावरून दिसत होतं.घाटावरची परिस्थितीची माहिती नसल्यामुळं शेतकर्यांच्या आत्महत्येचं खरं कारण संबंधित पोस्टमनला माहिती असण्याचं कारण नव्हतं .सांगीव आणि ऐकीव गोष्टीवर आधारित ही पोस्ट होती. ही पोस्ट आल्यानंतर दोनच दिवसांनी उरण परिसरातील शेतकर्यांकडं कसा अचानक पैसा आलाय आणि ते त्या पैश्याची कशी उधळपट्टी करीत आहेत याचं वर्णन करणारी बातमी मुंबईतल्या एका मोठ्या वर्तमानपत्रात आली होती.म्हणजे विषय चंगळवादाचाच असेल तर तो मराठवाडा- विदर्भात आहे आणि कोकणात नाही असं नाही तरीही केवळ मराठवाडा-विदर्भातीलच शतकरी आत्महत्या करीत असतील तर त्याची कारणं नक्कीच वेगळी आहेत हे स्पष्ट होतंं.अर्थात शेतकर्यांच्या आत्महत्येच्या मुळाशी जर जायचं असेल तर या विषयाचा एवढा उथळपणे विचार करून चालणार नाही.विषय गंभीर असल्यानं त्यावर तेवढ्याच गंभीरपणे चर्चा व्हायला हवी.दुदैर्वानं असं होताना दिसत नाही.पोस्ट व्हॉटसअॅपवर फिरविणाराचांच गैरसमज आहे असं नाही तर मुंबई-पुण्यात शेतकर्यांच्या आत्महत्या हा अनेकांसाठी टिंगलीचा,हेटळणीचा विषय झालेला आहे हे नक्की.काहींनी अज्ञानातून आपली मतं तयार केलेली असू शकतात. किंवा काहींना दुष्काळाचं गांभीर्यही कळलेलं नसू शकतं.त्यातुनच अनेक शहाणी- सुरती माणसं तर म्हणायला लागलीत की,”आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना मदत सुरू झाल्यानंतर आत्महत्येचं प्रमाण वाढल्यानं ही मदत देणं थांबविलं पाहिजे”.अशी मुक्ताफळं उधळणार्यांपैकी अनेकांचा वास्ववाशी कधी सामना झालेला नसतो.वस्तुस्थिती समजून घेण्याचीही त्यांची तयारी नसते.जरा मराठवाडयात फिरावं दुष्काळाची भयाणकता अनुभवावी,काही आत्महत्त्याग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन खर्या कारणांचा शोध घ्यावा असा प्रयत्न फारसा होताना दिसत नाही.पत्रकारांची स्थितीही फारशी वेगळी नसते.केवळ बातमीसाठी आम्ही तिकडे जातो.दोन दिवसात दोन-पाच शहरांना धावत्या भेटी देतो आणि आमचं मत तयार करतो. दुष्काळग्रस्त जिल्हयात गेलेले अनेक पत्रकार शहर सोडून बाहेर पडण्याचं कष्ट घेताना दिसत नाहीत. शहरात स्थानिक पत्रकारांना गाठणे ,त्यांच्याकडून माहिती घेणे,जुनी वर्तमानपत्रं चाळणे,नंतर पुढार्यांना गाठणे , त्यांची पोपटपंची ऐकणे आणि आपला दौरा आटोपून स्पेशल म्हणा किंवा ऑन दि स्पॉट म्हणा रिपोर्ट तयार करणे हा बहुसंख्य पत्रकारांचा खाक्या झालेला आहे.अशा पध्दतीनं रिपोर्टिंग करणार्यांना मुळ कारणांपर्यत पोहोचता येतेच असं नाही.अशा रिपोर्टमुळं मग पुण्या-मुंबईतील मंडळीचे बरेच गैरसमज होतात आणि आत्महत्यासारख्या विषयाकडंही मग ते चेष्टेच्या नजरेनं बघायला लागतात.आत्महत्येच्या संदर्भात हा जो माहितीचा घोटाळा होतोय तो टाळायचा असेल तर जाणीवपूर्वक प्रयत्न होणं गरजेचं आहे.
रविवारी पऱभणीत होतो.परभणी जिल्हयातील पत्रकारांनी एकत्र येत जिल्हयातील पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती.शेतकर्यांच्या आत्महत्या आणि पत्रकारांची भूमिका असाच कार्यशाळेचा विषय होता.अशा प्रकारची आणि दुष्काळ हा मध्यवर्ती विषय घेऊन आयोजित केलेली पत्रकाराची कार्यशाळा मराठवाड्यात प्रथमच होत असल्यानं सार्यांनाच उत्सुकता होती.मुंबईहून मी आणि प्रसाद काथे गेलो होतो.मराठवाड्यातील एक ज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्यातील शेती प्रश्नाचा गाढा अभ्यास असलेले अमर हबिब प्रमुख वक्ते होते . देोनशेच्यावर तरूण पत्रकारांनी हॉल खचाखच भरलेला होता.मी आणि काथे पुण्या-मुबंईतून गेलेलो असल्यानं सूर “तुम्ही आमची उपेक्षा करता,आत्महत्येची कारणं समजून न घेताच आम्हाला झोडून काढता” असा होता.आपल्या भाषणात अमर हबिब यांनी “निसर्गापेक्षा सरकारची धोरणंच आजच्या दुष्काळाला आणि आत्महत्येला कारणीभूत” असल्याचं मत व्यक्त केलं.सरकार कोणाचंही आलं तरी मराठवाड्यातील जनतेची दुःख कमी होत नाही असं सांगताना ते म्हणाले,फरक काहीच नाही आधिचं सरकार जर सापनाथ असेल तर आजचे सरकार नागनाथ आहे.आणखी एक वास्तव त्यांनी सांगितलं.प्लेग किंवा तत्सम साथीच्या रोगांनी जेवढे शेतकरी मेले नाहीत तेवढे शेतकरी आत्महत्त्या करून आपले जीवन संपवत आहेत.एका एका गावात एकाच दिवशी तीन तीन शेतकरी आत्महत्या करीत असल्यानं स्मशानात दिवसभर चिता भडकलेल्याच असतात.एवढं सारं घडत असतानाही ज्या गतीनं त्यावरचे उपाय शोधायला हवेत त्या गतीनं यंत्रणा हालत नाही असाही हबिब यांचा आरोप होता.मुंबई-पुण्यातल्या वर्तमानपत्रांंबद्दल आणि वाहिन्यांबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.इंद्राणी मुखर्जी सारख्या एका भंपकबाईने केलेल्या खुनाला जेवढा वेळ बातम्यात स्थान दिलं जातं त्याच्या एक टक्का देखील स्थानही मराठवाड्यातील दुष्काळासाठी दिलं जात नाही.टीआरपीच्या नावाखाली मराठवाडा विदार्भातील दुष्काळाच्या प्रश्नांची माध्यमं उपेक्षाच करतात असंही त्याचं सांगणं होतं. वर्तमानपत्रांच्या आवृत्यांमुळं आमची दुःख आमच्या वेदना मुंबईपर्यंत पोहोचतच नाहीत असंही त्यांचं म्हणणं होतं.
परभणीतील कार्यक्रमात एका तरूण पत्रकाराने आणखी एक खंत व्यक्त केली.मराठवाड्यातील अनेक पत्रकार मुंबईत महत्वाच्या पदांवर आहेत.अनेक वरिष्ठ पदावर अधिकारीही आहेत. मात्र ही सारी मंडळी मराठवाड्याला विसरली आहे.मराठवाड्यात दररोज एक-दोन शेतकरी आत्महत्या करीत असताना मुंबईस्थित आमचे पत्रकार मित्र मात्र आम्हाला काही देणे-घेणे नसल्यासाऱखेच वागताना दिसतात.त्यांनी मराठवाड्यातील जनतेसाठी लॉबिंग केलं पाहिजे असं या तरूण पत्रकाराचं म्हणणं होतं.मराठवाड्यावर जी आपत्ती कोसळलेली आहे त्याचा सर्वबाजुंनी जर मकाबला केला नाही तर मराठवाड्यातील जनता मोडून पडेल आणि आत्महत्त्या अधिक वाढतील अशी भितीही या तरूण पत्रकारानं व्यक्त केली.ती चुकीची नव्हती.नाही.तसा प्रयत्न नक्कीच करावा लागेल.मराठवाडावासियांच्या काही संस्था मुंबई-पुण्यात आहेत.त्याचं अस्तित्व केवळ पुरस्कार देण्यापुरतंच आहे.ऐरवी या संस्था आपसातच भांडत असतात.त्यांनाही आता एकत्र येत मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी काही करावं लागणार आहे.
एस.एम.देशमुख