शासनाने पत्रकारितेत हस्तक्षेप करू नये- दिनू ऱणदिवे

0
1088
77 वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना जाहीर झाला आहे.गोवा मुक्ती संग्राम,संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि पत्रकारांच्या हक्कासाठीच्या अनेक चळवळीत दिनू ऱणदिवें यांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे.थकल्यामुळे आता ते सार्वजनिक जीवनात नसल्यान पत्रकारितेतील नव्या पिढीला त्यांचा फारसा परिचय असण्याची शक्यता नाही
दिनू रणदिवे यांचा जन्म 15 सप्टेंबर 1925 रोजी झाला.वडील कम्पाउंडर तर आई गृहिणी.चळवळीच्या काळात सहकारी असलेल्या सविता सोनी पुढे सहचारिणी झाल्या.त्या शिक्षिका होत्या.सध्या दादर येथे रणदिवे यांचे वास्तव्य आहे.
2010 मध्ये दिनू ऱणदिवे यांना महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता.त्यावेळेस राजू पाटोदेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली होती.या मुलाखतीत त्यांनी काही मतं स्पष्टपणे मांडली होती.शासनाने पत्रकारितेत अजिबात हस्तक्षेप करता कामा नये असं ठोस प्रतिपादन तेव्हा रणदिवे यांनी केलं होतं.त्याच बरोबर सांप्रतच्या पत्रकारितेवर कोणतंही भाष्य कऱण्यास नकार देत आजच्या पत्रकारांना एक प्रकारे आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करण्यास सूचविलं होतं.रणदिवे आज थकले असले तरी त्यांची रोखठोक मतं आजही कायम आहेत.नव्या पिढीला त्यांची भूमिका समजावी यासाठी 2010म् ध्ये घेतली गेलेली ही मुलाखत येथे मुद्दाम देत आहे.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काल अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं तसेच काही वाहिन्यांनी त्यांची मुलाखतही घेतली आहे.
साहजिकच जाहीर झालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, 
दिनू रणदिवे – महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार मिळाल्याचा फोन मला आला. तेव्हा खरोखरच मन:पूर्वक आनंद झाला, लोक आपला गौरव करतात हाच खरा जीवन गौरव अशा साध्या शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 
 
यानंतर त्यांच्या पत्रकारितेच्या एकंदरीत प्रवासाबद्दल विचारले असता ते म्हणाले, 
दिनू रणदिवे – सुरुवातीला लोकमान्य, धनुर्धारी आदी वृत्तपत्रातून लेखन, २३ वर्षे महाराष्ट्र टाईम्समध्ये बातमीदार ते मुख्य वार्ताहर अशी नोकरी आणि त्यानंतर परत विविध वृत्तपत्रात मनसोक्त लेखन असा एकंदरीत पत्रकारितेचा प्रवास असल्याचे सांगून ते म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि माझी पत्रकारिता यांचे फार जवळचे नाते आहे. चळवळीच्या काळात मी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका हे पत्रक काढले होते. माझ्या सोबत माझे मित्र अशोक पडबिद्री हे होते. या संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेचा पहिला अंक १३ हजार प्रतीत काढावा लागला होता आणि दुसरा अंक २० हजार प्रतीत, कारण महाराष्ट्रातील लोकांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती हवी होती. आणि चळवळ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठीच आम्हाला अंक काढावा लागला. अत्यंत बिकट परिस्थितीत हा अंक निघत असे. 
 
संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि पत्रकार दिनू रणदिवे या समीकरणाबद्दल सांगतांना ते म्हणाले की, 
दिनू रणदिवे – माहिमच्या ओरिएन्ट हायस्कुलमध्ये शिकत असताना आमचे प्राचार्य यशवंत महादेव जुवळे यांनी केलेल्या भाषणाचा मोठा परिणाम माझ्या मनावर झाला. गोवा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत एक जागरुक पत्रकार म्हणून गोव्याला गेलो होतो. तेथील गोळीबार, त्यानंतर पंडीत नेहरुंचे भाषण आदी घटनाक्रमानंतर महाराष्ट्रात परत आल्यावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी काहीतरी करायचे म्हणून आम्ही लढत होतो. प्रभाकर कुंटे अध्यक्ष व मी सचिव असलेली युवकसभा नावाची आमची एक संघटना होती. 
 
या संघटनेच्या वतीने आम्ही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी सर्व भाषिक युवक परिषद घेतली. शाहीर अमर शेख या परिषदेला उपस्थित होते. त्याकाळी ही परिषद खूप मोठय़ा प्रमाणात यशस्वी झाली. या परिषदेत विविध भाषिक लोकांची त्या त्या भाषेतून भाषणे झाली. माझी पत्नी सविता सोनी हिने गुजरातीत भाषण केले. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक दोन वृत्तपत्रे सोडता तत्कालीन वृत्तपत्रे फारशी साथ देत नव्हती म्हणून आम्ही संयुक्त महाराष्ट्र पत्रिका काढली. पुढे आम्हाला अटक झाली. मात्र आमची चळवळ जोरदारपणे फोफावली आणि माझे चळवळीशी आजन्म नाते जोडले गेले. अटक झाल्यानंतर मला ठाण्याच्या जेलमध्ये मा.डांगे, आचार्य अत्रे यांच्यासमवेत चार महिने घालविण्याचे भाग्य लाभले.
 
शासन आणि पत्रकार यांच्यातील संबंध कसे असावेत याबद्दल सांगतांना ते म्हणाले की, 
दिनू रणदिवे – शासनाने पत्रकारीतेत अजिबात हस्तक्षेप करु नये. पत्रकारांनी स्वतंत्रपणे काम करावे. मात्र, शासनाच्या भूमिकेचा विचारही करावा, चुकीचे काही छापले असेल तर शासनाचा खुलासा देखील त्यात असावा. 
 
मी महानगरपालिकेत वार्तांकन करत असताना घडलेला प्रसंग सांगतो. एक माणूस एका अधिकार्‍याच्या दालनाबाहेर उभा होता. त्याची होत असलेली तगमग पाहून मी त्याला विचारले असता त्याने मला सांगितले की, त्याच्या तीन महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला असून त्याचे प्रेत पुरविण्यासाठी स्मशानभूमीतील जागा चांगली नाही. पाऊस पडल्याने सर्वत्र ओलं आहे. आणि तो विशिष्ट जातीचा असल्यामुळे त्या जातीच्या भागातच त्याला प्रेत पुरावे लागणार. त्याठिकाणी जमिन ओली असल्याने मुलास सर्दी होईल अशी भावना त्याची होती. म्हणून तो शिवडी स्मशानभूमी सोडून वरळी इथे गेला. तिथेही जागा नव्हती. तथापि, काहीतरी व्यवस्था करुन कोरडय़ा जागेत त्याने मुलाचे दफन केले. 
 
आता ही घटना मला माणुसकीच्या दृष्टीने महत्त्वाची वाटली आणि मी त्याची बातमी केली. दुसर्‍या दिवशी बातमी छापून येताच सकाळी पुण्याहून पु.ल.देशपांडे यांचा फोन आमचे संपादक गोविंद तळवळकर यांना आला. या बातमीसंदर्भात अत्यंत उद्विग्न होऊन ते संपादकांना म्हणाले की, या बातमीसंदर्भात मी एक पत्र पाठवतो. ते आजच छापा. काय चाललंय शासनात. सरकारला जागे होऊ द्या. सुदैवाने अधिवेशन सुरु होते. अधिवेशनात त्यादिवशी प्रचंड गदारोळ झाला. आणि शासनाने जाहीर केले की तातडीने स्मशानभूमीतील जातीच्या पाटय़ा काढून टाकल्या जातील. याप्रकारचे निकोप संबंध शासन आणि पत्रकार यांचे असावेत असे ते म्हणाले. 
 
आपणांस कोणत्या क्षेत्रातील पत्रकारिता जास्त आवडते? असे विचारले असता ते म्हणाले, 
दिनू रणदिवे – निश्चितच माझा मूळ पिंडच चळवळ आणि राजकीय असल्याने राजकीय क्षेत्रातील पत्रकारिताच मला जास्त आवडते. मात्र मी मंत्रालयात जास्त फिरलो नाही. मंत्रालयात न थांबताही माझ्या स्त्रोताद्वारे बातम्या मिळवत राहिलो. अगदीच सांगायचे म्हटलं तर साहित्य संस्कृती मंडळाच्या स्थापनेची बातमी, जलसंपदा आयोग (एरीगेशन कमीशन) ची बातमी मी आधी दिली. 
 
सध्याची पत्रकारिता कशी वाटते? यावर सांगताना मात्र त्यांनी याबाबत मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही असे म्हटले. तसेच मराठी भाषा आणि माध्यम याबाबत विचारले असता ते म्हणाले की,
दिनू रणदिवे – मराठी भाषेची महती साठ वर्षे झाली तरीही आपल्याला कळत नाही. ही एक मोठी खंत आहे. इतर राज्यातील त्यांच्या भाषेसंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती घेवून मराठीसाठी आग्रह व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. 
 
घरामध्ये असलेल्या विविध वर्तमानपत्रांच्या गठ्ठय़ांच्या ढिगार्‍यांबाबत विचारले असता ते म्हणाले की, 
दिनू रणदिवे – अरे बाबा, हे माझे व्यसन आहे आणि वृत्तपत्रे, कात्रणे याचा मी व्यसनी आहे. एक वृत्तपत्र वाचण्यास १ तास लागतो, मात्र कात्रणे काढण्यास दोन तास लागतात. जवळपास १९६९ पासून चार महत्त्वाची वृत्तपत्रे आणि आताच्या काळात परवडत नसल्यामुळे एक किंवा दोनच वृत्तपत्रे घेऊन त्याची कात्रणे काढण्याचा छंद मला आहे. म्हणून घरात इतर घरगुती सामानापेक्षा हाच वृत्तपत्रांचा ढिगारा मोठा आहे. 
 
तारापूर चिंचणी येथे १५ सप्टेंबर १९२५ साली दिनू रणदिवे यांचा जन्म वामन गणपतराव रणदिवे यांच्या घरी झाला. वडील कम्पाऊंडर होते. आई सरस्वती ही गृहिणी होती. चळवळीच्या काळात सहकारी असलेल्या सविता सोनी पुढे सहचारीणी झाल्या. त्या शिक्षिका होत्या. सध्या दादर येथील छोटय़ाशा घरात वृत्तपत्रांच्या सानिध्यात या दांपत्यांचे आयुष्य अत्यंत सुखासमाधानात सुरु आहे. 
 
दिनू रणदिवे यांचा संपर्क क्र.२४२२४०२४
 
-राजू पाटोदकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here