अलिबाग दि.23, माध्यम संवाद या जिल्हा माहिती कार्यालयाच्या अभिनव उपक्रमाद्वारे आज जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांनी रोह्यातील प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांना प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली.
रोहा येथील नगरपरिषदेच्या जेष्ठ नागरिक सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्यावेळी जेष्ठ पत्रकार रमेश (आप्पा) देसाई, दिलीप वडके, अरविंद करंबे यांच्यासह दै.लोकमतचे कोकण विभागीय समन्वयक जयंत धुळप, कोकण विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, इतर पत्रकार मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या सर्वच उपक्रमाला जिल्हयातील प्रसार माध्यमांव्दारे चांगली प्रसिध्दी मिळते. त्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी यांनी उपस्थित सर्व प्रतिनिधींचे आभार मानले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नुतन महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नवे उपक्रम राबविण्यात येत असून सोशल मिडीयाचाही प्रभावी वापर आता महासंचालनालय करीत आहे. शासकीय योजना, कार्यक्रम यांची माहिती अधिक जलद गतीने प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचावी यासाठी फेसबुक, ट्विटर हॅन्डल, यु टयूब, व्हॉटस्अप, ब्लॉग अशा सोशल माध्यमांचा उपयोग जिल्हा माहिती कार्यालय करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सुरु असलेल्या महान्यूज या लोकप्रिय वेब पोर्टलवर शासनाच्या राज्यभरातील महत्वाच्या बातम्या, लेख प्रसारित करण्यात येतात. त्याद्वारेही प्रसार माध्यमांना सहजतेने व तत्परतेन माहिती मिळू शकते त्याचा जास्तीत जास्त् उपयोग प्रसार माध्यम प्रतिनिधींनी करावा. त्याच प्रमाणे जिल्हयातील प्रसार माध्यम प्रतिनिधींनी महत्वूपर्ण विशेष लेख, यशकथा महान्यूजसाठी व लोकराज्य या मासिकासाठीही पाठवाव्यात अशी विनंती यावेळी करण्यात आली. प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी शासनामार्फत अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. यासाठीही प्रसार माध्यम प्रतिनिधींनी नियमानुसार अर्ज करावेत असे डॉ.पाटोदकर यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास दै.पुढारीचे प्रतिनिधी महेंद्र मोरे, दै.लोकमतचे प्रतिनिधी शशिकांत मोरे, दै.रत्नागिरी टाइम्सचे प्रतिनिधी राजेंद्र जाधव तसेच अंजूम शेट्टे, उदय मोरे, महादेव सरसंबे, दै.रायगडचा आवाजचे प्रतिनिधी सुहास खरिवले, दै.कृषिवल व दै.रत्नागिरी टाइम्सचे प्रतिनिधी जितेंद्र जोशी, दै.सागरचे प्रतिनिधी गुलाम धनसे, दै.कर्नाळाचे प्रतिनिधी सचिन साळुंके, जिल्हा माहिती कार्यालयाचे हिरामण भोईर, जयंत ठाकूर आदि उपस्थित होते.
0000000