अलिबाग दि.23 :- ज्येष्ठ पत्रकारांना शासनाच्या वतीने मिळालेली अधिस्वीकृती पत्रिका त्यांच्या गावी जाऊन घरपोच सन्मानपूर्वक देणे हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा अभिनंदनीय उपक्रम असून त्याचा साक्षीदार झाल्याबददल आपणास आनंद वाटतो आहे असे प्रतिपादन रोहा प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी आज रोहा येथे केले.
रोहा येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकर हातकमकर, रमेश (अप्पा) देसाई व अरुण करंबे यांना राज्य शासनाची अधिस्वीकृती पत्रिका मंजूर झाल्या असून उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे, नगराध्यक्ष समीर शेडगे,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांचे हस्ते पत्रिकांचे रोहा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सन्मानपूर्वक वितरीत करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय अधिस्वीकृतीचे अध्यक्ष मिलींद अष्टिवकर, तहसिदार सुरेश काशिद आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सुभाष भागडे यांनी जिल्हयातील हा उपक्रम रोहा येथे घेतल्याबददल जिल्हा माहिती अधिकारी तसेच समिती अध्यक्ष यांचे अभिनंदन केले. ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या कार्याबददल हा सन्मान दिल्याने निश्चितच शासनाबददल त्यांची आपुलकी अधिक वाढेल असे सांगून त्यांनी अधिस्वीकृती धारक ज्येष्ठ पत्रकारांसाठी असलेले इतर लाभही या सर्वांपर्यंत तातडीने पोहचवावेत ज्यायोगे त्याचा लाभ त्यांना व कुटूंबाला मिळू शकेल असे सांगितले तर नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी या उपक्रमाबददल माहिती जनसंपर्कचे विशेष आभार व्यक्त करुन ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मानार्थ असलेल्या या कार्यक्रमास आपणास बोलाविल्या बददल संयोजकाचे आभार मानले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या ज्येष्ठ मंडळीनी केलेली पत्रकारिता ही महत्वपूर्ण असून त्यांचा यथोचित सन्मान करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याबददल सन्मानार्थ काही नियमानुसार ही अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या गावी जाऊन सन्मानाने ही पत्रिका देण्याची पध्दत नुकतीच सुरु झाली असून रायगड जिल्हयात प्रथमच रोहा येथे हा कार्यक्रम होत आहे. येथील ज्येष्ठ त्रिमूर्तीं पत्रकारांना ही अधिस्वीकृती पत्रिका देण्याची दूर्मिळ संधी आपणास मिळाली आहे त्याबददल अभिमान वाटतो. कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मिलींद अष्टिवकर यांच्यामुळे हा योग आला असल्याचे ते म्हणाले. तसेच शासनामार्फत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी अधिस्वीकृती पत्रिका व त्या अनुषंगाने मिळणाऱ्या सोयी सवलतींचा लाभ सर्व पात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित पत्रकारांना केले.
सर्व अधिस्वीकृती धारक ज्येष्ठ पत्रकारांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना विभागातील उर्वरीत ज्येष्ठ पत्रकारांना या सुविधा मिळवून देण्यासाठी आपण आग्रही असल्याचे अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष व रोहा प्रेस क्लबचे सल्लागार मिलिंद अष्टीवकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार पराग फुकणे यांनी यावेळी सूत्रसंचालन तर पत्रकार राजेन्द्र जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष शशिकांत मोरे,श्रीमती अंजूम शेटये, उदय मोरे,जितेंद्र जोशी, अलताफ चोरडेकर, सुहास खरिवले, नरेश कुशवाह,विश्वजीत लुमन, बाबूभाई धनसे, महेश बामूगडे, अमोल करलकर, श्रीमती समीधा अष्टिवकर व अन्य पत्रकार उपस्थित होते.