रायगड वार्तापत्र

0
876

रायगडमध्ये यंदा तब्बल एक महिना उशिरा पावसाला सुरूवात झाली.त्यामुळं खरिपाचा हंगाम देखील लांबला आहे.मात्र पावसानं ओढ दिल्यानं शेतातला राब अनेक ठिकाणी करपून गेल्यानं बऱ्याच शेतकऱ्यांना भाता ऐवजी अन्य कडधान्याचे पीक घ्यावे लागत आहे.त्यामुळं यंदा भाताच्या लागवडीचे क्षेत्रफळ कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.रायगड जिल्हयात 4 लाख हेक्टर क्षेत्रफळावर शेती केली जाते.त्यातील 1लाख 24 हजार क्षेत्रफळावर भाताची लागवड केली जात असली तरी यंदा हे क्षेत्रफळ वाढवून 1 लाख 41 हजार हेक्टरवर भाताची लागवड कऱण्याचे उद्दिष्ट नक्की कऱण्यात आले होते.मात्र एकट्या अलिबाग तालुक्यातीलच एक हजार ते बाराशे हेक्टरवरील राब पावसाअभावी करपल्याने भाताच्या लागवडी खालील क्षेत्रफळात मोठी घट होण्याची शक्यता आहे.यंदा 1 लाख 10 हजारच्या आसपास हेक्टर क्षेत्रफळावर भाताची लागवड होईल अशी शक्यता आहे.भाताचे क्षेत्रफळ कमी झाले तरी अन्य कडधान्याचे क्षेत्रफळ वाढणार आहे.पाऊस उशिरा आला असला तरी तो चांगला झाल्याने शेतकरी आनंदीत आहेत.जिल्हयातील न दी,नाल्यांना पूर आल्याने पाणी टंचाईचे संकटही टळल्याने जिल्हा प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

रायगडात या पण जर सावध
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात रायगडात चांगला पाऊस झाल्याने जिल्हयातील अनेक धबधबे वाहू लागले आहेत.निसर्गानंही हिरवा शालू परिधान केल्यानं वातावरण आल्हाददायक आहे.याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी सध्या जिल्हयातील विविध धबधब्यावर तसेच समुद्र किनाऱ्यावर येत आहेत.मात्र अनेकदा येणारे पर्यटक उत्सहाच्या भरात निसर्गाचे नियम पाळत नसल्यानं अनेकदा अपघात होतात.त्यात पर्यटकांचे प्राणही जातात.मागच्या आठवड्यातच मुरूडच्या किनाऱ्यावर मुंबईच्या सहा पर्यटकांचा समुद्रात बुडुन दुदैर्वी अंत झाला.त्याच दिवशी हरिहरेश्वरच्या समुद्रातही पुण्याच्या एका पर्यटकाचा अंत झाला तर चार दिवसांपुर्वीच कांजूरमार्गचा एक पर्यटक रायगड किल्लयावरून पाय घसरून खोल दरीत कोसळला.अशा प्रकारे गेल्या पंधरा दिवसात रायगडात आठ पर्यटकांचे बळी गेले आहेत.गेल्या दहा वर्षातील ही संख्या 116 एवढी मोठी आहे.मुरूड तालुक्यातील काशिद आणि श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर हे दोन समुद्र किनारे अधिक धाकादायक असल्याचे तेथे घडलेल्या अपघातावरून दिसते.10 वर्षात काशिदच्या बिचवर48 पर्यटकांचा बुडून मृत्यू झालाय तर हरिहरेश्वरच्या समुद3ात 31 पर्यटकांचा अंत झालाय.ही संख्या चिंता वाटावी अशीच आहे.त्यामुळं पर्यटकांना रायगडात या,निसर्गाचा आनंद लुटा,पण निसर्गाशी मस्ती करू नका आणि ठिकठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर लिहिलेल्या सूचनांचं पालन करा असं आवाहन करावं वाटतं.सातत्यानं समुद्रावर होणाऱ्या या अपघाताकडे सरकारनंही लक्ष दिलं पाहिजे.धोकादायक असलेल्या ठिकाणी जिवरक्षक नेमणे,धोक्याच्या सूचना देणारे फलक लावणे,महत्वाच्या ठिकाणी पोलिस तैनात कऱणे आदि व्यवस्था कऱणे आवश्यक आहे.तशी मागणी होत आहे.

रायगडात महिला राज

– रायगडातील कर्जत वगळता अन्य दहा नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका नुकत्याच संपल्या.त्यानुसार राष्ट्रवादी कॉग्रेसनेे खोपोली,माथेरान,रोहा आणि श्रीवर्धन या चार नगरपालिकावरील आपली सत्ता कायम ठेवली आङे.पनवेल,पेण आणि महाड येथील सत्ता कायम ठेवण्यात कॉ्रग्रेसलाही यश आले आहे तर शेकापने अलिबागवरची आपली सत्ता कायम राखली आहे.उरणमध्ये शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.मुरूडमध्ये आरक्षित प्रवर्गातील कोणत्याही उमेदवाराने र्अॆ न भरल्यानं तेथील नगराध्यक्षपदाची जागा रिक्त राहिली आहे तर कर्जत नगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच झाल्याने आणि नगराध्यक्षांची मुदत न संपल्याने तेथील नगराध्यक्षांची निवड झाली नाही.जिल्हयातील पनवेल,माथेरान,श्रीवर्धन,महाड आणि पेणच्या नगराध्यक्षपदी महिलांची निवड झाल्याने जिल्हयातील बहुसंख्य नगरपालिकेत आता महिला राज आलेले आहे.नगराध्यक्षपदाच्या निवडणुका शांततेत पार पडल्या असल्या तरी या निवडणुकांमुळे जिल्हयातील वातावरण ढवळून नि घाले होते.आगामी विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने या निवडणुका महत्वाच्या होत्या.

कॉरिडॉरविरोधात माणगावत मोर्चा

दिल्ली-मुंबई इन्ड्‌स्ट्रीयल कॉरिडॉरला विरोध कऱण्यासाठी माणगाव,तळा,आणि रोहा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी 9 जुलै – रोजी माणगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्ते केला.रायगडच्या माणगाव,तळा,आणि रोहा तालुक्यात होत असलेल्या या प्रकल्पात 78 गावतील 67,500 एकर जमिन संपादित केली जाणार असून त्यासाठी सातबाराच्या उताऱ्यावर इन्ड्‌स्ट्रीयल कॉरिडॉरसाठी असे शिक्के मारले गेले आहेत.त्याला शेतकऱ्यांचा विरोध असून आम्ही आमच्या जमिनी कुठल्याही परिस्थितीत देणार नाहीत असा त्यांचा नि र्धार आहे.त्यासाठी इन्डस्ट्रीयल कॉरिडॉऱविरोधी शेतकरी कृती समिती स्थापन कऱण्यात आली असून या समितीच्यावतीने हे आंदोलन कऱण्यात आले.समितीच्या नेत्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा

1959 मध्ये स्थापन झालेल्या रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा 55 वा वर्धापनदिन 19 जुलै – रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रहारचे संपादक महेश म्हात्रे उपस्थित होेते..पत्रकारिता हे केवळ भ्रष्टाचार आणि अन्यायाच्या विरोधात लढण्याचेच साधन नाही तर ते समाज प्रबोधनाचेही साधन आहे.त्यामुळं पत्रकारितेतून समाजाला आत्मभान देण्याची गरज आहे असे विचार महेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.यावेळी जिल्हयातील पत्रकारांना विविध पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आले.प्रतिष्ठेचा रायगड पत्रभूषण पुरस्कार माधव पाटील यांना,रामनारायण युवा पुरस्कार भारत रांजणकर,आणि म्हसळा येथील अशोक काते यांना देण्यात आला. – र.वा.दिघे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कर सुरेंद्र मुळीक यांना दिला गेला.या कार्यक्रमास जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील,उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी,ज्येष्ठ पत्रकार प्रसाद केरकर,मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार आदि उपस्थित होते.

शोभना देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here