रायगडमध्ये 434 गावं आणि 1433 वाडयांवर पाणी टंचाई
रायगड जिल्हयात दरवर्षी साडेतीन हजार मिली मिटर पाऊस पडत असला तरी जिल्हयाला दरवर्षी न चुकता पाणी टंचाईच्या झळा बसत असतात.यावर्षी तर पाऊस कमी झाल्याने जिल्हयातील पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट झालेला आहे.सरकारी आकडेवारी नुसार जिल्हयात 434 गावे आणि 1433 वाड्यांना पाणी टंचाईचा मुकाबला करावा लागत असला तरी प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचे दिसून येत आहे.अर्थात जिल्हयातील पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर असून जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेअंतर्गत 188 विंधन विहिरांना मंजुरी दिली आहे.त्यासाठी 88 लाख 36 हजार रूपये खर्च होणार असून विंधन विहिरीची ही कामे लगेच सुरू करण्यात येणार आहेत.फेब्रुवारीच्या आरंभी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या कृती आराखडयात 577 विंधन विहिरी खोदण्याचे नियोजन करण्यात आले होते .मात्र सध्याची गरज लक्षात घेऊन 188 विंधन विहिरीच खोदण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.15 तालुक्यातील या विंधन विहिरीसाठी प्रत्येकी 47 हजार रूपये खर्च येणार आहे.जिल्हयातील काही दुर्गम भागात टँकर आणि बैलगाडीनेही पाणी पुरवठा केला जात आहे.
रायगडमध्ये विहिर स्वच्छता अभियान
रायगड जिल्हयातील पाणी टंचाईशी सामना करण्यासाठी विविध सामाजिक संघटना पुढे येत आहेत.कर्जत तालुक्यात काही सामाजिक संस्थांनी गावं दत्तक घेऊन तेथे पाणी पुरवठयाची जबाबदारी पत्करली आहे.काही संस्थांनी कर्जतहून लातूरला पाणी पाठविण्याचा उपक्रमही राबविला आहे तर अन्य काही संस्थांनी पाण्याचे जुने स्त्रोत मोकळे करून पुन्हा जिल्हयात पाणी टंचाई जाणवणार नाही अशी व्यवस्था करायला सुरूवात केली आहे.रायगडमध्ये गाव तळी तसेच विहिरीच्या माध्यमातून गावाची पाण्याची तहान पूर्वा भागविली जायची.मात्र विहिरी गाळानं भरल्या आणि तळीही अटली.तळ्याची दुरूस्ती करण्याचे,गाळ काढण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे.डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीन श्रमदानातून विहिरी स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे.21 तारखेपासून सुरू करण्यात आलेल्या या अभियानात आतापर्यंत 100च्यावरती विहिरी स्वच्छ करण्यात आल्या असून 500 ते 600 विहिरी स्वच्छ करण्याचा संकल्प प्रतिष्ठानने सोडला आहे.विहिरीतील गाळ काढून पाण्याचे झरे मोकळे करून जलस्त्रोतांचे पुनरूज्जीवन केले जात आहे.गेल्या वर्षी ठाणे जिल्हायत 51 विहिरीची प्रतिष्ठानने अशीच स्वच्छता केल्यानंतर यंदा तेथील विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याचा अनुभव लक्षात घेऊन जिल्हयात हा उपक्रम राबविला जात आहे.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचे जिल्हयात कौतूक होत असून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.- रायगडमध्ये विहिरी स्वच्छता अभियान
मनोहर पर्रिकरांची रायगड भेट
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 336 व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी रायगड किल्ल्याला भेट देऊन शिवरायांना आदरांजली वाहिली.श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यावतीन आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पर्रिकर यांनी रायगड किल्ल्याच्या मुळ स्वरूपात कुठलाही बदल न करता किल्ल्याची डागडुजी व दुरूस्ती करून रायगड किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.रायगड किल्ल्याचे महत्व अधोरेखित करून किल्ल्याचे जतन आणि संवर्धन झाले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.किल्लयाची दुरूस्ती करताना किल्ल्यावरील ऐतिहासिक घटना पर्यटकांना नव्याने अनुभवता येतील अशा प्रतिमा तयार केल्या जाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आव्हानांचा मुकाबला करीत शिवरायांच्या स्वप्नातला देश घडविण्यासाठी आपण सर्वांनी कटीबध्द असलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं.यावेळी संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते गडारोहण स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच कीर्तनकार,शाहिरांचा आणि लष्करात उत्कृष्ट कार्य करणार्या जिल्हयातील सुपुत्रांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमानंतर राजदरबार ते शिवसमाधी दरम्यान शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती.यावेळी स्थानिक आमदार भरत गोगावले तसेच विनायक मेटे आणि अन्य पदाधिकारी,अधिकारी उपस्थित होते.-
महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ
मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकऱणाचे कुर्मगतीनं सुरू असलेलं काम,रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पडलेलं बांधकाम साहित्य,काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी डायर्व्हशन काढले असल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि यासर्वामुळे महामार्गावर दररोज सांडणारा रक्तांचा सडा हे चित्र आता नेहमीचे झाले आहे.रायगडच्या पत्रकारांनी सतत पाच वर्षे आंदोलन केल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली खरी पण आता हे काम कधी एकदाचे संपते असे लोकांना झाले आहे.कारण कामामुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला असून अपघातांचे प्रमाणही चिंता वाटावी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे.एकटया रायगड जिल्हयात जानेवारी,फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात 9 मोठे अपघात झाले असून त्यात 10 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.25 जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.सध्या सुटया लागलेल्या असल्याने कोकणात पर्यटनासाठी येणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने अपघातांची संख्या ही वाढल्याचे दिसते आहे.होणारे अपघात टाळण्यासाठी सरकारी यंत्रणा फार काळजी घेताना दिसत नाही.अपघात झाल्यास वेळेत अॅब्युलन्सही उपलब्ध होत नसल्याच्या नागिरकांच्या तक्रारी आहेत.
शोभना देशमुख