रायगड जिल्हा वार्तापत्र –

0
864

– ठळक बातम्या
————————

* वाळित प्रकरणानं रायगड ढवळून नि घाला
* मुंबई -गोवा महामार्गाचं काम बंद पडल्यानं जनतेत नाराजी
* मानवी हक्क दिन साजरा
* बदलत्या हवामानामुळे आंबा पिक धोक्यात

.वाळित टाकण्याच्या घटनांच्या निमित्तानं आणखी एक वास्तव समोर आलंय की,या घटना अलिबाग,मुरूड आणि श्रीवर्धन या किनारपट्टीच्या तालुक्यात तुलनेत अधिक घडलेल्या आहेत तर पनवेल,उरण,कर्जत या उत्तर रायगडमधील मुंबईच्या जवळ असलेल्या तालुक्यात अजूनर्पयत तरी अशी एकही घटना समोर आलेली नाही.त्यामुळं रूढी आणि परंपरांचा पगडा असलेल्या भागातच या घटना घडल्याचं दिसून येतंय.ज्या घटना समोर आलेल्या आहेत त्या जमिनीच्या वादातून किंवा स्थानिक राजकारणातून घडेलेल्या दिसतात.अनेक प्रकरणातील कारण तर अत्यंत क्षुल्लक आहे.रोहा तालुक्यातील खाजणी येथील मोहिनी तळेकर यांच्या कुटुंबावर अकरा महिन्यापुर्वी किरकोळ कारणावरून बहिष्कृत केलं गेलं.या विधवा महिलेची गावातून धिंडही काढली.या मानसिक धक्क्यातून मोहिनी तळेकर नंतर सावरल्याच नाहीत.अखेर त्यांनी 18 नोव्हेंबरला आत्महत्या केली.या घटनेला माध्यमांनी प्रसिध्दी दिल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष रायगडकडं वधलं गेलं आणि आता समाजप्रबोधनासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.जिल्हा प्रशासनान कुटुंब वाळित पृथा निर्मुलन अभियानही सुरू केले असून या अभियानाच्या माध्यमातून मुरूड तालुक्यातील शिघ्रे येथील जगदीश मांदाडकर आणि शिरगावमधील कृष्णा सातमकर यांच्या कुटुंबाची वाळित प्रखरणातून मुक्तता कऱण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनानं केला आहे.सामाजिक बहिष्काराच्या विरोधात सक्षम कायदा नसल्यानं पोलिस यंत्रणा हतबल असल्याचं दिसून येतंय.त्यामुळं प्रबोधनातूच विचार परिवर्तन करावे लागणार असले तरी वाढते वाळित प्रकऱणं लक्षात घेता सरकारनं सक्षम कायदा करावा आणि तातडीने कायद्याचा कोणताही आधार नसलेल्या गावक्या आणि जातपंचायतीवर बंंदी घालावी अशी मागणी केली जात आहे.डाव्या आणि पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या रायगड जिल्हयातील वाळित प्रकरणं साऱ्यानाच आचंबित कऱणारी असल्यानं हे प्रकार थांबलेच पाहिजेत अशी सामांन्य रायगडवासियांची इच्छा आणि आग्रह असला तरी जिल्हयातील कोणताही राजकीय पक्ष यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही हे विशेष आहे.

मुंबई -गोवा महामार्गाचं काम बंद पडल्यानं जनतेत नाराजी

– कोकणातील पत्रकारांनी सातत्यानं पाच वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलन केल्या नंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मिटरच्या पहिल्या टप्प्याच्या कामास सुरूवात झाली.नियोजन असं होतं की,जून 2014 पर्यत हे काम पूर्ण व्हावं.दुर्दैवानं डिसेंबरसरत आला तरी रस्त्याचं काम 30 टक्के देेखील पूर्ण झालेलं नाही. आता तर गेला दीड महिना कामच ठप्प पडलं आहे.कर्नाळा अभयारण्याचा विषय मार्गी लागलेला नाही,भूसंपादन झालेलं नाही,सिडकोची पाईपलाईन बदलली गेली नाही अशा याची काही कारणं दिली जात असली तरी कोकणातील जनतेला ही कारणं मान्य नाहीत.मुंबईला जोडणारे अन्य सारे महामार्ग विनासायास चौपदरी झालेले असताना मुंबई-गोवा महामार्गाच्या बाबतीतच समस्यांचा पाढा का वाचला जातोय हा कोकणी माणसाचा सवाल आहे.महामार्गचं काम निर्धारित वेळेत झालं नाही ते कधी होईल हे सागणंही कठिण झाल्यानं प्रकल्पाचा ख र्च तर वाढणार आहेच त्याचबरोबर रस्तयावरील अपघातही वाढणार आहेत.कारण अर्धवट कामामुळे अनेक ठिकाणी सारा राडारोडा रस्तयावर पडलेला आहे,अनेक ठिकाणी डायव्हर्शन काढले गेलेेले आहेत,त्यामुळं वाहतूक जॅमचा प्रश्नही निर्माण झाालेला आहे.त्यामुळं बंद पडलेलं हे काम तातडीनं पुन्हा सुरू करावं अशी कोकणातील जनतेची मागणी आहे.कोकणातील जनतेच्या या भावनांना कोकणातील पत्रकारांनी थेट रस्त्यावर उतरून वाचा फोडली आहे.कालच कोकणातील पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांच्यानेतृत्वाखाली पेण येथील रेल्वे स्थानकासमोर महामार्ग रोको आंदोलन करून कोकणातील जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधले आहे.त्या अगोदर कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनीही महामार्गचे काम बंद पडल्याबद्दल विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सरकारला सवाल विचारला होता.पहिल्याच टप्प्याचं काम असं रेंगाळत असेल तर चार टप्प्यात होणारं हे काम कधी पूर्ण होणार असा कोकणी जनतेचा सवाल आहे.अरूंद रस्ते ,वाढलेली वाहतूक,असंख्य वळणं यामुळे महामार्गावर दर वर्षी 500च्या वर माणसं मृत्युमुखी पडतात आणि 1200च्या वर जखमी होतात.रस्त्यावर दररोज होणारा हा रक्ताचा अभिषेक थाबवायचा असेल आणि कोकणाच्या विकासाल चालना द्यायची असेल तर मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे असं कोकणातील पत्रकार आणि जनतेलंा वाटतं.

मानवी हक्क दिन साजरा

रायगड जिल्हयात सामाजिक बहिष्काराच्या घटना सातत्यानं प्रकाशात येत असताना आणि मानवी हक्काची उघडपणे पायमल्ली होत असताना यावर्षीच्या मानवी हक्क दिनाच्या निमित्तानं या प्रश्नांवर सांगोपांग चर्चा केली गेली.मानवी हक्का दिनाचे आौचित्य साधून 10 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एच.ए.पाटील यांनी रायगडमध्ये मानवी हक्कांशी संबंधित प्रखरणांचा निपटारा कऱण्यासाठी जिल्हयात विशेष न्यायालयं स्थापन होण्याची गरज प्रतिपादन केली.ते म्हणाले,समाजातील प्रत्येक घटकाने आपली कर्तव्य कायद्याला अनुसरून बजावल्यास त्याला दुसऱ्याच्या हक्काची जाणीव होईल.म्हणजेे कर्तव्याची जाणीव ठेवल्यास हक्काचे उल्लंघन होणार नाही.कायद्याचा प्रचार आणि प्रसार करूनच मानवी हक्क दिन साजरा केला पाहिजे अशी सूचनाही त्यानी केली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सुमंत भांग ेयांनी वाळित प्रकरणांची शासनाने गंभीर दखल घेतली असून त्यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले.रायगडात इतरत्रही मानवी हक्क दिन साजरा केला गेला.जिल्हयात सर्रास मानवी हक्काची पायमल्ली कऱणाऱ्या घटना घडत असल्यानं या दिनाचे विशेष आौचित्य होते.

आंबा पिक धोक्यात

वातावरणातील सततचा बदल आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अनेक ठिकाणी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाचा आंबा पिकाला जबर फटका बसल्यानं शेतकरी चिंतातूर आहेत.रायगड जिल्हयात 12 हजार हेक्टर क्षेत्रफळावर आंबा पीक घेतले जाते.थंडीच्या काळात आंब्याला चांगला मोहोर येतो.मात्र यंदा पावसाळा उशिरा पर्यत रेंगाळत राहिल्यानं थंडी देखील उशिरा पडायला लागली.नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडयापासून बहुतेक आंब्याच्या झाडावर मोहोर दिसायला लागला होता.मात्र डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडयात वादळी वाऱा आणि जोरदार पावसानं थैमान घातल्यानं आलेला मोहोर गळून गेला असून जिल्हयातील 7 अब्ज 50 कोटी रूपयांचे आंबा पीक धोक्यात आलं आहे.पावसामुळे आंब्यावर तुडतडया रोग आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.हवामान,पाऊस आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळ ं जिल्हयातील आंबा पिकाच्या उत्पादनात 60 टक्के घट होऊ शकते अशी शक्यता अलिबाग तालुका आंबा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी व्यक्त केली आहे.पिकाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

शोभना देशमुख –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here