रायगडात भात पिकाचं मोठं नुकसान 

0
839

उशिरा पाऊस येणं,अवेळी येणं,उशिरापर्यत पाऊस कोसळत राहणं हे आता कोकणासाटी  नित्याचं झालं आहे.यावर्षी देखील पावसाची ही रूपं बघायला मिळाली.यंदा पावसाला जवळपास दीड महिना उशिरा सुरूवात  झाली. त्यामुळं लावणी उशिरा झाली.नंतर पाऊस एवढा कोसळत गेला की,पिकं पिवळी पडू लागली,या साऱ्या संकटाशी मुकाबला करीत सुदैवानं पिक चांगलं आलं.आता ते हाता तोंडाशी आलेलं असताना परतीच्या पावसानं शेतकऱ्यांना झोडपून काढलं असून गेली दोन दिवस कोकणात कोसळत असलेल्या जलधारांनी शेतात मळणीसाठी काढून ठेवलेला भात भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसानं झालं आहे.

गेली आठ-दहा दिवस रायगडात भात पिकाची काढणी आणि मळणीचं काम सुरू होतं तरी दिवाळी आणि मजुरांचा तुटवड्यामुळं हे काम वेळेत होऊ शकलं नाही.तेवढ्यात शुक्रवारी रात्रीपासून कोकणातील तिनही जिल्हयात पावसाला सुरूवात झाल्यानं शेतातील भात भिजून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.रत्नागिरी,सिंधुदुर्गच्या तुलनेत रायगडात पावसाचे प्रमाण कमी असले तरी दक्षिण रायगडमध्ये पिकाचे नुकसान मोठे झाले आहे. पोलादपूर,म्हसळा,तळा,महाड या तालुक्यातील हजारो हेक्टरमधील मळणीसाठी काढून ठेवलेल्या भात पिकाचं नुकसान मोठं झालं आहे. रायगडमध्ये 1लाख 25 हजार हेक्टर एवढे भातक्षेत्र असून त्यातील 1 लाख 23 हजार हेक्टरमध्ये भाताची लागवड झाली होती.उशिरा पाऊस सुरू झाल्यानंतरही नंतर पाऊस चांगला झाल्यानं पिकं चांगलं आलं होतं.पुरेसा पाऊस आणि आधुनिक आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या वाणाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्यानं  प्रतिहेक्टरी 50 क्विट्टल भात पिक होईल अशी शक्यता कृषी विभागाला वाटत होती.मात्र क ालपासून अधुन मधुन पडत असलेल्या पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here