मुंबईशी निकटता,वाढते औद्योगिकरण,शेती व्यवसायाबद्दल तरूणांच्या मनात असलेली उदासिनता आदि कारणांमुळं रायगड जिल्हयात वहिवटीखालील शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली असली तरी सुधारित बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भात पिकाच्या उत्पादनात मात्र यंदा लक्षणीय वाढ झाल्याचे सुखद चित्र रायगड जिल्हयात दिसत आहे.
काही वर्षांपूर्वी जिल्हयात खरीप हंगामातील लागवडीचे क्षेत्र 1 लाख 25 हजार हेक्टर एवढे होते.ते यावर्षी 1 लाख 13 हजार हेक्टरपर्यत कमी झाले आहे.कमी होत असलेल्या क्षेत्रफऴाचे गांभीर्य विचारात घेऊन आहे त्या क्षेत्रफळातून उत्पादकता वाढविण्याचा संकल्प कृषी विभागानं सोडला.त्यासाठी ग्रामीण भागात कार्यशाळा घेऊन जनजागृती केली,सुधारित बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबतची केवळ माहितीच देऊन कृषी विभाग थांबला नाही तर विभागाने प्रात्यक्षिकावर भर दिला.त्यादृष्टीनं जिल्हयात ठिकठिकाणी 46 प्रयोग राबविले गेेले
कृषी विभागाच्या या प्रयत्नांना जिल्हयातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यानं भाताच्या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.गत वर्षी प्रति हेक्टरी उत्पादन 28 क्विंटल झाले होते. यंदा त्यात वाढ होऊन प्रति हेक्टरी 30 क्विंटल भाताचे उत्पादन झाले आहे.गेल्या वर्षी जिल्हयात 30 लाख क्विटल भाताचे उत्पादन झाले होते यंदा ते 33 लाख क्विंटलपर्यत वाढेल अशी कृषी विभागाला अपेक्षा आहे.शेती क्षेत्रात नव्यानं होत असलेल्या या प्रयोगांमुळे रायगड जिल्हयाचा कधी काळी भाताचे कोठार असा असलेला नावलौकिक पुन्हा प्राप्त होण्याची शक्यता आहे.