रायगड जिल्हयात दरवर्षी साडेतीन हजार मिलीमिटर पाऊस पडतो.मात्र सिंचनाच्या सुविधा नसल्याने पडलेला पाऊस समुद्रास जाऊन मिळतो .जी धरणं बांधली गेली आहेत त्याच्या पाण्याचंही नियोजन नसल्यानं तो साठा तसाच पडून असतो.या संदर्भात पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचा उल्लेख करता येईल.या धरणात मुबलक पाणी असतानाही त्याचा विनियोग व्यवस्थित होत नसल्याने पाण्याचा प्रश्न जाणवतो.पाणी नियोजनाच्या अभावाचा सर्वाधिक फटका पेण तालुक्यातील खारेपाट म्हणून ओळखल्या जाणार्या शिर्की-बोरीसह 45 गावं आणि 22 आदिवासी वाड्यांना बसतो आहे.समुद्राच्या काठावर असलेला हा भाग गेली अनेक वर्षे ताहणलेला आहे.पाऊस संपला की या भागात पाणी टंचाई जाणवायला लागते.दुदैर्वानं त्याकडं कोणाचंच लक्ष नाही.निवडणुका आल्या की थापा सारेच पक्ष मारतात पण एकदा निवडणुका झाल्या की पुन्हा खारेपाटातील पाण्याच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष केलं जातं.जनता जेव्हा गार्हाणं घेऊन आमदार किंवा अन्य लोकप्रतिनिधीकडे जाते तेव्हा ” पाणी सोडून बोला” असं म्हणून या प्रश्नाची उपेक्षा केली जाते.पंचवीस वर्षे मी हा तमाशा पहात आलो आहे.राजकीय पक्षांनी खारेपाट वाळीत टाकल्यासारखाच केलेला असल्यानं रायगडमधील जागरूक पत्रकारांनी हा प्रश्न हाती घेतला आहे.रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून एक लोकचळवळ उभी करण्याचा निर्णय पत्रकारांनी घेतला असून हा प्रश्न धसास लावायचाच असा निर्धारही पत्रकारांनी केला आहे.या भागातील एक नागरिक आणि ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांच्या पुढाकारातून प्रेस क्लबनं हा लढा हाती घेतला आहे.पेण प्रेस क्लबचे तरूण अध्यक्ष देवा पेरवी,रायगड प्रेस क्लबचे धडाडीचे अध्यक्ष संतोष पेऱणे तसेच परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार,परिषदेचे कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,विजय पवार ,अभय आपटे,दीपक शिंदे या सर्वाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आता लढले जात आहे.रविवारी म्हणजे उद्या सकाळी बारा वाजता शिर्की चाळ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यास पाच ते आठ हजार नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.पत्रकारांना गिरीश महाजन यांची भेट घ्यायची आहे.विषय त्यांच्याही कानावर घातला गेला असून अधिवेशनानंतर ही बैठक होईल अशी अपेक्षा आहे.तात्पर्य पत्रकारांनीच विषय हाती घेतल्यामुळे पंचवीस वर्षाचा हा प्रश्न आता मार्गी लागेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
रायगडमधील पत्रकार जेव्हा जेव्हा लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेतात तेव्हा आपल्याच पैकी काही मंडळी “हे पत्रकारांचे काम आहे काय”? असा अनाहूत प्रश्न विचारून अपशकून करण्याचा प्रयत्न करतात.अर्थात कोणाला कोणते प्रश्न महत्वाचे वाटावेत हा ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनाचा प्रश्न आहे.
रायगडमधील पत्रकारांना 45 गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा वाटत असेल आणि त्यासाठी ते रस्त्यावर उतरणात असतील तर कुणाच्या पोटात दुखायचे कारण नाही.आम्ही अशा पोटदुख्यांची कधी चिंताही करीत नाही.सामाजिक बांधिलकी जपत रायगडमधील पत्रकारांंनी जनतेच्या जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न हाती घेतला आहे त्याचे आम्हाला अप्रुप आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मुंबई-गोवा महामार्गासाठी आम्ही आंदोलन करीत असताना काही जण असाच सुरू व्यक्त करीत होते मात्र आम्हा कुणाला भीक न घालता आंदोलन लढले आणि ते यशस्वीही करून दाखविले.पाण्यासाठीचा हा लढा ही यशस्वी होणार यात शंकाच नाही. ( एस.एम.)