जिद्द,चिकाटी,आणि प्रयत्नास शासनाचं पाठबळ मिळालं तर कसं परिवर्तन घडू शकतं याचा प्रत्यय रायगड जिल्हयाच्या सुधागड तालुक्यातील महागावच्या महिलांनी आणून दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात’ रायगड जिल्हयातील 22 ग्रामपंचायतीमधील 56 गावांचा समावेश करण्यात आला आहे.महागावचाही या योजनेत समावेश केला गेला.अत्यंत दुर्गम भागात असलेलं मात्र निसर्गाचं वरदान लाभलेलं महागाव विकासापासून कोसोमैल दूर होतं.12 वाडया आणि 1800 लोकसंख्येचं हे गाव कोणाला माहिती असण्याचंही कारण नव्हतं मात्र गेली काही दिवस या गावची जिल्हाभर चर्चा आहे ती तेथील महिलांनी घडवून आणलेल्या परिवर्तनामुळं.ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत महागावच्या महिलांनी स्त्री शक्ती महिला बचतगटाची स्थापना केली आणि परंपरात व्यवसायाला फाटा देत चक्क एलइडी बल्ब तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला.त्यासाठी ग्राम समाज परिवर्तक विनोद तिकोणे यांचं मार्गदर्शन महिलांना लाभलं.वर्धा येथील शक्ती इलेक्ट्रीकल या संस्थेने महागावच्या महिलांना एलइडी तयार करण्याचे प्रश्क्षिण दिले.वायरला साधी पिनही जोडू न शकणार्‍या महिला आज सफाईदारपणे सर्किटचं सोल्डरिंग,बल्बच्या कॅपचं पंचिग करतात,सर्किटमध्ये डायोड-कॅपिसिटर्स जोडतात आणि 11 महिलांचे 22 हात अवघ्या सात ते आठ मिनिटात एक एलईडी बल्ब तयार करतात.येथे 3 ते 100 वॅटचे बल्ब तयार केले जातात याची किंमतही 20 रूपयांपासून पाच हजार रूपयांपर्यंत असते.केवळ शेती हाच एकमेव व्यवसाय असलेल्या आणि वर्षातील आठ महिने रोजगाराच्या शोधात असणार्‍या महागावच्या महिलांना आता रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.त्यातून व्यक्तीगत आणि गावाचं मोठं आर्थिक परिवर्तन घडून येताना दिसतं आहे.महागावची आज जिल्हयात एलइडी दिव्याचं गाव अशी नवी ओळख निमाण झाली आहे.ः

शोभना देशमुख

LEAVE A REPLY