ण्णा हजारे यांनी उपोषण मागं घेतल्यानं अनेक आत्मे अस्वस्थ आहेत.’अण्णांचं उपोषण जेवढं लांबेल तेवढं सरकार विरोधी वातावरण तयार होईल’ असं काहींना वाटत होतं.त्यामुळं ‘अण्णांनी उपोषण गुंडाळले’ वगैरे भाषा वापरली जात आहे.अशी भाषा करणार्‍यांना अण्णांच्या तब्येतीशी काही देणं-घेणं नाही.वजन कमी झालं.बीपी वाढला. उपोषण लांबलं असतं तर या वयोवृध्द सामाजिक कार्यकत्यांच्या प्रकृत्तीसंबंधी अनेक प्रश्‍न निर्माण झाले असते.त्याची चिंता कोणाला नाही.घरात बसून सल्ले देणं जेवढं सोपं असतं तेवढं उपोषण कऱणं सोपं नाही.तरीही अण्णा सात दिवस बसले असतील तर अण्णांचं अभिनंदनच केलं पाहिजे.प्रत्येक आंदोलनातून प्रश्‍न मार्गी लागलेच पाहिजेत असं होत नाही.विशेषतः जेव्हा राज्यकर्ते असंवेदनशील असतात तेव्हा तर अशी अपेक्षा करणंच निरर्थक ठरतं.तरीही अशी आंदोलनं करावी लागतात कारण चळवळ जिवंत राहिली पाहिजे.अण्णांच्या आंदोलनानं विस्मृतीत गेलेल्या लोकपालचा विषय पुन्हा ताजा झाला.मला वाटतं हे ही काही कमी नाही.चळवळ एक पाऊल पुढं सरकली असा सकारात्मक विचार आपण का करत नाही.? ज्या प्रश्‍नांसाठी अण्णा उपोषणाला बसले त्यामागण्यासाठी यापुढे आम्ही आंदोलन करू असं कोणीच का बोलत नाही ?.अण्णा व्यक्तिगत लाभासाठी आंदोलन करीत नाहीत अशा स्थितीत सारी जबाबदारी अण्णांच्या खादयावर ठेऊन आपण चर्चा कऱणं योग्य नाही.अण्णांनी आंदोलन गुंडाळलं असं ज्याचं म्हणणं आहे अशा महाभागांनी स्वतः उपोषणाला बसून ते यशस्वी करावं कोणी अडविलंय. ? पण तेवढी धमक नसलेले वांझोट्या चर्चा करीत राहतात.स्वतः करायचं काहीच नाही आणि दुसरे करतात तर त्यालाही आडवा पाय घालायचा ही आजची स्थिती आहे.मी हे यासाठी सांगतोय की,मी देखील या सर्व प्रक्रियेतून गेलो आहे.राज्यातील पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी मी आणि किरण नाईक यांनी नागपुरात 12-12-12 रोजी आमरण उपोषण केलं होतं.त्यावेळेस सरकारनं आम्हालाही लिलया गुंडाळलं.पण आमचं ते उपोषण चळवळीला बळ देणारं , नवी ऊर्जा देणारं ठरले , चळवळ एक पाऊल पुढं नेणारं ठरलं.कालांतरानं सरकारला कायदा मंजूर करावा लागला.आम्ही उपोषण मागं घेतलं तेव्हा मलाही अशा टिकेला सामोरं जावं लागलं होतं.हाती काय पडलं असा प्रश्‍न अनेकांनी विचारला होता.मात्र उपोषण मागं का घ्यावं लागलं ते कोणी तपासत नाही.आमच्याबाबतीतही हाच अनुभव आला.आमचं उपोषण आमच्या कायम स्मरणात राहणारं ठरलं आहे.त्या उपोषणाची चित्तरकथा वाचण्यासाऱखीच आहे.

12-12-2012 चा तो दिवस होता.राज्यातील पत्रकारांच्या प्रश्‍नाला सरकार सारखी शेंडी लावतंय असं दिसल्यानंतर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं होतं.या उपोषणात कोण कोण सहभागी होणार ?  अशी विचारणा सर्व जिल्हयात केली गेली होती.त्यानुसार राज्यभरातून दहा जणांनी आपण उपोषणाला बसू असं कळविलं.उपोषणाचा दिवस उजाडला तेव्हा मी किरण नाईक आणि परळीचे आणखी एक पत्रकार असे तिघेच मांडवात हजर झालो होतो.नावं नोंदविणारे उर्वरित सात जण नागपूरकडं फिरकलेही नव्हते.आम्हाला उपोषणाला बसवायला सकाळी जवळपास दीडेशेच्या आसपास पत्रकार हजर होते.’एस.एम.देशमुख तुम आगे बढोच्या घोषणाीं परिसर दणाणून गेला होता’.सारा माहोल उत्साही होता.माझं कौतूक करणारी आणि सरकारचा निषेध करणारी भाषणं रंगत होती.चॅनलवाले बाईट घेत होते.हे सारं तास-दोन तास चाललं.माझ्या लक्षात आलं की,भाषणं झाली,वाहिन्यांना बाईट देऊन झाले की,लोक सुबल्ल्या करीत होते.हळूहळू पत्रकारांची गर्दी ओसरत गेली.दुपारी एकच्या सुमारास जेमतेम तीस -चाळीस पत्रकार आमच्या सोबत होते.दुपारी चार वाजता ही संख्या दहा-बारावर आली.त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालायतून निरोप आला.शिष्टमंडळ भेटायला गेलं.मात्र रात्री सात वाजले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काही शिष्टमंडळास भेटलेच नाहीत.त्रागा करीत आणि आता मागण्या मान्य झाल्याशिवाय एस.एम.देशमुख आणि किरण नाईक उपोषण सोडणारच नाहीत असा इशारा देत ( अर्थात आम्ही कितीही दिवस उपोषणास बसलो तरी इशारा देणार्‍यांची हरकत नव्हती ) शिष्टमंडळ परत आले.शिष्टमंडळ परतले.थोडी चर्चा झाली.राहिलेले निघून गेले.रात्र आठच्या सुमारास दोन-तीन जण मांडवात उरले. ऩऊ नंतर तर मी आणि किरण नाईकच उरलोत.कासवछाप आणायलाही आमच्या बरोबर कोणी नव्हते.कडाक्याची थंडी आणि डासांचा प्रचंड मारा यामुळं फुटपाथवरची ती रात्र कायम स्मरणात राहिली.अनेकदा वाटत होतं.कोठून अवदसा आठवली आणि उपोषणाला बसलोत ? ज्यांच्यासाठी हे उपोषण होतं त्यांच्यापैकी अपवाद वगळता कोणीच मदतीला नव्हतं.पुण्याहून आलेल्या मित्रांना मग फोन केला.ते तिघे-चौघे रात्री आले आणि आम्हाला धीर आला.साधारणतः साडेबाराच्या सुमारास माहिती आणि जनसंपर्क तसेच सीएमओतील काही अधिकारी आले.सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावलंय असा निरोप त्यांनी दिला.संवाद तर होणं आवश्यकच होतं.जायचं ठरलं.सकाळी उत्सुकतेनं सारे पेपर मागविले.देशोन्नती सोडले तर फार कोणी आमच्या उपोषणाची दखल घेतली नव्हती.बाईट वगैरे घेणारे आमची गंमत करीत होते हे नंतर लक्षात आलं.पत्रकाराच्या उपोषणाची पत्रकारही दखल घेत नाहीत  म्हटल्यावर त्याचा काय तो संदेश सरकार दरबारी गेलाच.एका अधिकार्‍यानं मला बोलूनही दाखविलं ,’तुमची दखल कोणीच घेतली नाही “आंदोलन काळात मिडियातील बातम्यांचा दबाव नक्की व्यवस्थेवर पडत असतो.मात्र मिडियानंच आमच्या उपोषणाची उपेक्षा केली होती.त्यातून एक गोष्ट लक्षात आली की,जास्त ताणणं फायद्याचं नाही.फार ताणलं तर उपोषण गुंडाळावं लागेल हे देखील उघड दिसत होतं.त्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून आश्‍वासन घेऊन उपोषण सोडायचं हे मी आणि किरण नाईक यांनी मनोमन ठरविलं होतं.आम्ही उपाशी राहायला घाबरतो असं नव्हतं पण ज्या पध्दतीचं नकारात्मक वातावरण तयार झालं होतं ते बघता उपोषण मागं घेणंच शहानपणाचं होतं.मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना त्यांनी आमच्या सर्वच मागण्या मंजूर केल्या.उपोषण सोडण्याचीही न विसरता विनंती केली.  लेखी वगैरे मागूनही उपयोग नव्हता.लेखी दिलं गेलं तरी  वचन पाळलं नाही तर तुम्ही काय करणार ? हा प्रश्‍न उरतोच की..बैठक यशस्वी (?)  झाली.नंतर काही वरिष्ठ अधिकारी उपोषण स्थळी आले आणि त्यांनी संत्रज्यूसचा पेला आमच्या हाती देऊन उपोषणाची सांगता केली.पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या मागण्या मंजूर केल्या होत्या त्यापैकी एकाचीही पुर्तता केली नाही.मात्र चळवळ एक पाऊल पुढं गेली होती.ज्या दिवशी आम्ही नागपुरात उपोषणास बसलो होतो त्या दिवशी राज्यभर आंदोलन झालं होतं.पत्रकारांमध्येही एकीची भावना निर्माण झाली होती.माझी अपेक्षा देखील अशीच होती.

उपोषण संपलं..परंतू आंदोलनाचा ताण,रिकामं पोट आदिमुळं माझी तब्येत बिघडली.चारच्या सुमारास मला अ‍ॅडमिट व्हावं लागलं.बरोबर किरण नाईकशिवाय कोणीच नव्हतं.तातडीनं विमानाचं तिकीट मागवून घेतलं आणि रात्री दहा वाजता पुण्यात पोहोचले.नंतर आठ दिवस आराम केला.आजारी आहे म्हणून साधं भेटायलाही कोणी आलं नाही.. अण्णांना जो अनुभव आला तसाच अनुभव नंतर आम्हालाही आला.काहीं फेसबुकविरांनी ‘एस.एम.देशमुख यांनी उपोषण गुंडाळलं’ अशा पोस्ट टाकल्या.काहींनी आमच्या उपोषणाला नाटक म्हटलं तर काहींनी हाती काय पडलं ? असे प्रश्‍नही उपस्थित केले.या प्रशनांना उत्तर देण्याचं कारण नव्हतं.कारण उपोषणाला बसतानाच याची जाणीव होती की,व्यवस्थाच एवढी निगरगट्ट आणि असंवेदनशील आहे की,हाती काही लागणार नाही.वाटत होत तसंच घडलं होतं.तरीही राज्यातील बहुसंख्य पत्रकार मित्रांनी आमच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता.पाठिंबा दर्शविला होता.’बचेंगे तो और भी लढेंगेचे’ संदेश पाठविले होते.अशा सकारात्मक विचार करणार्‍या मित्रांच्या बळावरच नंतर आम्ही पत्रकारांची ही चववळ पुढे नेऊ शकलो.कालांतरनं कायदा तर झालाच पण पत्रकारांचे छोटे मोठे 19 प्रश्‍न मार्गी लावण्यात आम्हाला यश आले.चळवळ फोफावत गेली.लोक एक होत गेले.प्रश्‍न पण चळवळीतलं प्रत्येक आंदोलन काही तरी नक्की देऊन जात असतं.ते वाया जात नाही.हा आमचा अनुभव आहे.उपोषण केलं आणि प्रश्‍न लगेच सुटले असं भलेही होत नसेल पण आंदोलन वाया जात नाही.प्रत्येक आंदोलन चळवळीसाठी काही तरी नक्की देऊन जातं.या आशेवरच आम्ही पत्रकार संरक्षण कायद्यासाठी बारा वर्षे अथक लढा देऊ शकलो.पेन्शनची लढाई वीस वर्षांपासून लढतो आहोत.एक दिवस यश येईल याची खात्री आहेच.पण सरकार प्रतिसाद देत नाही म्हणून काहीच करायचं नाही हे धोरण चालत नाही.कारण व्यवस्था आपल्या मागण्यांकडं,आंदोलनांकडं मुद्दाम दुर्लक्ष करीत असते.चळवळीतील कार्यकर्त्याना नैरास्य आणलं गेलं तर आंदोलनाचे बारा वाजतात हा व्यवस्थेचा होरा असतो.त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात.आपण व्यवस्थेचा डाव यशस्वी होऊ देता कामा नये.अण्णांनी तेच केल असेल तर त्यांना दोष देणं त्यांच्यावर अन्याय करणारं आहे.

अण्णांनी उपोषण गुंडाळले असे ज्यांना वाटते त्यांनी माझ्यासाऱख्या एका छोट्या पत्रकाराचा अनुभव लक्षात घ्यावा.कोणतंही आंदोलन करताना त्याला अनेक कंगोरे असतात.अनेक सकारात्मक -नकारात्मक शक्ती कामं करीत असतात.एस.एम.देशमुखचं उपोषण यशस्वी झालं तर तो हिरो होईल याची भिती असणारे काही जीव ते आंदोलन अयशस्वी कसं होईल ते पहात असतात.सरकारला अडचणीत आणण्यासाठी काहींना आंदोलन लांबलं पाहिजे असंही वाटत असतं.काही जण असेही असतात की,ते निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे चळवळीचा घटक बनलेले असतात.अशा वातावरणात आपण किती ताणायचं  हे नेतृत्वाला ठरवावं लागतं.अण्णांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला.अन्यथा त्यांची प्रकृती बिघडत गेली असती.नंतर त्यानाच सारं भोगावं लागलं असतं.टीका कऱणारे तेव्हा अण्णांच्या मदतीला आले नसते.हे सारं मी अनुभवलेलं असल्यानं मी आण्णाचं उपोषण सोडलं गेलं त्याचं स्वागत केलं आहे.(SM)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here