अलिबाग दि.13 :- जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रीया मुक्त, निर्भय, निपक्ष आणि शांततामय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक व पोलीस प्रशासनाने आवश्यकखबरदारी घेतली असून जिल्हा निवडणूक यंत्रणा विधानसभा निवडणूकीसाठी सुसज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.
विधानसभा निवडणूकीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.शशीकांत महावरकर, निवासी उपजिल्हाधिकारीसतीश बागल, रोहा प्रांत सुभाष भागडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी विश्वनाथ वेटकोळी व इतर नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील 188-पनवेल, 189-कर्जत, 190-उरण, 191-पेण, 192-अलिबाग, 193-श्रीवर्धन, 194-महाड या सात विधानसभा मतदारसंघात निवडणूका होत आहेत. 17 सप्टेंबर 2014 च्या यादीनूसार जिल्ह्यात एकूण10 लाख 18 हजार 001 पुरुष मतदार असून 9 लाख 70 हजार 500 स्त्री मतदार असे एकूण 19 लाख 88 हजार 501 मतदार आहेत. त्याचप्रमाणे 1580 पुरूष तर 568 स्त्री असे एकूण 2148 सैनिक मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण2366 मुळ मतदान केंद्र असून 122 सहाय्यकारी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे त्यामुळे विधानसभा निवडण्ूकीसाठी आता एकूण 2488 मतदान केंद्र असतील. या मतदान केंद्रांपैकी 42 मतदान केंद्र हे क्रिटीकलमतदान केंद्र आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात एकूण 88 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
जिल्ह्यात होत असलेल्या निवडणूकीसाठी जिल्हा निवडणूक विभागामार्फत 2 हजार 488 मतदान केंद्रावर 12 हजार 105 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच वाहतुकीसाठी 291 बसेस, 71 मिनिबस, 544 जीप अशी एकूण 906 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी नियुक्त कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेलफेअरच्या बाबतदेखील जिल्हा निवडणूक यंत्रणा दक्ष असून त्यांच्या सोबत हेल्थ किट तसेच त्यांचादैनंदिन भत्ता, दिला असून स्थानिक व्यवस्थेसंदर्भातही खबरदारी घेतली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सात मतमोजणी केंद्र
तसेच जिल्ह्यात एकूण 7 मतमोजणी केंद्रास मा.भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. ही सात मतमोजणी केंद्र पुढील प्रमाणे असतील. 188-पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी अब्दुल रझ्झाककाळसेकर कॉलेज (पॉलिटेकनिक), धाकटा खांदा, पनवेल ता.पनवेल जि.रायगड, 189-कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी कोकण ज्ञानपिठ इंजिनिअरींग कॉलेज, पहिला मजला, उत्तरेकडील इमारत, पारडे, दहीवली त.निड, ता.कर्जत जि.रायगड. 190-उरण विधानसभा मतदारसंघासाठी रिक्रऐशन क्लब, गॅस टरबाईन पॉवर स्टेशन कॉलनी, बोकडवीरा, ता.उरण, जि.रायगड. 191-पेण विधानसभा मतदारसंघासाठी के.ई.एस.लिटल एजंलइंग्लिश स्कुल, मुंबई-गोवा हायवे, पेण. 192-अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली, ता.अलिबाग जि.रायगड. 193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासाठी सेंट्रल ऍ़डमिनीस्ट्रेटीव्ह बिल्डींग,श्रीवर्धन, ता.श्रीवर्धन, जि.रायगड. 194-महाड विधानसभा मतदार संघासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड, ता.महाड, जि.रायगड असे 7 मतमोजणी केंद्र असतील.
कायदा व सुव्यवस्था
जिल्ह्यात होणाऱ्या विधानसभा मतदान व मतमोजणीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधिक्षक, रायगड-अलिबाग यांच्याकडे जिल्ह्यासाठी 1 पोलिस अधिक्षक, 1अपर पोलिस अधिक्षक, 11 पोलिस उपअधिक्षक, 31 पोलिस निरीक्षक, 159 सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, 1945 पोलिस कर्मचारी, सी.आर.पी.एफ. च्या 2 तुकड्या, एस.आर.पी.एफ. च्य 4 तुकड्या तसेच520 होमगार्ड आहेत. त्याचबरोबर मरोळ व खंडाळा येथील प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारीही निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा एक भाग म्हणून निवडणूकीच्याकालवधीमध्ये जिल्ह्यातील 27 पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील 1439 शस्त्र जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.शशीकांत महावरकर यांनी यावेळी दिली.
केंद्रीय निवडणूक निरीक्षक नियुक्त
जिल्ह्यातील सात ही विधानसभा मतदार संघासाठी मा.भारत निवडणूक आयोग यांनी मतदारसंघनिहाय निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहेत. यापूर्वी जिल्हयात पनवेल व कर्जतसाठी बिनोद चंद्र झा, उरण वपेण साठी राजेश्वर प्रसाद सिंह व अलिबाग, श्रीवर्धन, महाडसाठी के.श्रीनिवासलू या तीन केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडे (जनरल) सात मतदारसंघाची जबाबदारी होती. त्यात आणखी 4 अतिरीक्त केंद्रीय निवडणूकनिरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आता 188-पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी बिनोद चंद्र झा (मो.नं.9431395513), 189-कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी घाना राम (मो.नं.08004377741), 190-उरण विधानसभामतदारसंघासाठी राजेश्वर प्रसाद सिंह (मो.नं.8986915015), 191-पेण विधानसभा मतदारसंघासाठी पी.सेल्व्हाराज (मो.नं.0944382549), 192-अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी के.श्रीनिवासलू (मो.नं.9711990963), 193-श्रीवर्धन मतदारसंघासाठी वेदपती मिश्रा (मो.नं.07300694959) तर 194-महाड विधानसभा मतदारसंघासाठी अस्लम मेहर (मो.नं.9414341397) यांच्या केंद्रीय निवडणूक निरीक्षक (जनरल) म्हणून नियुक्त्या झाल्याआहेत. मतदान व मतमोजणी या दोन्ही प्रक्रियेसाठी ते निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील निवडणूका मुक्त, निर्भय, नि:पक्ष आणि शांततामय वातावरणात पार पाडता येईल या दृष्टीने दक्ष रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे व जिल्हा पोलिसअधिक्षक डॉ.शशीकांत महावरकर यांनी केले.
00000
विधानसभा निवडणूक . | दिनांक :- 13 ऑक्टोबर 2014 |