मोंदींनी केली संजय राऊतांची तक्रार

0
726

‘आपला वाद आहे ना, मग आई-बापाला कशाला मधे आणतो रे?’, हे वाक्य आपण कितीतरी भांडणांमध्ये ऐकतो. आई हा तर प्रत्येकाच्याच भावनेचा-अस्मितेचा-अभिमानाचा विषय असल्यानं भांडणात आई आणायची नाही, हा अलिखित नियमच आहे. परंतु, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा नियम मोडून खुद्द ‘मातृभक्त’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच दुखावलंय. त्यामुळे, आपल्या आईला अप्रत्यक्षपणे चर्चेत खेचणाऱ्या राऊत यांची तक्रार मोदींनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचं समजतं.

काही दिवसांपूर्वी जम्मूमधील अखनूरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाला होता, तर दोन जवान जखमी झाले होते. या घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले होते. शिवसेना तर चांगलीच खवळली होती. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी शिवसेना खासदार राजकुमार धूत यांनी राज्यसभेत केली होती. त्याचवेळी, खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत, पाकिस्तानचे दहा सैनिक मारा, असं ठणकावलं होतं. ‘साडी आणि शॉल डिप्लोमसी काय आहे? पाकिस्तानबरोबर चर्चा करू नये, ही शिवसेनेची भूमिका काल होती आणि आजही आहे. चर्चेने काहीही साध्य होणार नाही. आपण फक्त शहीद जवानांची संख्या मोजणार आहोत का?’, असा संताप त्यांनी व्यक्त केला होता. त्यातील ‘साडी आणि शॉल डिप्लोमसी’चा उल्लेख नरेंद्र मोदींना खटकला आहे. त्याबद्दलची आपली नाराजी त्यांनी उद्धव ठाकरे यांना कळवल्याचं वृत्त डीएनए या इंग्रजी दैनिकानं एका मंत्र्याच्या हवाल्यानं दिलं आहे.

पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मोदींनी आपल्या शपथविधीसाठी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी त्यांनी शरीफ यांच्यासोबत आईसाठी शाल दिली होती, तर शरीफ यांनी नंतर मोदींच्या आईसाठी खास साडी पाठवली होती. या शाल-साडी देवाणघेवाणीच्या विषयावरून विनाकारण राजकारण करू नका, अशी समज मोदींनी शिवसेनेला दिल्याचं समजतं.

भारत-पाक संबंधांबाबतच्या चर्चेत विरोधकांनीही अशी टीका केलेली नाही. त्यामुळे शिवसेनेनंही आईला मधे आणून वैयक्तिक हल्ला करू नये, असं मोदींनी आपल्या पत्रात सूचित केल्याचं कळतं. या संदर्भात संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा विषय टाळला. आपल्याला यावर आत्ता काहीच बोलायचं नाही, एवढंच मोघम उत्तर देऊन त्यांनी ही बातमी खरी ठरवली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या संबंधांत पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.(मटावरून साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here