माझ्या गावचा रस्ता होतोय म्हणे…

0
1143

मुंबई-गोवा महामार्गाचं रूदीकरण करावं या मागणीसाठी आम्ही आंदोलन केलं आणि त्या महामार्गाचं काम सुरू झालं.475 किलो मिटरचा मुंबई-गोवा महामार्ग आज ना उद्या पूर्ण होईलच यात शंका नाही.

गंमत अशी की,475 किलो मिटरच्या महामार्गाचं काम पत्रकाराच्या रेटयामुळं सुरू झालं असलं तरी,माझं गाव असलेल्या बीड जिल्हयातील देवडी येथील रस्त्याचं काम अनेक वेळा खेट्या मारूनही मला काही सुरू करता आलं नव्हतं.तालुक्यापासून वीस किलो मिटर आत असलेलंल्या या गावात जाण्यासाठी कोणत्याही बाजूनं गेलो तरी किमान दहा किलो मिटर रस्ता असाय की,तेथे गाडी चालू शकत नाही.त्यामुळं गेली पाच वर्षे माझ्या गावात एस.टी.येत नाही.रस्ता तिथं एस.टी.असं एस.टी.चं ब्रिद आहे आणि आमच्या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही.त्यामुळं एस.टी.ची चूक नाही.रस्ता व्हावा यासाठी जयदत्तअण्णा क्षीरसागर यांच्याकडं अनेक वेळा गेलो ,पाठपुरावा करून कवडगाव ते देवडी या तीन किलो मिटरच्या रस्याला मंजुरी मिळविली होती.खडी वगैरे रस्त्याच्या कडेला येऊन पडल्यानं आता काम सुरू होणार याची खात्री झाली होती.मात्र राजकारण आडवं आलं.”देवडी आणि परिसराच्या गावातील मतं आम्हाला मिळत नाहीत म्हणून या गावाचा रस्ता करायचाच नाही ,किंवा होऊच द्यायचा नाही” असा आग्रह काही लोकप्रतिनिधींनी जयदत्त क्षीरसागर यांच्याकडं धरला आणि आलेला निधी मग अन्यत्र वळविला गेला.देवडीकरांच्या पुन्हा एकदा तोंडाला पानं पुसली गेली.असं होण्याची ही तिसरी वेळ होती. नंतर निवडणुका झाल्या,नवे आमदार,नवे सरकार आले.योगायोग असा की,मी गावात असतानाच नवे आमदार आर.टी.देशमुख गावात आले.त्यांचा सत्कार वगैरे ग्रामस्थांनी केला.माझ्या घरीही त्यांनी भेट दिली.मी तेव्हा त्यांना विनंती केली की,रस्त्याचं तेवढ बघा.ते हो म्हणाले.नंतर मी पालकमंत्री पंकजाताई मुंढे यांनाही भेटलो आणि विषय त्यांच्याही कानावर घातला.
आज बातमी अशी आहे की,देवडी ते पात्रुड या वीस किलो मिटरच्या रस्त्यासाठी आता सीआरएफ फंडातून 20 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.पंचक्रोशितील किमान पंधरा गावांसाठी ही आनंदाचीच गोष्ट आहे.मात्र आता रस्ता पूर्ण होईपर्यत अशा बातम्यांवर कोणाचाच विश्वास उरलेला नाही.निधी मंजूर झाल्याच्या बातम्या या अगोदर तीन वेळा ऐकलेल्या होत्या.पण रस्ता काही झाला नव्हता.आता रस्ता पूर्ण होईपर्यत ग्रामस्त विश्वास ठेवायला तयार नाहीत.रस्ता झाला तर आमदार आर.टी.देशमुख यांचा जंगी सत्कार कऱण्याची ग्रामस्थांची कल्पना आहे.या रस्त्याचं काम आता लवकर सुरू व्हावंं आणि कोणताही अडथळा न येता किंवा कोणाच्याही दबावाला बळी न पडता ते पूर्ण व्हावं एवढीच गावकऱ्यांची अपेक्षा आहे.
छोटया छोट्या गोष्टींसाठी गावातल्या लोकांना किती अडवलं जातं आणि त्यासाठी त्यांना किती झगडावं लागतं,विशिष्ट पक्षाला मतं दिली नाहीत म्हणून कशी अडवणूक सहन करावी लागते.याचा एक नमुना कळवा म्हणून ही पोस्ट. “मत दिलं नाही तर रस्ते,पाणीी,वीज ,देणार नाही” अशा हा प्रकार आहे.तो अनेक गावांना अनुभवायला मिळतो.या नीतीमुळं गेली पाच वर्षे मी प्रय़त्न करूनही रस्ता झाला नाही याचं नक्कीच दुःख आहे.आता निधी आलाय, रस्ता होईल अशी अपेक्षा करणं एवढंच आमच्या हाती आहे.बातमीनं पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाल्या आहेत हे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here