प्रिन्ट मिडियाचं अस्तित्व धोक्यात आले  असल्यानं आणि अनेक मान्यवर वृत्तपत्रंही शेवटचे आचके देत असल्यानं बहुतेक वृत्तपत्रांनी आपल्या ऑनलाईन आवृत्या सुरू केल्या आहेत.एवढंच नव्हे तर इटीव्ही सारख्या एका मोठ्या माध्यम समुहानं आपलंं सेटेलाईट चॅनल बंद करून यु ट्यूब चॅनल सुरू केलं आहे…इटीव्ही असेल किंवा बीबीसीचं युट्यूब चॅनल असेल दोन्ही आणि इतर अनेक अशी चॅनल्स प्रभावीपणे कामगिरी करीत आहेत.हा बदल आता स्थानिक पातळीपर्यंत झिरपताना दिसतो आहे.मोठ्या शहरात आणि ग्रामीण भागातही अशी युट्यूब चॅनल्स सुरू झाली असून ते आपआपल्या भागात प्रभावीपणे कामं करताना दिसताहेत.या बदलाचं स्वागत करावं लागेल.कारण तरूण पिढीला आता वृत्तपत्रं वाचायला वेळ नाही.साप्ताहिकं किंवा मासिकांचा काळ तर आता उरलेला नाही.जगाच्या एका कोपर्‍यात घडलेली घटना क्षणात दुसर्‍या टोकाला पोहोचते.माहितीचा असा  स्फोट झालेला असताना दुसर्‍या दिवशीची वृत्तपत्रं येईपर्यंत थाबायला कोणाला वेळ नाही.त्यामुळं झटपट बातमी देणार्‍या माध्यमाकडं तरूण पिढीचा ओढा दिसतो आहे.जी मंडळी हा बदल स्वीकारणार नाहीत ती कालौघात मागे पडतील आणि संपून जातील.त्यामुळं छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांनी देखील तातडीनं ऑनलाईन येण्याची गरज आहे..तरच ते स्पर्धेत टिकाव धरतील .. 

बापुसाहेब गोरे यांनी काळाचा आणि बातमीचा वाढलेला वेग पाहून नवे तंत्रज्ञान आत्मसात केले आणि त्या दिशेनं पत्रकारितेची वाटचाल सुरू केली.दोन  वर्षापूर्वी  गोरे यांनी माझा आवाज हे यु ट्यूब चॅनल सुरू केलं.कोणतंही भक्कम आर्थिक पाठबळ नाही.राजाश्रय नाही किंवा स्वाभिमान गहान ठेऊन काही तडजोडी कऱण्याची देखील वृत्ती नाही असं सारं असतानाही माझा आवाजनं दोन  वर्षात मारलेली भरारी नक्कीच स्तंभीत करणारी आहे.माझा आवाज आता माझा आवाज राहिलेलं नाही तर ते जनतेचा आवाज झालं आहे.. माझा आवाजच्या दररोज च्या  हिट्स काही लाखांत असतात.त्यामुळं त्यांच्या एकूण  हिटसचा  आकडा काही कोटीत आहे.चॅनल सबस्क्राईब केलेल्या नियमीत वाचकांची संख्याही काही लाखात आहे.हे सारं सहज होत नाही.त्यासाठी मेहनत,चिकाटी,प्रामाणिकपणा, व्यवसायवरील निष्ठा या सार्‍या गोष्टी हव्या असतात.बाहुसाहेब गोरे यांच्याकडं हे सारे गुण आहेत.व्यवसायाचं अंगही आहे.त्यामुळं माझा आवाज आज पिंपरी-चिंचवड भागातील नंबर एकचे यु ट्यूब चॅनलमधून लोकप्रिय झालं आहे.मी देखील माझा आवाजचा वाचक-प्रेक्षक आहे.

अनेकदा चॅनल्सना टीआरपी वाढविण्यासाठी पत्रकारितेची मुलभूत तत्वंच खुंटीला बांधून काही हातखंडे आजमावावे लागतात.भडकपणा,सनसनाटीचा आसरा घ्यावा लागतो.बातम्यांचा टोन अतिरंजीत करावा लागतो.विश्‍वासार्हतेलाही तिलांजली द्यावी लागते.काही जण हे सारं सर्रास करताना दिसतात..माझा आवाजनं हे हातखंडे न वापरता एक संयत,सभ्य आणि लोकाभिमुख पत्रकारिता करून आपला दबदबा निर्माण केला आहे.माझा आवाजचा पसारा पिंपरी-चिंचवडमध्ये असल्यानं पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक बातम्या तर अग्रक्रमानं प्रसिध्द केल्या जाणारंच त्याचबरोबर राज्यात आणि देशात काय घडतंय ते देखील माझा आवाजवर बघायला मिळतं.त्यामुळं एक चॅनल सबस्क्राईब करून देशभरातील महत्वाच्या घटना आपल्याला समजू शकतात.एक परिपूर्ण चॅनल असं माझाचं आजचं स्वरूप आहे.

बातम्यांचे मथेळे वाचकांना आकर्षित करणारे असतात . बातम्यांचं सादरीकरण प्रभावी असतं आणि तांत्रिक बाजू देखील तेवढीच प्रभावीपणे सांभाळली गेलेली आहे.मुळात म्हणजे माझा आवाजनं विश्‍वासार्हता जपली आहे.माझा आवाजवर दाखविलेली  बातमी केवळ सत्य आणि सत्यच असते हे वाचकांच्या मनावर बिंबविण्यात बापुसाहेब गोरे आणि त्यांची टीम यशस्वी झाले आहेत..त्याबद्दल त्यांचे  मनापासून अभिनंदन आणि माझा आवाजच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

मराठवाड्यातील केज साऱख्या एका कायम दुष्काळी आणि दुर्गम भागातून पुण्यात यायचं,अगोदर साप्ताहिक आणि आता यु ट्यूब चॅनलच्या माध्मयातून पुण्यातील पत्रकारितेत  स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही.मात्र प्रभावी लेखणी,मृदू स्वभाव,डोक्यावर कायम बफर्र् ठेवलेले आणि माणसं जोडण्याची कला   या बळावर बापुसाहेबांनी हे यश संपादन केलंय.गोरे चांगले संघटक ही आहेत.अगोदर पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ आणि नंतर पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हयातील पत्रकारांची एकजूट करण्यासाठी भरीव काम केलेले आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे ते अध्यक्ष असताना मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श जिल्हा संघ पुरस्कार पुण्याला मिळालेला आहे.गोरे आज मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.दिशा असणारा,संघटनेसाठी वेळ देणारा,प्रसंगी खिश्याला तोशिष लावून घेणारा,पत्रकारांंनी एकत्र आलं पाहिजे अशी प्रामाणिक तळमळ असणारा आणि मराठी पत्रकार परिषदेवर निस्सीम श्रेध्दा असणारा एक पदाधिकारी म्हणून परिषद बापुसाहेब गोरे यांच्याकडे बघते.संपादक,परिषदेचे पदाधिकारी असल्याची घमंड बापुसाहेबांना नाही.मित्र जमविणे,वाढविणे,त्याचं कौतूक कऱणं आणि त्यांना खाऊ-पिऊ घालणं ही गोरे यांची आवड आहे.पुण्यात येऊनही गोरे मराठवाडी आदरातीथ्य आणि पाहुणचार विसरलेले नाहीत ही माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट .. .एक निर्मळ मनाचा हा पत्रकार नव्या वाटेनं प्रवास करतो आहे त्याला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि सहकार्य ही केले पाहिजे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here