मराठी पत्रकार परिषदेच्या प्रयत्नांना यश 

महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळणार ,

सरकारी निर्णयाचे एस.एम.देशमुखांनी केले स्वागत 

नागपूर ः राज्यातील ज्येष्ठ आणि वयोवृध्द पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करावी ही मराठी पत्रकार परिषदेची वीस वर्षांपासूनची मागणी राज्य सरकारनं आज अखेर मान्य केली असून त्यासाठी 15 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

पेन्शन योजना 2005 पासून बंद केली गेली असल्यानं पत्रकारांना पेन्शन देता येणार नाही.शिवाय पत्रकार हे खासगी कर्मचारी असल्याने त्यांना पेन्शन देता येणार नाही असे सांगत वित्त विभागाने ही फाईल सामांन्य प्रशासन विभागाकडे परत पाठविली होती.तथापि मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्या नंतर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 29 जून रोजी मंत्रालयात बैठ घेतली होती.या बैठकीस वित्त विभागाचे अधिकारी आणि माहिती आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत मुनगंटीवार यांनी तातडीने मुख्य सचिव यु पी एस मदान यांना फोन करून पत्रकार सन्मान योजनेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 15 कोटी रूपायांची तरतूद करावी असा आदेशच दिला.त्यानुसार माहिती आणि जनसंपर्क विभागानं दुसर्‍या दिवशी वित्त विभागाकडं प्रस्ताव सादर केला.त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि 15 कोटी रूपयांची तरतूद केली गेली.या योजनेतून बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरू होणार आहे.या निमित्तानं मराठी पत्रकार परिषदेच्या तब्बल वीस वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्यातील वयोवृध्द पत्रकारांना मोठाच दिलासा मिळाला आहे.—

महाराष्ट्रातील पत्रकारांना पेन्शन आणि कायदेशीर संरक्षण मिळावे यामागणीसाठी एस.एम.देशमुख आणि किरण नाईक यांनी नागपूर येथे आमरण उपोषण केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here