अलिबागनजिक आक्षी येथील मराठीतील पहिल्या शिलालेखाचे जतन करण्यासाठी आता संग्रहालय उभारण्याची कल्पना पुढे आल्याने गेली अनेक वर्षे उन,पाऊस आणि वाऱ्याचा मारा झेलत उभ्या असलेल्या मराठीतील पहिल्या शिलालेखाची उपेक्षा आता संपणार अशी चिन्हे आहेत.
आरंभी असे गृहित धरले जायचे की, श्र्रवणबेळगोळ येथील 1116 मधील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख आहे. मात्र प्रसिध्द संशोधक शं.गो.तुळपुळे यानी आक्षीच्या शिलालेखाचे प्राचीनत्व सिध्द केले.आक्षीचा शिलालेख हा शके 934 म्हणजे इ.स.1012 मधील असल्याचे त्यांनी सप्रमाण सिध्द केले होते.तेव्हा पासून आक्षीचा शिलालेख हाच मराठीतील सर्वात पुरातन शिलालेख समजला जातो.मात्र या पुरातन ठेव्याकडे सातत्यानं दुर्लक्ष झाल्याने या शिलालेखाती झिज होत असून त्यावरील अक्षरंही पुसट झाली आहेत.त्यामुळे या शिलालेखाचे जनत करावे अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.पुरातन वस्तू आणि शिल्पांचे जतन व्हावे यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना आहे.या योजनेअंतर्गत आक्षीच्या शिल्पाचे जतन आणि संवर्धन करण्याचे सुतोवाच भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.राजभाषा दिनी त्यांनी काल आक्षीला भेट देऊन शिलालेखाची पाहणी केली.त्यामुळे मराठीतील पहिल्या शिलालेखाची वाईट दिवस आता संपतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
शोभना देशमुख 

LEAVE A REPLY