electionमतमोजणी केंद्रात पत्रकारांना प्रवेश देणे बंधनकारकच

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेस मतमोजणी कक्षात अनेक ठिकाणी पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे.नादेड,उस्मानाबाद,बीड हिंगोलीसह अनेक शहरातून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची ही मनमानी दिसून आली.नांदेडमध्ये आणि अन्य काही शहरात तर प्रवेश पास दिलेले असतानाही त्याकडं दुर्लक्ष करीत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी पत्रकाराना प्रवेश नाकारला .दुसर्‍या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकीची छाननी सोमवारी होती.पैठणमध्ये या छाननीच्या वेळेसही पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने तेथील पत्रकारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे,तर हिंगोलीत पत्रकारांनी ठिय्या आंदोलन केले होते.राज्यात काही ठिकाणी अशी मनमानी केली जात असताना काही शहरातील पत्रकारांना मात्र मतमोजणीच्या वेळेस प्रवेश देण्यात आले होते.त्यामुळं या संबंधीच्या निवडणुक आयोगाच्या नेमक्या गाईडलाईन्स काय आहेत हे समजून घेणे महत्वाचे होते.मराठी पत्रकार परिषदेकडे या संदर्भातल्या अनेक तक्रारी आल्यानंतर परिषदेने हा विषय गंभीरपणे घेत थेट निडवणूक आयोगाकडे संपर्क साधून या बाबत नेमकी आयोगाची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पत्रकारांना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला पाहिजे असे स्पष्ट निमय असल्याचे सांगितले गेले.या संदर्भात निवडणूक आयोगाच्या नियमावलीतील कलम 11 मध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे, ती अशी,

मतमोजणीच्या ठिकणी पत्रकार आणि इलेक्टॉनिक मिडिया यांना प्रवेश

‘मतमोजणीच्या ठिकाणी नगरपालिका आयुक्त/जिल्हाधिकारी याचेकडे असलेल्या यादी प्रमाणे अधिस्वीकृतीधारक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी  तसेच इलेक्टॉनिक मिडियाचे पत्रकार यांना प्रवेश द्यावा ,त्यासाठी त्याना ओळखपत्रे देण्यात यावीत,मात्र त्यांना मतमोजणी हॉलमध्ये कुठेही फिरण्याची परवानगी देऊ नये.पत्रकार कक्षाची ज्या ठिकाणी व्यवस्था केली असेल त्याच ठिकाणी त्याना माहिती पुरविण्याची व्यवस्था करावी.अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच इलक्टॉनिक मिडियाचे प्रतिनिधी या व्यतिरिक्त अन्य स्थानिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त,जिल्हाधिकारी यांना राहतील.मात्र मतमोजणीच्या ठिकाणी सुव्यवस्था राहावी व गोंधळ होऊ नये यासाठी  दक्षता घ्यावी.”

म्हणजे नियमानुसार अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि कलेक्टर तसेच आयुक्तांच्या मान्यतेनुसार स्थानिक पत्रकारांना मतमोजणी कक्षात प्रवेश देण्याचे बंधन निवडणूक निर्णय अधिकार्‍यांवर आहे हे स्पष्ट होते.ज्या ज्या ठिकाणी पत्रकारांना प्रवेश नाकारला गेला त्या त्या ठिकाणी संबंधित निवडणूक अधिकार्‍याने मनमानी केली हे स्पष्ट आहे.अशा ठिकाणच्या तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी त्या निवडणूक अधिकार्‍यांच्या तक्रारी जिल्हाधिकारी तसेच निवडणूक आयोगाकडे कराव्यात.तसेच पुढील टप्प्यातील निवडणुकीसाठी नियमावलीतील कलम 11 चा हवाला देऊन जिल्हाधिकार्‍यांना अगोदरच पत्र द्यावे आणि रितसर त्यांच्याकडून पत्रं घ्यावीत.यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांनीही प्रयत्न करावेत अशी विनंती महासंचालक माहिती आणि जनसंपर्क यांना परिषदेच्यावतीने कऱण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here