नवी दिल्ली : इस्लामाबादेत गेल्या आठवड्यात झालेल्या सार्क देशांच्या गृहमंत्र्यांच्या परिषदेत भारतीय पत्रकारांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून अतिशय तुसडेपणाची व वाईट वागणूक देण्यात आली.
पत्रकारांना परिषदेच्या उद््घाटन समारंभालाच केवळ जाऊ देण्यात आले नाही तर परिषदेच्या ठिकाणी प्रवेशद्वारापाशीही उभे राहू देण्यात आले नाही. या ठिकाणी गृहमंत्री राजनाथ सिंह मान्यवरांचे स्वागत करीत होते. पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सहा भारतीय पत्रकारांना सार्क परिषदेच्या वार्तांकनासाठी इस्लामाबादेत जाण्याचा व्हिसा देण्यात आला होता हे विशेष. परिषदेला पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित होते. पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान जेथे मान्यवरांचे स्वागत करीत होते त्याठिकाणच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय पत्रकारांना उभे राहावे लागले.
राजनाथ सिंह यांचे आगमन होताच त्याचे चित्रीकरण करण्यासाठी पाकिस्तानी प्रसारमाध्यमे तयारीत असताना भारतीय पत्रकारही त्यांच्यासोबत गेले. परंतु त्यांना
तत्काळ पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तुसडेपणाने ‘येथून निघून जा’, असे सांगितले. भारतीय पत्रकारांना प्रवेशद्वाराबाहेरही उभे राहण्यास परवानगी नाही, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)