आता तुमचं काम झालं, तुम्ही इथून निघा
भाजप कार्यक्रमातून पत्रकारांना हाकलले

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या आज झालेल्या कोल्हापुरातील कार्यक्रमातून पत्रकारांनाच हाकलून लावण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे पक्षाच्या स्थानिक प्रतिनिधींना पत्राद्वारे निमंत्रण दिले होते, प्रत्यक्षात पत्रकारांना कार्यक्रमातून बाहेर काढताना निमंत्रण देणारेही शांतच राहीले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला कोल्हापुरचे सुपुत्र व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

भाजपाच्यावतीने आज शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक येथील रामकृष्ण हॉलमध्ये होती. या कार्यक्रमाला पक्षाचे संघटन मंत्री व्ही सतिश हेही उपस्थित होते. निमंत्रण असल्याने सर्वच माध्यमांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. कालच राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाचा छापा पडल्याच्या पार्श्‍वभुमीवर श्री. मुश्रीफ यांना भाजपाचे निमंत्रण देणारे प्रदेशाध्यक्ष पाटील काय बोलतील का ? याविषयीही उत्सुकता होती. पण “आता तुमचं काम झालं, तुम्ही इथून निघा’ असे म्हणत एका नेत्याने पत्रकारांनाच सभागृहाबाहेरचा रस्ता दाखवला. रितसर निमंत्रण देता आणि पत्रकारांना अशी वागणूक का देता असा जाब काही पत्रकारांनी विचारला पण त्याला दाद न देता कार्यक्रमातून पत्रकारांना बाहेर काढण्यात आले. याबद्दल पत्रकारांत तीव्र नाराजी आहे
(सरकारनामावरून साभार)

LEAVE A REPLY