“फाटक्या” बाबासाहेबाची लढाई

0
825

मार्च- एप्रिलमध्ये झालेल्या गारपिटीनं राज्यातील शेतकऱ्यांचं पार कंबंरडं मोडलं.शेती आणि शेतकऱ्याला उध्धवस्त करून टाकणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीत सरकारनं आपलेपणानं शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन जाणं अपेक्षित होतं.हो,ना करीत सरकारनं मदत तर जाहीर केली पण ती ज्याचं नुकसानं झालंय त्याच्यापर्यत पोहोचते की नाही ते मात्र तपासलं गेलं नाही.गारपिटग्रस्तांसाठीच्या मदतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले पण निवडणुकीच्या धामधुमीत त्याकडं कोणी लक्षचं दिलं नाही.त्यामुळं मोठं नुकसान होऊनही शेतकरी वंचित राहिले ही वस्तुस्थिती आहे.

या संदर्भात बीड जिल्हयातील वडवणी तालुक्यातल देवडी,पिंपरखेड,लिमगाव आदि गावातील उदाहरण देता येईल..मदतीच्या नावाखाली तलाठी आणि त्याच्या टोळक्यानं शेतकऱ्यांच्या रक्कमेवरच डल्ला मारला आहे.देवडी या गावात 400 शेतकरी असले आणि त्यातील बहुतेकांचं नुकसान झालेलं असलं तरी शंभर ते सव्वाशे खातेदारांनाच मदत मिळाली आहे.मदत देताना निकष धाब्यावर बसविले गेले.एकाच सर्वेनंबरमध्ये दोन भावडांचं समान नुकसान झाल्यानंतरही मदत देताना भेद केला गेला.काही शेतकऱ्यांचं सर्वस्व गेलं तरी त्याला दिडकीही मिळाली नाही.गावकरी म्हणतात,तलाठी आणि तहसिलदारांनी तोंडं बघून मदत दिली.मोठ्या रक्कमा देताना त्यांच्याकडून तलाठ्यांनी हातमारी केली.विषय एवढ्यावरच थांबत नाही,देवडी या गावात ज्यांची एक गुंठा देखील जमिन नाही असा अन्य गावातील लोकांना ते देवडी शिवारातील आहेत असं दाखवून पन्नास-साठ हजार रूपये उचलले गेले आहेत.हे करताना अन्य शेतकऱ्याची जमिन त्यांची आहे असे दाखविले गेले .या साऱ्या गांधळाच्या विरोधात गावातील शेतकऱ्यांनी 25 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं.पण असं सागतात की,मोर्चाचं पुढारपण ज्यांनी केलं तेच गावचे कारभारी नंतर गार गप्प झाले झाले. बहुसंख्य शेतकरी उघडे पडले.हतबल झाले.जाऊ द्या असा सूर काढत गप्प बसले.
बाबासाहेब कोल्हे नावाचा एक फाटका शेतकरी मात्र गप्प बसला नाही.अन्यायाच्या विरोधात पेटून उठला.खरं तर या बाबासाहेबला तालुक्याचा रस्ता देखील ठाऊन नाही.तरीही झालेला अन्याय मी सहन कऱणार नाही असं सांगत त्यानी व्यवस्थेलाच धक्के मारायला सुरूवात केली.बाबासाहेब हा तीन-चार एकर जमिन असलेला छोटा शेतकरी.त्यांचंही गारपिटीनं सारं नुकसान झालं.त्याला नुकसान भरपाई मिळण्याऐवजी त्याची जमिन बाहेरच्या गावच्या एकाच्या मालकीची आहे असं दाखवून त्याच्या शेतीवर भलत्यानंच पैसा उचलला.हे जेव्हा बाबासाहेबाला कळलं तेव्हा त्यानं मोर्चात जायचं असं ठरविलं होतं.पण मोर्चा काढायला निघालेलेच नंतर गार गप्प झाले  झाले.त्यामुळं मोर्चा निघालाच नाही.तरीही बाबासाहेब गप्प राहिला नाही. त्यानं माजलगावला जाऊन एका वकिलाशी संपर्क साधला अन तो आता न्यायालयात गेला आहे. न्यायालयात जाण्यासाठीही त्याच्याकडं पैसे नव्हते.काही समदुःखी मंडळींनी त्याला मदत केली.त्यामुळं तो न्यायालयात जाऊ शकला .न्यायालयानं आता कारवाई सुरू केली आहे.बाबासाहेबांच्या वकिलाचं म्हणणंय की बाबासाहेबाला नक्की न्याय मिळेल.तो कसा मिळेल माहित नाही पण निरक्षर आणि ज्याला आपण फाटका माणूस म्हणतो असा एखादा सामांन्य आणि प्रामाणिक माणूसही जेव्हा चिडतो तेव्हा तो व्यवस्था उलथून टाकण्याची शक्ती त्यांच्यात निर्माण होते. बाबासाहेब आता असाच चिडून उठलाय.गावातल त्याच्या सारख्याच अनेकांनी त्याला मदत केली.आता व्यवस्था विरूध्द एक फाटका याच्यातील या लढाईत कोण जिंकतो कोण हरतो हे येत्या काही दिवसातच कळेल.मात्र बाबासाहेब जिंकला तर गावपातळीवरची व्यवस्था नक्कीच घोटाळे करताना हजारदा विचार क रेल यात शंका नाही.सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी कऱण्यात काही अर्थ नाही.कारण हे प्रकरण उजेडात आल्यानंतरही केवळ संबंधित तलाठ्याच्या बदलीशिवाय काहीच झालेले नाही.तहसिलदार गारगप्प,जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नाही अशी ही अवस्था आहे.खरं तर या प्रकऱणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे सामांन्याच्या रक्तावर पोसल्या जाणाऱ्या वळूंना अद्दल घडविली गेली पाहिजे.न्यायालय आता काय करणार हे बघायचंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here