पवारांना आवडेल तेच …

0
861

माध्यमात आलेल्या बातमीमुळे अडचण झाली की,माध्यमाच्या विरोधात गळा काढण्याची राजकारण्यांची जुनी खोड आहे.ही सवय सर्वव्यापी आहे.आपले “जाणते राजे” शरद पवारही त्याला अपवाद नाहीत.कालचंच उदाहरण घ्या.शरद पवार अलिबागमध्ये बोलले, “राज्य सरकार टिकविण्याचा मक्ता आम्ही घेतलेला नाही,त्यामुळे मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात,कार्यकर्त्यांनी कामाला लागावे” पवारांच्या या विधानाचा काय अर्थ होऊ शकतो ?. शरद पवार सरकार पाडणार असाच या विधानाचा अर्थ होऊ शकतो ना.मग असाच अर्थ पत्रकारांनी लावला असेल आणि तो राज्यातील जनतेला समजून सांगितला असेल तर राष्ट्रवादीला मिर्च्या झोंबण्याचं कारण काय? . “नेत्यांचा विधानाचा अन्वयार्थ लावून त्याचं विश्लेषण कऱणं हेच जर माध्यमांचं काम असेल” तर ते त्यांनी काल केलं आहे आणि उद्याही करीत राहतील हे त्रिकालाबाधित सत्य आहे. भाजपला न मागता पाठिंबा देताना पवारांनी स्थिर सरकारची थेरी मांडली होती.मग आता महिन्याच्या आतच असं काय झालं की,पवार आपल्या थेरीपासूनच दूर जात सरकार अस्थिर करायला लागले आहेत.त्याचे काही अर्थ पत्रकारांनी काढले.पहिला म्हणजे,पवारांना सरकारला अल्पमताची जाणीव करून देत सरकारवर दबाव वाढवायचा असावा,हा दबाव वाढवताना भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यावर कारवाई क ेली जाऊ नये अशीही त्यांची इच्छा असावी,दुसरं कारण म्हणजे राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना भाजपला पाठिंबा देण्याची पवारांची भूमिका मान्य नाही ( जयंत पाटील यांनी ती  स्पष्ट शब्दात मांडलेली आहे) त्या नेत्यांनाही शांत कऱण्याचा प्रय़त्न पवारांच्या या विधानामागे असू शकतो.तिसरं कारण असंही असू शकतं की,उद्या संघाच्या मध्यस्थीनं म्हणा किंवा अन्य काही कारणांनी म्हणा भाजप-सेना जवळ आले आणि सेना मंत्रिमंडळात सहभागी झाली तर आपण संदर्भहिन होऊ असंही पवारांना वाटत असेल.असं झालंच तर आम्ही कधीच जातीयवादी शक्तींना पाठिंबा दिला नाही हे जगाला सांगता यावं म्हणून त्यांनी “विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस आम्ही तटस्थ होतो” हे न विसरता सांगितलं आहे.

इतरही काही अर्थ पवारांच्या विधानाचे निघू शकतात.हे सारे अन्वयार्थ माध्यमांनी जनतेसमोर उलगडून ठेवल्यानं पवारांची अडचण झाली असेल तर त्याचा दोष माध्यमांना कसा काय देता?.आपला राग त्यांनी माध्यमांवर काढताना रात्रीच्या चर्चाच निरर्थक ठरविल्या.या चर्चा किती लोक गांभीर्यानं घेत असतील हे सांगता येत नाही ( स्वतः पवारांनी मात्र कालच्या साऱ्या चर्चा गांभीर्यानं घेतलेलया दिसतात.) असं म्हटलं.पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर विषय तज्ञ्‌ म्हणून अन्य विशेष काम नसलेेले तेच ते चेहरे वाहिन्यावर दिसतात असाही आक्षेप त्यांनी घेतला आहे.राजकाऱणात वर्षानुवर्षेतेच तेच  चेहरे सुखेनैव जनतेला दिसत असतात.राजकारणातील हे चेहरे बदलून भाकरी फिरविण्याची भाषा पवार कधीच करीत नाहीत.मात्र त्यांना टीव्हीवरील चर्चेत सहभागी होणाऱ्या त्याच त्या चेहऱ्यांबद्दल आक्षेप आहे.तुम्हाला जसा वाहिन्यावरील त्याच त्या चेहऱ्यांचा कंटाळा आलेला आहे तसाच कंटाळा राजकारणातल्या त्याच त्या चेहऱ्यांचाही लोकांना आलेला आहे.याकडं पवारसाहेब दुर्लक्ष का करतात ते समजत नाही.सोयीनुसार भूमिका घ्यायची हे राजकारण्याचं वैशिष्ठय आहे.ते त्यांनी जरूर जपावं पण त्यासाठी त्यांनी माध्यमांना खोटं ठरिविण्याचा प्रय़त्न करू नये एवढीच आमचं सांगणं आहे.आज एक विधान करायचे ,त्यातून अडचण होतेय हे दिसताच दुसऱ्या दिवशी माझ्या विधानाचा तसा अर्थ नव्हता किंवा माध्यमांनी अर्थ चुकीचा लावला असं म्हणायचे हे राजकीय उद्योग आता लोकांच्या परिचयाचे झाले आहेत.”सरकार टिकविण्याचा मक्ता आम्ही घेतला नाही” असं विधान पवारांनी केलचं नसतं तर काल आणि आज जी चर्चा झाली ती देखील झाली नसती.तुम्ही एकदा विधान केल्यानंतर त्याचा अन्वयार्थ प्रत्येक पत्रकार लावणारच.हा अन्वयार्थ पवारांना आवडेल किंवा पवारांच्या पक्षासाठी सोयीचा ठरेल असा लावण्याचाही मक्ता पत्रकारांनी घेतलेला नाही.तेव्हा नेत्यांनी माध्यमांना दोष देण्याऐवजी आपल्या भूमिकांचा पुनर्विचार केला पाहिजे.पवारांना सरकार पाडायचे आहे की,नाही हा त्यांचा प्रश्न आहे,मात्र त्यांना ते पाडायचे नसेल तर त्यांनी संभ्रम निर्माण होईल आणि माध्यमांना विषय मिळेल असे विधान कऱण्याचं काहीच कारण नव्हतं.काल मध्यावधीला सज्ज राहा असे सांगणारे पवार आज आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही असं म्हणत असतील तर त्याचं कालचं विधान एक तर संभ्रम निर्माण कऱण्यासाठी तरी होतं किंवा माध्यमाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष आपल्या चिंतन शिबिराकडं वळविण्याचा तरी तो प्रय़त्न असला पाहिजे.हेतू काहीही असला तरी पवार जर या देशातील मोठे नेते असतील तर त्यांंचं प्रत्येक विधान वेगवेगळ्या पातळ्यावर तपासून पाहिलं जाणारं आणि त्यामागचे अर्थ देखील शोधले जाणार मग ते पवारांना आवडोत किंवा नआवडोत.( एसेम )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here