पर्यटन गोव्यातलं आणि कोकणातलं..

0
1660

ध्यंतरी दोन-तीन दिवस गोव्यात होतो.नॉर्थ गोव्यातील काही बिचेस पाहिली.एवढी गर्दी होती की,नकोसं झालं.गोव्यातला निसर्ग अप्रतिम आहे यात शंका नसली तरी असा निसर्ग आपल्याला कोकणातही अनुभवता येतोच.19 वर्षे कोकणात होतो.बहुतेक बिचेस मी पाहिलेली आहेत.अनेक समुद्र किनारे अगदी गोव्यापेक्षाही सुंदर आहेत.गंमत अशी की,याची माहितीच कुणाला नाही.माहिती करून देण्यासाठी प्रयत्न शून्य. घाटावरचे पर्यटक असोत किंवा अगदी मुंबईकर पब्लिकही असो उठतात थेट गोव्याला निघतात.अनेकदा तिकडं काय बघायचं किंवा बघण्यासारखं काय आहे हे देखील त्याना माहिती नसतं.नुसतंच गोव्याला जावून आल्याचं समाधान.याचं कारण पर्यटन स्थळ म्हणून गोव्यानं स्वतःला विकसित केलं आहे.त्याची जाहिरात एवढी झाली आहे की,गोव्यापेक्षाही सुंदर निसर्ग कोकणात असताना तिकडं कोणाचं लक्ष नाही. महाराष्ट्र सरकारनं कोकणातील पर्यटनाकडं जेवढं लक्ष द्यायला हवं होतं ते दिलं नाही.आजही लक्ष नाही.कोकणाची वाट लावणारे मोठ मोठ केमिकल प्रकल्प कोकणात आणले गेले.नद्या दुषित करून टाकल्या,समुद्रही दुषित केला गेला.निसर्गाचं वैभव असलेल्या असंख्य वृक्षांची निर्दयपणे कत्तल केली गेली किंवा उन्हाळ्यात जंगलांना आगी लावून अर्धवट जळालेली लाकडं विकली गेली.हे झालं नसतं आणि पर्यटनावर आधाऱित विकास केला गेला असता तर गोव्याला कोणी गेलं नसतं.कारण कोकण मुंबई आणि पुण्याला जवळ आहे.विकएन्डला दोन दिवस मजेत चांगलं पर्यटन स्थळं निवडून तिकडं जाता आलं असतं.असं झालेलं नाही.कोकणात धड रस्ते नाहीत.एकमेव मुंबई-गोवा महामार्गाची रया गेली आहे.तळ कोकणात जाणारी चाकरमाणी मंडळीही या मार्गानं जाण्याची हिंमत करीत नाही,ती कोल्हापूरमार्गे जाते.पर्यटकांनाही हा रस्ता मृत्यूचा सापळा वाटतो.तोही हा मार्ग शक्यतो टाळतो.अंतर्गत रस्त्यावरून जाताना पुन्हा कोकणात यायची इच्छा शिल्लक राहात नाही.कोकणातून अनेक रेल्वे जातात पण त्यांना रायगड,रत्नागिरीतही थांबे दिलेले नाहीत.तेजसचीही तीच स्थिती आहे.म्हणजे पर्यटकांनी कोकणात उतरूच नये ही खबरदारी घेतली गेली की काय अशी शंका येते।  ..पर्यटकांच्या सुरक्षिततेची  कोणतीच उपाययोजन नाही.जीव रक्षक नाहीत,भरती ओहोटीची साधी वेळापत्रकंही कुठं लावलेले  दिसत नाहीत.समुद्राबद्दलच्या अज्ञानातून दरवर्षी कोकणात शेकडो पर्यटक प्राणास मुकतात.तरीही अलिबाग सारखे एखादे बिच सोडले तर त्यादृष्टीनं उपाययोजना होताना दिसत नाही.मुरूड जंजीरा,हरिहरेश्‍वरपासून गणपतीपुळे पर्यंत अनेक अशी बिचेस आहेत की,तेथून पर्यटक बुडाल्याच्या सातत्यानं बातम्या येत असतात.गोव्यात अशी मोठी दुर्घटना घडल्याचं गेल्या अनेक वर्षात घडलेलं नाही.याचं कारण सुरक्षिततेची तिकडं मोठी काळजी घेतली जाते.आपल्याकडं पर्यटकांना वार्‍यावर सोडलं जातं.मध्यंतरी मुरूडची दुर्घटना घडल्यानंतर एका चॅनलनं ‘माणसांना गिळणारा समुद्र’ असा स्क्रोल  चालविला होता.मी त्या चर्चेत होतो.मी त्याला आक्षेप घेतला.अशानं पर्यटकांच्या मनात भिती निर्माण होईल असं माझं म्हणणं होतं.तसं झालंही मुरूडची दुर्घटना घडल्यानंतर चार-दोन महिने मुरूडचं पर्यटन अक्षरशः ओस पडलं होतं.हे सातत्यानं होतं असतं.त्यावर परिणामकारक उपाय योजना होत नाही.दुर्घटना होतात,त्यात दोष समुद्राचा नाही.तो पर्यटकांचाच आहे.आपण निसर्गाची येथेच्छ छेडछाड करतो.ती करताना रोखायलाही कोणी नसते.अंतिमतः त्याचा फटका बसतो.दुर्घटना होतात.हे टाळलं पाहिजे आणि कोकणातले समुद्र माणसं गिळतात ही बनलेली ( किंवा बनवलेली ) प्रतिमा पुसून काढली पाहिजे.

हा झाला एक भाग .अन्य सुविधांचीही अशीच बोंब आहे.अनेक ठिकाणी साधी स्वच्छता गृहेही नाहीत..साध्या साध्या गोष्टीही सरकार करीत नाही.मुरूडला जायचंय तर कसं जायचंय ? हे बहुतेकांना माहिती नसते.सूचना फलक तुम्हाला कुठे दिसणार नाहीत.मी गोव्यात बराच फिरलो.मला पत्ता कोणाला विचारावा लागला नाही.ठराविक अंतरावार तुम्हाला सूचना फलक दिसतात.त्यामुळं चौकश्या करीत बसण्याची गरज भासत नाही.आणखी एक गोष्ट जाणवली.पर्यटक हे आपले अन्नदाते आहेत हे गोव्यातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे.पर्यटकाला त्रास होणार नाही याची पुरेपुर काळजी तेथे घेतली जाते.गोव्यात अर्धनग्न अवस्थेत,मद्याच्या अंमलाखाली अनेक पर्यटक असतात.परंतू महिलांची छेडछाड किंवा चोर्‍या मार्‍याच्या घटना अभावानेच दिसतात.कोकणात पर्यटक अन्नदाते आहेत अशी भावना नाही.ते कुणी तरी उपद्रवी आहेत अशा संशयानं त्यांच्याकडं पाहिलं जातं.संशयामुळं पर्यटकांशी वाद वगैरे घटना सातत्यानं होताना दिसतात.या सार्‍या गोष्टी पर्यटन वाढीसाठी नक्कीच मारक आहेत.

हॉटेल्स किंवा खाद्य पदार्थांच्या दराच्या बाबतीतही हेच दिसते. एखादा पर्यटक आला की,त्याचा खिसा खाली झाला नाही तर कोकणी माणसाला समाधान होत नसावे अशा  पध्दतीनं सारे दर आकारले जातात.ज्या खोलीला कलंगुट  बिचवर दोन हजार रूपये आकारले जातात अशा स्वरूपाच्या रूमसाठी रेवदंडा,नागाव,आक्षीतही किमान साडेतीन हजार रूपये आकारले जातात.कोकणात येणारा पर्यटक हा मध्यमवर्गीय असतो.एका रात्रीसाठी साडेतीन हजार रूपये देणे त्याला परवडणारे नसते.हे वास्तव कोकणी व्यावसायिक लक्षातच घेत नाही.सी फूड आणि पदार्थांचे दरही असेच आकारले जातात.हे टाळलं पाहिजे.एकदा आलेला पर्यटक वारंवार आला पाहिजे असा प्रयत्न होणं गरजेचं आहे.मी अलिबागला असतााना यासंदर्भात वारंवार लिहिलं आहे.मात्र आजही परिस्थिती बदललीय असं चित्र नाही.त्यामुळं एकदा अलिबागला,मुरूडला आलेला पर्यटक पुन्हा तिकडं येण्याचं नाव घेत नाही.म्हणजे सुविधा दिल्या  आणि कोकणी मानसिकता बदलली तर कोकणातही पर्यटकांची गर्दी नक्की वाढलेली दिसेल.एमटीडीसीनं यादृष्टीनं प्रयत्न कऱण्याची गरज आहे.एमटीडीसीच्या पर्यटन विकासासाठी अनेक योजना आहेत मात्र त्या केवळ कागदावरच.गणपती पुळ्याचं एमटीडीसीचं हॉटेल समुद्राच्या काठावर आहे. मी कोकणात गेलो की न विसरता तिथं एकदिवस तरी मुक्काम करतो.मस्त आहे पण तिथं व्यवस्था नाहीत.बेडसिटपासून सर्व्हिस पर्यन्त  सारा आनंदी आनंद असतो.कधीही फोन करा बुकिंग फुल्ल असल्याचं सांगितलं जातं.याउलट जीटीडीसीची हॉटेल्स तेथील व्यवस्था आणि व्यवस्थापन पाहण्यासारखं आहे.म्हणजे केवळ पर्यटन विकास झाला पाहिजे एवढं म्हणून चालणार नाही त्यासाठी मानसिकता तयार करावी लागेल.हल्ली बहुतेकजण वेळात वेळ काढून पर्यटनाचा आनंद घेत असतात.त्यांना जर कोकणात चांगल्या सुविधा मिळाल्या तर नक्कीच कोकणातलं पर्यटन वाढू शकेल..मग मराठी पर्यटकांना गोव्याला किंवा खाली केरळात जाण्याची गरजच भासणार नाही.येवा कोकण आपलाच असा अशी म्हण आहे.अनेकदा ही म्हण उपहासानं वापरली जाते. ती सकारात्मक अर्थाने ,आदरातिथ्याच्या भावनेतून वापरली तर कोकणाच्या पर्यटनाचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही.(SM )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here