21 मे आणि ध चा मा झाला त्याची गोष्ट…

21 मे चा तो दिवस मी विसरू शकत नाही.तेव्हा मी नांदेडला लोकपत्रमध्ये वृत्तंसंपादक होतो.पेपर नवीन होता ,त्यामुळं दररोज टेक्निकल अडचणींचा आम्हाला सामना करावा लागायचा .त्या दिवशीही तसच  झालं.पहिली आवृत्ती सहा वाजता निघायची.ती व्यवस्थित गेली.मात्र नंतर काय झालं माहिती  नाही पण पूर्ण कॉम्प्युटर सिस्टम बंद पडली.त्यामुळं अंक कसा काढायचा याची आम्हाला विवंचना होती.तो कटिंग -पेस्टींगचा जमाना होता.म्हणजे ब्रोमाईडवर प्रिन्ट घ्यायची आणि ती ब्रोमाईड कापून आपल्याला हव्या तशा बातम्या पानावर लावल्या जायच्या.त्यामुळे इलेक्टॉनिक टाइपराईटरवरून हे सारं जमू शकेल काय या प्रयत्नात आम्ही होतो..मात्र काही मार्ग सापडत नव्हता..वृत्तसंपादक म्हणून माझी घालमेल सुरू होती.तेवढ्यात पीटीआयच्या मशिनवर राजीव गांधी यांची हत्त्या झाल्याची बातमी आली.ती बातमी वाचून माझ्या पायाखालची वाळूच सरकली.सिस्टम फेल होती आणि एवढी मोठी बातमी असताना अंक द्यायचा नाही म्हणजे पेपरसाठी ती आत्महत्या होती. .शिवाय मालक श्री.कमलकिशोर कदम कॉग्रेसचे नेते होते.त्यामुळं ही बातमी असताना पेपर निघाला नसता तर मालकांसाठी ते राजकीयदृष्टयाही अडचणीचे ठरू शकत होते.त्यामुळं काहीही शक्कल लढवून अंक काढणं हे गरजेचं नव्ह तर अत्यावश्यकच होतं.

संतोष महाजन संपादक होते.ते घरी गेलेले होते.त्यांना घरी गाडी पाठवून त्यांना बोलावून घेतले.अन मार्ग काढला काही नाही, संपूर्ण अंक हातानं लिहून काढायचा.चार आर्टिस्ट होते.शिवाय काही उपसंपादकांचं अक्षरही चांगलं होतं.त्या सर्वांना बसविलं.मी बातमी डिक्टेट केली.अग्रलेख असलाच पाहिजे म्हणून संतोष महाजन यांनी अग्रलेख डिक्टेट केला.फोटो आणि ही बातमी मिळून चार पान भरायला वेळ लागला नाही.संपूर्ण चार पानं हातानं लिहून काढली .पहाटं दोनच्या सुमारास अंकाची पॉझिटिव्ह तयार झाली.नंतर प्लेटही तयार झाली आणि अडीचच्या सुमारास अंक छपाईस गेला. तेव्हा लोकपत्रची प्रिन्ट ऑर्डर चाळीस हजार होती.मी त्या दिवशी सव्वालाख अंक छापण्याची हिंमत दाखविली.तो एक प्रकारे धोकाच होता.कारण अंक विकला नसता तर मला घरचा रस्ता धरावा लागला असता हे नक्की.पण रात्रपाळीच्या वेळेस अनेकदा असे धोके स्वीकारावे लागतात.मी अंक हातानं लिहून काढण्याचा आणि अंकाची प्रिन्ट ऑर्डर वाढविणयचा धोका पत्करला होता.राजीव गांधी गेल्याची बातमी त्या दिवशी फक्त लोकपत्रलाच होती ( कारण औरंगाबादहून येणारे अंक लवकर तयार व्हायचे,त्यामुळं तिकडून येणार्‍या अंकात बातमी असण्याची शक्यताच नव्हती.स्थानिक पेपरची डेडलाईनही नऊची असल्यानं त्यांच्याकडंही बातमी नव्हती ) शिर्षक काळ्या रंगात आणि संपूर्ण अंक हातानं लिहिलेला,ही आमची मजबुरी होती पण वाचकांना वाटलं ंअंक मुद्दाम हस्ताक्षरातला दिला आहे. मालक कमलकिशोर कदम हे चोखंदळ वाचक आहेत.त्यांचाही फोन आला.अंक चांगला झाल्याचं त्यानी सांगितलं.शिवाय जास्तीचा अंकही हातोहात संपला होता.आणखी अंक पाहिजेत अशी मागणी एजन्ट करीत होते.अंक हस्ताक्षरात देण्याची आपली शक्कल यशस्वी ठरली होती आणि प्रिन्ट ऑर्डरही कमी पडली होती.मी खूष होतो.

तेवढ्यात दुपारी एक दीडच्या सुमारास पुन्हा कमलकिशोर कदम यांचा फोन आला.त्यांनी सांगितलं.संपादक संतोष महाजन,व्यवस्थापक राजा माने आणि तुम्ही चार वाजता कार्यालयात मला भेटा.मी तिकडे येतो.माझा समज असा झाला की,मालक खूष आहेत आमचं कौतूक होणार आहे.मात्र चार वाजता जेव्हा मालक कार्यालयात आले तेव्हाची त्यांची देहबोली काही तरी बिघडलंय अशी  होती.आम्ही त्यांच्या केबिनमध्ये त्यांना भेटलो.तेव्हा त्यांचा पहिला प्रश्‍न होता,अग्रलेख कोणी लिहिला ? .संतोष महाजन यांनी सांगितलं ‘मीच लिहिलाय म्हणजे मी ड्क्टिेट केलाय.आर्टिस्टनं तो लिहून काढलाय’ .खरं तर अग्रलेख लिहून झाल्यानंतर मी तो डोळ्याखालून घातला होता पण चूक माझ्या लक्षात आली नव्हती.डिक्टेट करताना संतोष महाजन यांनी जे ध्यानी मनी नव्हतं तेच घडलं असं वाक्य सांगितलं होतं.लिहिताना आर्टिस्टनं ते जे ध्यानी मनी होतं तेच घडलं असं लिहिलं होतं.थोडक्यात ध चा मा झाला होता..हे वाक्य आमच्या हितचिंतकांनी मालकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते स्वाभाविकपणे जाम भडकले.बैठकीतही त्यांनी आमची हजामत केली.ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आम्हा तिघांना लेखी मेमो ही दिला.( माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत मला मिळालेला तो पहिला आणि शेवटचा मेमो होता) त्यामुळं आम्ही तिघंही अस्वस्थ झालो.अत्यंत मेहनत घेऊन काढलेल्या अंकावर पाणी फिरलं होतं.खजिल होऊन मालकांच्या खोलीतून बाहेर पडलो.अजून कॉमप्यूटर सिस्टीम सुरू झालेली नव्हती.कालच्या प्रमाणंच आजही अंक हातानं लिहून काढण्यासाठी मी यंत्रणा सज्ज केली होती.मात्र नंतर निर्णय बदलला आणि जोपर्यंत सिस्टीम सुरू होत नाही तोपर्यंत अंक काढायचा नाही असा निर्णय आम्ही घेतला.त्यामुळं पुढची तीन-चार दिवस अंक बंद होता.नंतर काही दिवसांनी संतोष महाजन लोकपत्र सोडून औरंगाबादला लोकमतला गेले.मी पुढं लोकपत्रचा संपादक झालो.पण काल राजीव गांधी यांची पुण्यातिथी असल्यानं तो सारा घटनाक्रम डोळ्यासमोर उभा राहिला.वर्तमानपत्रातली एक चूकही काय घडवू शकते हे त्या दिवशी आम्ही अनुभवले.चूकच एवढी मोठी होती की,कोणताही खुलासा चालत नव्हता.मी ती सारी जबाबदारी स्वीकारली.पण मनातून कुठ  तरी खट्टू झ लो होतो।  कायम वाटत राहिलं कोणत्या परिस्थितीत अंक काढला याचा थोडा तरी विचार व्यवस्थापकांने  करायला हवा होता.मात्र असं होत नाही.  चुकीला क्षमा नाही हे त्या दिवशी मला कळलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here